Home LATEST NEWS ताजी बातमी लॉस एंजेलिसच्या नव्या महापौर भारतीय वंशाच्या नित्या रमण; त्या कोण आहेत आणि...

लॉस एंजेलिसच्या नव्या महापौर भारतीय वंशाच्या नित्या रमण; त्या कोण आहेत आणि त्यांची तुलना ममदानींशी का होतेय?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

नित्या रमण (मध्यभागी) आणि त्यांचे कुटुंब, 3 नोव्हेंबर 2026 रोजी मतदान केंद्रातून बाहेर पडताना.

वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक सोशलिस्ट नित्या रमण यांनी लॉस एंजेलिसच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विद्यमान महापौर कॅरेन बास यांचा पराभव केला आहे. त्यांच्या या विजयामुळे कॅलिफोर्नियातील राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीला नित्या रमण यांची कमजोर उमेदवार म्हणूनच सुरुवात झाली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी कॅरेन बास या प्रभावी राजकीय नेत्या होत्या. त्या यापूर्वी अमेरिकेच्या संसदेत (काँग्रेस) सदस्य होत्या. कॅरेन बास यांनी आतापर्यंत एकही निवडणूक गमावली नव्हती.

रमण यांची तुलना अनेकदा न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्याशी केली जाते. दोघेही डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आहेत. तसेच, प्रगतीशील विचार आणि धोरणं घेऊन ते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

न्यूयॉर्कचे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट महापौर झोहरान ममदानी यांच्याशी होणाऱ्या तुलनेबद्दल बोलताना रमण म्हणाल्या, “ममदानी हे सध्या अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याशी माझी तुलना केली जाते, याचा मला आनंद आहे.”

“लोकांशी संवाद साधण्याची आणि नेतृत्व करण्याची त्यांची शैली खूपच चांगली आहे. पण, मी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. माझी स्वतःची एक वेगळी, स्वतंत्र अशी ओळख आहे.”

Caption- 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर नित्या रमण यांनी आपल्या कुटुंबीयांसह प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

रमण यांच्या विजयामुळे आता अमेरिकेतील दोन मोठ्या शहरांचं नेतृत्व डेमोक्रॅटिक सोशलिस्ट नेते करणार आहेत.

यात ममदानी आणि अलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझ यांच्यासारख्या अमेरिकेतील काही प्रसिद्ध नेत्यांचाही समावेश आहे.

लॉस एंजेलिसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचाच महापौर निवडून येणार, हे जवळपास निश्चित होतं. परंतु, अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या शहरातील मतदार कितपत डाव्या विचारसरणीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात, हा खरा प्रश्न होता.

कॅरेन बास यांनी गुरुवारी (5 ऑक्टोबर) सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी नित्या रमण यांना फोन करून आपला पराभव मान्य केला असल्याचे सांगितलं.

त्यांनी लिहिले, “हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. परंतु, लॉस एंजेलिसच्या लोकांनी आपला निर्णय दिला आहे. या शहराला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. माझं लॉस एंजेलिसवर प्रेम आहे आणि या शहरावर माझा विश्वास आहे. सर्वांना चांगलं जीवन मिळेल हे आश्वासन पूर्ण होईल, याची खात्री करण्याचे काम मी यापुढेही करत राहीन.”

नित्या रमण यांनी बदल घडवून आणण्याचं आश्वासन देत निवडणूक लढवली होती.

कोण आहेत नित्या रमण?

नित्या रमण आपले पती वली चंद्रशेखरन यांच्यासोबत.

नित्या रमण या शहर नियोजन क्षेत्रात (अर्बन प्लॅनिंग) काम करतात. त्यांनी हार्वर्ड आणि एमआयटी या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.

त्या नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘वर्किंग मदर’ आहेत. त्या लॉस एंजेलिस सिटी कौन्सिलमध्ये डिस्ट्रिक्ट 4 चं प्रतिनिधित्व करतात.

2020 मध्ये त्यांनी सिटी कौन्सिलची निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक विजय मिळवला होता. यासह, लॉस एंजेलिस सिटी कौन्सिलमध्ये निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या आशियाई-अमेरिकी महिला आणि पहिल्या दक्षिण आशियाई ठरल्या.

मार्च 2024 मध्ये त्या मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा या पदावर निवडून आल्या.

पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून रमण यांनी बेघर लोकांना मदत करण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं, कमी किमतीत घरं बांधणं आणि पर्यावरण रक्षणासाठी शहराने ठरवलेली उद्दिष्टं पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं आहे.

त्या शहराच्या नियोजन आणि जमिनीच्या वापरासंबंधी समितीच्या (प्लॅनिंग अँड लँड युज मॅनेजमेंट-पीएलयूएम) सदस्य आहेत. याशिवाय, बेघर लोक आणि आरोग्य (होमलेसनेस अँड हेल्थ), सार्वजनिक सुरक्षा (पब्लिक सेफ्टी) तसेच शहराच्या नियमावलीचा (चार्टर रिव्ह्यू) आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष समितीच्याही त्या सदस्य आहेत.

नित्या आपले पती चंद्रशेखरन आणि जुळी मुलं कर्ण आणि कावेरी बरोबर शहरातील सिल्व्हर लेक येथे राहतात.

त्यांचे पती चंद्रशेखरन हे टीव्हीसाठी लेखन करतात. एप्रिल 2023 मध्ये नित्या रमण यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या, “माझ्या मुलांनंतर मला सर्वांत जास्त आवडणारी व्यक्ती म्हणजे माझे पती. ते टीव्ही लेखक आहेत आणि अमेरिकेतील ‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका वेस्ट’ या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत.”

“मनोरंजन क्षेत्रात झालेले मोठे बदल आणि उलथापालथी मी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहन करताना जवळून पाहिले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचा नफा आणि चित्रपट-मालिकांच्या निर्मितीवरील खर्च वाढला, परंतु, लेखकांची कमाई मात्र कमी झाली आहे.”

नित्या रमण यांची आश्वासनं

Caption- सुरुवातीला नित्या रमण या कमजोर उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु, नंतर त्यांची स्थिती मजबूत होत गेली.

बेघर लोकांची समस्या कमी करणे, शहरात घरांची संख्या वाढवणे, हॉलिवूडमध्ये कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत असताना नोकऱ्या वाचवणे आणि स्थलांतरितांवर (इमिग्रेशन) होणाऱ्या कारवाईपासून शहरातील लोकांचे संरक्षण करणे, अशी आश्वासने त्यांनी दिली होती.

रमण यांनी शहरातील इतर अनेक समस्या सोडवण्याचेही आश्वासन दिले होते. शहर स्वच्छ आणि सुंदर बनवणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि रात्रीच्या वेळीही शहरातील जनजीवन (नाईटलाईफ) पुन्हा गजबजून जावे, यासाठी प्रयत्न करण्याचा त्यात समावेश होता.

परंतु, या निवडणुकीत 2025 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग हा सर्वांत मोठा मुद्दा ठरला होता. या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि शहरातील अनेक भाग उद्ध्वस्त झाले होते. या संकटाच्या काळात कॅरेन बास यांच्या अनुपस्थितीबद्दल आणि शहर प्रशासनाच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीबद्दल त्यांच्यावर राजकीय स्तरावर जोरदार टीका झाली होती.

लॉस एंजेलिसच्या नव्या महापौरांवर 2027 मध्ये होणाऱ्या सुपर बाउल आणि 2028 मधील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी असेल.

सुरुवातीला नित्या रमण यांची उमेदवारी कमजोर मानली जात होती. परंतु, हळूहळू त्यांना लोकांचा पाठिंबा मिळू लागला. विशेषतः तरुण मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. याच वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या प्राथमिक निवडणुकीत (प्रायमरी) त्यांनी रिॲलिटी टीव्ही स्टार स्पेन्सर प्रॅट यांना मागे टाकलं होतं.

कॅरेन बास यांच्यावरील नित्या रमण यांच्या विजयातून अमेरिकेतील इतर भागांतील मतदारांचा कलही दिसून येतो. देशभरात डेमोक्रॅटिक पक्षाला मोठं यश मिळालं आहे. यात अशा भागांचाही समावेश आहे, जिथे रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व होते आणि अनेक दशकांपासून उदारमतवादी विचारांच्या उमेदवारांना विजय मिळवता आला नव्हता.

वॉशिंग्टन डीसीमध्येही डेमोक्रॅटिक सोशलिस्ट जॅनिस लुईस जॉर्ज नवीन महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेतील आणखी एका मोठ्या शहरात प्रगतीशील विचारांच्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे.

व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या विजयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, “आजवरचा इतिहास पाहता, हा मोठा अनर्थ आणि संकट ठरणार आहे.”

अशा उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केलं जात आहे.

लॉस एंजेलिसच्या पहिल्या कृष्णवर्णीय महापौर कॅरेन बास यांचे या शहराशी आणि त्याच्या इतिहासाशी जुने नाते आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC