Source :- BBC INDIA NEWS

प्रत्येकवेळी मोबाइलची रिंग वाजल्यानंतर मनात एक आशा निर्माण होते. कदाचित फोनवरून कोणीतरी ‘तुमची मुलगी सापडली’ अशी बातमी देईल.
ज्ञानेश्वरीच्या आई-वडिलांना आजही अशी अपेक्षा आहे. महिना उलटून गेला, त्या एका फोनची ते अजूनही वाट पाहत आहेत.
काकीनाडा जिल्ह्यातील सीएच अग्रहारम गावातील ज्ञानेश्वरीला बेपत्ता होऊन 6 जुलैला एक महिना पूर्ण झाला. या महिनाभरात पोलिसांनी सर्व अंगांनी तपास केला. अजूनही त्यांचा तपास सुरूच आहे.
दुसरीकडे आपली मुलगी सुखरूप असल्याची एक बातमी मिळावी, यासाठी तिचे आई-वडील आतुरतेने वाट पाहत आहेत.
पोलिसांनी जंगल, डोंगर, विहिरी आणि तलाव परिसरात कसून शोधमोहीम राबवली. ड्रोनचाही वापर केला. मोबाइल फोनच्या माहितीचे (डेटा) विश्लेषण केले. मुलगी दिसल्याची कुठे माहिती जरी मिळाली तर पोलिसांचं पथक तिथे तातडीने रवाना होत.
परंतु, ज्ञानेश्वरीचा ठावठिकाणा काही लागू शकलेला नाही.
ज्ञानेश्वरी कुठे आहे? तिच्यासोबत नेमकं काय घडलं? महिना उलटून गेला, तरी अजूनही या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत.
पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे?
ज्ञानेश्वरी बेपत्ता होण्याच्या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
याप्रकरणात मोबाइल टॉवर आणि कॉल डेटाची तपासणी, ड्रोनद्वारे शोधमोहीम, ट्रॅप कॅमेरे, आरएफआयडी पद्धतींसह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे पोलीस म्हणाले.
या प्रकरणाचा तपास पाहणारे पेड्डापूरमचे डीएसपी एबीजी टिळक यांनी याबाबतची माहिती बीबीसीला सांगितली.

“आम्ही जंगली प्राण्यांच्या हल्ल्याची शक्यताही तपासली. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी शेवटची दिसलेल्या ठिकाणी बाहुली आणि मांस ठेवून ट्रॅप कॅमेरे लावले. पण, त्यातूनही कोणता पुरावा मिळाला नाही,” अशी माहिती डीएसपी टिळक यांनी दिली.
मुलगी बेपत्ता झालेल्या दिवशी मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे पाण्यात वाहून गेल्याची शक्यताही आम्ही तपासली.
एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी परिसरातील विहिरी, तलाव आणि इतर पाणीसाठ्यांमध्ये शोध घेतला. पण, त्यातूनही कोणताही पुरावा सापडला नाही.

आदिलाबाद, बापटलाहूनही आले फोन…
एखादी मुलगी दिसल्याची माहिती कुठूनही मिळाली, की पोलिसांचं विशेष पथक लगेचच तिकडे रवाना होतं. आदिलाबाद, बापटला आणि इतर ठिकाणी जाऊन प्रत्येक माहितीची पडताळणी करण्यात आली. परंतु, अजूनही ज्ञानेश्वरीचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही.
“आदिलाबाद, बापटला आणि इतर ठिकाणांहून ज्ञानेश्वरी असल्याचा संशय व्यक्त करणारे फोन आले होते. त्या प्रत्येक माहितीची आम्ही पडताळणी केली. पण त्यातून हाती काहीच लागलं नाही,” अशी माहिती डीएसपी टिळक यांनी दिली.

तपासाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी शेवटची दिसलेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला.
त्यानंतर हा परिसर 5 किलोमीटरपर्यंत वाढवला. आता 15 किलोमीटरच्या परिसरातही पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

‘बाहुल्या अजूनही तिथेच’
ज्या पाम तेलाच्या वृक्षाच्या मळ्यात ज्ञानेश्वरी शेवटची दिसल्याचं सांगण्यात आलं होतं, त्या ठिकाणी पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून कुंपणावर बाहुल्या टांगल्या आहेत. या बाहुल्या 18 जून रोजी लावण्यात आल्या होत्या.
बीबीसीने त्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी पोलिसांनी लावलेल्या बाहुल्या अजूनही तशाच होत्या. त्या बाहुल्या तिथे ठेवून तीन आठवडे झाले. पण पोलिसांना अद्यापही त्यातून कोणताही महत्त्वाचा धागा हाती लागलेला नाही.
“मुलगी शेवटची कुंपणाजवळ दिसली होती. त्यामुळे एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला असावा का, याचीही तपासणी करण्यात आली. त्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आणि मांसाचे आमिष ठेवलं.”
“एखादा प्राणी आला तर तो कॅमेऱ्यात दिसेल, अशी आशा पोलिसांना होती. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पथकही तैनात करण्यात आलं. मात्र, आतापर्यंत एकही प्राणी तिथे आलेला नाही. तिथे ठेवलेली आमिषेही तशीच आहेत,” अशी माहिती डीएसपी टिळक यांनी दिली.

13 डोंगरांवरही शोधमोहीम…
ज्ञानेश्वरी बेपत्ता होऊन महिना झाला, तरी शोधमोहीम सुरूच असल्याचं डीएसपी टिळक यांनी सांगितलं. मुलगी बेपत्ता झालेल्या परिसरासह संशय असलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांची शोधपथकं पाठवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुलीचं कुटुंब ज्या 40 एकरांच्या पाम वृक्षाच्या मळ्यात राहतं, त्या परिसरातून एकूण 13 डोंगरांकडे जाणारे मार्ग आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

“त्या मार्गांवरून कोणीतरी ज्ञानेश्वरीला घेऊन गेलं असावं का, या शक्यतेचाही तपास सुरू आहे. त्यासाठी वन विभागाचीही मदत घेतली जात आहे,” अशी टिळक यांनी सांगितलं.
“मुलीचा शोध घेण्यासाठी पाम वृक्षाच्या मळ्यात काम करणारे स्थानिक मजूर आणि बाहेरून येणाऱ्या लोकांचीही चौकशी सुरू आहे. या परिसरातील काजूच्या बागांमध्येही हंगामात अनेक जण येतात. अशांना मुलगी दिसली असेल किंवा कोणी तिला सोबत घेऊन गेलं असेल का, या शक्यतांचाही तपास करत आहोत.”
“तसेच, मुलीबाबत माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणाही पोलिसांनी केली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
फोटो स्रोत, Ganesh
गावोगावी पोस्टर लावून ज्ञानेश्वरीचा शोध
एकीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे, तर दुसरीकडे ज्ञानेश्वरीचे वडील गणेश मुलीचा फोटो असलेले पोस्टर घेऊन गावोगावी फिरून तिचा शोध घेत आहेत.
नरसापट्टणम, चिंतापल्ली, पाडेरू, अराकू, अड्डूरोड आणि इतर अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीचे वडील आपल्या कुटुंबासह जाऊन ती बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावत आहेत.
“या मुलीला कोणी पाहिलं आहे का किंवा ती दिसली आहे का?” असा प्रश्न ते भेटणाऱ्या प्रत्येकाला विचारत आहेत. दिसेल त्या भिंतीवर, झाडावर आणि विजेच्या खांबावर पोस्टर लावत आहेत.
माझी मुलगी अजूनही कुठेतरी सुखरूप असेल, असा विश्वास आहे, असं ते सांगतात.
फोटो स्रोत, Ganesh
प्रत्येक माहिती एक नवीन आशा
ज्ञानेश्वरीबद्दल एखादा फोन येईल, काहीतरी माहिती मिळेल, या आशेवर तिचे कुटुंबीय अजूनही तिची वाट पाहत आहेत.
“कधी कधी पोलिसांकडून बाहेरून आलेले काही फोटो आम्हाला पाठवले जातात. ते पाहून ‘ही आमची ज्ञानेश्वरीच असावी’ असं वाटतं. परंतु, फोटो नीट पाहिल्यावर ती ज्ञानेश्वरी नसल्याचं समजतं आणि मग पुन्हा निराशा हाती येते,” असं ज्ञानेश्वरीचे काका कोटेश्वरराव यांनी बीबीसीला सांगितलं.
“कोणत्याही भागात, रस्त्यांवर गेलो की आमची मुलगी दिसेल असं आम्हाला वाटायचं. एखादं लहान मूल रडताना ऐकलं तरी आम्ही थांबून पाहायचो. प्रत्येक फोन आला की आशेचा किरण निर्माण व्हायचा. पण ती आमची ज्ञानेश्वरी नसल्याचं समजलं की पुन्हा निराशा पदरी पडायची,” असं ते म्हणाले.

‘नेमकं काय झालं असेल याची कल्पनाही करू शकत नाही’
ज्ञानेश्वरीला शेवटचं पाहणाऱ्या तिची आई सुनकारा भवानी यांना त्या दिवशी नेमकं काय घडलं, हे अजूनही समजू शकलेलं नाही.
“ज्ञानेश्वरी बेपत्ता झाली असेल, तिच्यासोबत काही अपघात झाला असेल किंवा जंगली प्राण्याने हल्ला केला असेल… इतक्या मोठ्या तपासात एखादा तरी धागादोरा मिळायला हवा होता. पण अद्याप एकही पुरावा मिळालेला नाही. हेच आम्हाला समजत नाही,” असं तिच्या आईने सांगितलं.
“माझी मुलगी नक्की आमच्याकडे परत येईल, याची मला खात्री आहे. पण तोपर्यंत ती कशी असेल, याचाच विचार करून मनाला खूप वेदना होतात,” असं ज्ञानेश्वरीची आई सुनकारा भवानी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. अपहरण झालं का, अपघात झाला का, की जंगली प्राण्याचा हल्ला झाला, यांसारख्या प्रश्नांबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही.
म्हणूनच एक महिना उलटून गेला, तरी “ज्ञानेश्वरी कुठे आहे?” या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

ठावठिकाणा लागेल का?
ज्ञानेश्वरी आपल्या आई-वडिलांकडे कधी परत येईल का, की आंध्र प्रदेशातील ठावठिकाणा न लागलेल्या शेकडो बेपत्ता प्रकरणांपैकी तीही एक राहील, या प्रश्नाच्या उत्तराची तिचं कुटुंब वाट पाहत आहे.
तर ज्ञानेश्वरीचा ठावठिकाणा लागेपर्यंत तपास सुरूच राहील, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




