Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मागं लय दुष्काळ होते, पण असा दुष्काळ पाहिला नाही’ ग्राऊंड रिपोर्ट

‘मागं लय दुष्काळ होते, पण असा दुष्काळ पाहिला नाही’ ग्राऊंड रिपोर्ट

3
0

Source :- BBC INDIA NEWS

दामोदर चव्हाण

“मागं लय दुष्काळ होते. पण असा दुष्काळ नाही. एवढा दुष्काळच झाला नाही बघा. 1972 ला झालता का? आम्ही मुगात बैलं चारले. पोळ्याच्या दिशी पूजा केल्याच्यानंतर पाऊस आला. त्याच्यात बी दुष्काळ आम्हाला कळाला नाही. पण, यंदाचा दुष्काळ आहे की नाही, अरे अरे अरे….”

बोलता बोलता दामोदर चव्हाण आभाळाकडे पाहत हात जोडायला लागतात.

यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे हे त्यांच्या बोलण्यातून आणि अनुभवातून लक्षात येतं.

75 वर्षांचे दामोदर चव्हाण लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या गरसुळी गावात राहतात.

चव्हाण यांची 2 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पावसाअभावी वाळून गेलीय.

‘उत्पन्नापेक्षा खर्च जास्त’

ते सांगतात, “दोन-दोन महिना, दीड-दीड महिना पाऊस नाही. उगं शितोडा यायलाय. इथं गावात पडला की शेतात नाही पडत. इकडं पडला की तिकडं नाही, अशी परिस्थिती.

“पाऊस असता तर एकरी 12-15 पोते तरी सोयाबीन काढीत होतो बघा. आता काय 3 पोते, 4 पोते होईन. सोयाबीनची कंडिशन बघा ना काय आहे. शेंगा कुठं हायेत याला?”

दामोदर आपल्या शेतातील सोयाबीन उपटून दाखवतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

गरसुळी गावात पावसाअभावी सोयाबीन पिकाची झालेली अवस्था.

2016 साली लातूर शहराला सांगलीच्या मिरजहून रेल्वेनं पिण्याचं पाणी पुरवण्यात आलं होतं.

आता 2026 मध्ये लातूर जिल्ह्यात पाण्याची तूट जवळपास 50 % एवढी आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातले शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यासमोर मोठं संकट उभं ठाकलंय.

गरसुळी गावच्या शेतांमधून फिरताना सगळीकडे वाळलेली पिकं तेवढी दिसतात. गेल्यावर्षी शेतामधील तूर जी 8 फूट उंच होती, ती आता केवळ गुडघ्याइतकी असल्याचं शेतकरी सांगतात.

पिकांचं 80 % नुकसान

लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांचं 80 टक्क्यांच्या आसपास नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे.

शेतकरी विष्णू पवार सांगतात, “सोयाबीनला एका एकरसाठी 20 हजार रुपये खर्च लागतो. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायलाय साहेब. आता तर काय पाऊसच नाही. या शेतात तर काय उत्पन्नाचा शॉटच राहिलेला नाही.”

गरसुळी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर ‘गरसुळी लघु पाटबंधारे प्रकल्प’ आहे. गेल्यावर्षी बैलपोळ्याच्या दिवशी हे धरण अक्षरश: ओव्हरफ्लो झाल्याचं स्थानिक सांगतात. पण आजघडीला हे धरण कोरडंठाक आहे. जमिनीला भेगा पडल्यात आणि लातूरमधील बहुतांश धरणांची अशीच परिस्थिती आहे.

गरसुळी गावातील धरण कोरडंठाक पडलं आहे.

गरसुळी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता दोन दशलक्ष घनमीटर एवढी आहे. 1222 एकर क्षेत्राला या धरणातील पाण्याचा सिंचनासाठी लाभ होतो. पण, आता धरणात पाणीच नसल्यामुळे आजूबाजूच्या 4-5 गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे.

इथंच दत्ता देशमुख जनावरं चरायला घेऊन आले होते.

ते सांगायला लागले, “एवढा भयंकर दुष्काळ पाहिला नाही बघा कधी. जनावराला खड्ड्यानी हुडकित पाणी फिरावं लागालंय. जनावरं बघा तुम्ही खड्ड्यानी फिराय लागायली. एवढी परिस्थिती बेक्कार आहे सध्या.”

दत्ता यांचं वय 60 वर्षं आहे.

4 दिवसांऐवजी 6 दिवसांनी पाणीपुरवठा

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील धनेगाव इथं मांजरा धरण आहे. या धरणात गेल्यावर्षी 94 % पाणीसाठा होता, यंदा केवळ 10 % पाणी शिल्लक राहिलंय. या धरणातून लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.

लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड सांगतात, “लातूरसाठी सध्या डिसेंबरपर्यंत पाणी पुरणार होतं. पण आता उपाययोजना म्हणून आपण शहराला 4 दिवसांऐवजी 6 दिवसाला पाणीपुरवठा 2 दिवसांपासून सुरू केलेला आहे. यामुळे पाणी किमान 15 जानेवारीपर्यंत पुरेल.

“लातूरसाठी जे मांजरा धरणातून पाणी येतं, त्यामधला जो डेड स्टॉक आहे तो जून महिन्यापर्यंत पुरणार होता. आता पाण्याचं नियोजन करुन तो जुलैपर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करणार आहोत.”

मांजरा धरणात गेल्यावर्षी 94 % पाणीसाठा होता, तो यंदा 10 टक्क्यांवर आलाय.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी पावसाची सर्वाधिक, जवळपास 50 % तूट लातूर जिल्ह्यात आहे. लातूरमधल्या 9 मोठ्या धरणांपैकी 5 धरणांमध्ये 0 % पाणीसाठा आहे. लातूर शहराला 10 वर्षांपूर्वी रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यात आला होता.

पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर सांगतात, “5 दिवसानं पाणी की 8 दिवसानं पाणी, 15 दिवसानं पाणी की 30 दिवसानं पाणी, हेच आमचं नेहमी पाण्याचं चक्र आहे. त्यामध्ये कुठेही फरक पडत नाही. मग धरण 100 % भरलेलं असू दे की 80 % भरलेलं असू दे. यातून आपलं जलव्यवस्थापन कसं आहे ते दिसून येतं. या जलव्यवस्थापनाची कार्यक्षमता याच्यातून स्पष्ट दिसते की, गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्ही जलव्यवस्थापन नेमकं कसं केलेलं आहे!”

‘रब्बीची पेरणी कशी करायची?’

सध्या लातूर जिल्ह्यात 100 ते 125 दिवस पुरेल इतका जनावरांचा चारा उपलब्ध असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. जिल्ह्याचा टंचाई आराखडा प्रशासन तयार करत आहे. रब्बी हंगामाचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

दामोदर चव्हाण म्हणतात, “आता रबीची पेरणी कशी करायची, विहिरीला पाणी नाही, बोअरला पाणी नाही. कुणाच्याबी विहिरीला बघा. पाणी द्यायला काही इलाजच नाही.”

तर, शेतकरी विष्णू पवार सांगतात, “शासनाच्या भरवशावर आहे जे काही आहे आता. इथं तर काहीच नाही राहिलेलं या गावात आता. तळ्यातलं पाणी आटून गेलं, विहिरीला पाणी नाही. बोअर तर बंद पडले आणि हे सोयाबीनचं असलं झालेलं आहे.”

कोरडीठाक धरणं, आटलेल्या नद्या, पावसाअभावी वाळलेली पिकं आणि चिंतेत असलेले शेतकरी. सध्या लातूरमध्ये हेच चित्र पाहायला मिळतंय. डिसेंबरअखेरपर्यंत इथली परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी कोरडीठाक धरणं, आटलेल्या नद्या आणि वाळलेली पिकं सध्या लातूरमध्ये हेच चित्र पाहायला मिळतंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली.

सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय.

सरकारनं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट या सर्व 10 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागाच्या यादीत समावेश करण्यात आलाय.

या तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

पण, प्रत्यक्षात थेट मदत किती रुपये मिळते, याची इथल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC