Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 9 मिनिटे
सोरायसिस… लालसर झालेली त्वचा, कांद्याच्या सालीप्रमाणे दिसणारे त्वचेचे पापुद्रे, कपाळ, डोकं किंवा पोटासारखे अवयवही याच्या कचाट्यातून सुटत नाही. खवल्यासारखी दिसणारी त्वचा, खाज आणि त्यापाठोपाठ दिसणारे डाग. सोरायसिस हा आजार केवळ शरीरावर परिणाम करत नाही तर तो त्या व्यक्तीच्या मनावरही परिणाम करतो.
त्वचेवर लालसर, खवलेदार चट्टे दिसू लागले की अनेकांना तो साधा त्वचारोग वाटतो. पण हा त्रास वारंवार होत असेल, खाज किंवा जळजळ होत असेल तर त्यामागे सोरायसिस हा दीर्घकालीन आजार असू शकतो. अनेक लोक त्याविरधात लढत आहेत मात्र, सोरायसिसबाबत आजही अनेक गैरसमज आहेत.
हा आजार संसर्गजन्य आहे का? तो फक्त त्वचेपुरता मर्यादित असतो का? आणि त्यावर नियंत्रण मिळवणं कितपत शक्य आहे? या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आधी सोरायसिस नेमका काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
सोरायसिस हा एक ऑटोइम्यून आजार आहे. म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या त्वचेच्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे त्वचेच्या नव्या पेशी खूप वेगानं तयार होतात आणि त्यांचे खवल्यांसारखे थर त्वचेवर साचू लागतात.
याचा परिणाम म्हणून त्वचेवर लालसर, जाड आणि खवले आणि चट्टे दिसू शकतात. हे चट्टे बहुतेकवेळा कोपर, गुडघे, टाळू आणि पाठीवर आढळतात. मात्र, प्रश्न असा आहे की सोरायसिसचा परिणाम केवळ त्वचेपुरता मर्यादित असतो का?
तज्ज्ञांच्या मते, याचं उत्तर ‘नाही’ आहे. काही रुग्णांमध्ये या आजाराचा परिणाम सांध्यांवरही होऊ शकतो. याला सोरिएटिक आर्थरायटिस म्हणतात. यामध्ये सांधेदुखी, सूज आणि हालचालींमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजेच हा आजार त्वचेच्या पलीकडे जाऊन शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
मात्र, सर्व रुग्णांमध्ये लक्षणं सारखीच दिसतात असं नाही. काहींना केवळ लहान चट्टे दिसतात, तर काहींमध्ये त्वचेचा मोठा भाग प्रभावित होतो. मग या लक्षणांना चालना कोणत्या गोष्टी देतात?
सोरायसिसमध्ये काय होत असतं?
सोरायसिस हा दीर्घकालीन रोगप्रतिकारक यंत्रणेशी संबंधित दाहजन्य आजार आहे. त्यामागे अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांचा संगम असतो.
ज्या व्यक्तींमध्ये अनुवंशिक प्रवृत्ती असते, त्यांच्यात रोगप्रतिकारक यंत्रणा अतिसक्रिय होते आणि चुकून दाह निर्माण करते. यामुळे त्वचेच्या पेशी नेहमीपेक्षा खूप वेगाने तयार होतात आणि गळून पडतात. त्यातून जाड, लाल आणि खवलेदार चट्टे निर्माण होतात.
संसर्ग, त्वचेला झालेली इजा, काही औषधं, धूम्रपान, लठ्ठपणा आणि मानसिक ताण हे सोरायसिस वाढवणारे सामान्य घटक आहेत. दिसायला तसं वाटलं तरी हा संसर्गजन्य आजार किंवा अॅलर्जी नाही. तो रोगप्रतिकारक यंत्रणेचा विकार आहे आणि ही बाब समजून घेणं महत्त्वाचं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
अस्वच्छतेमुळे सोरायसिस होतो असा बहुतांशवेळेस गैरसमज आढळतो. ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्समध्ये त्वचारोगतज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विशालाक्षी विश्वनाथ यांच्याशी बीबीसी मराठीनं चर्चा केली.
डॉ. विशालाक्षी म्हणाल्या, “सोरायसिसचा अस्वच्छतेशी कोणताही संबंध नाही आणि हा संसर्गजन्य आजारदेखील नाही. हा एक दीर्घकालीन स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) विकार आहे. या विकारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकीच्या पद्धतीने कार्य करू लागते आणि त्वचेच्या पेशींच्या वाढीचा वेग असामान्यरीत्या वाढवते. त्यामुळे त्वचेवर जाड, लालसर आणि खवलेदार चट्टे दिसू लागतात.
“सोरायसिस हा अनेक कारणांमुळे होणारा आजार आहे. अनुवांशिक प्रवृत्ती, रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा आजार उद्भवतो. त्वचेच्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असली तरी ती सोरायसिस होण्याचे कारण ठरत नाही आणि त्यावर उपचारही ठरत नाही.”
फोटो स्रोत, Getty Images
त्या सांगतात, “दुर्दैवानं, आजही अनेक रुग्णांना या आजाराबाबतच्या गैरसमजांमुळे सामाजिक कलंकाला सामोरं जावं लागतं. सोरायसिस हा संसर्ग किंवा अस्वच्छतेचं लक्षण नाही, याबाबत जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे भेदभाव कमी होण्यास मदत होईल आणि रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.”
“आधुनिक उपचारपद्धतींच्या मदतीने सोरायसिसवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते आणि रुग्णांना निरोगी त्वचा तसेच चांगल्या जीवनमान लाभू शकतं”, असं डॉ. विशालाक्षी सांगतात.
सोरायसिसबद्दल काही गैरसमज आणि त्यांची उत्तर
सोरायसिसबद्दल अजूनही बरेच गैरसमज आहेत. सोरायसिसबद्दल असलेल्या समजुतींमुळे त्याबद्दल अकारण चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळेच आम्ही सोरायसिसबद्दल असलेल्या काही गैरसमजांची उत्तरं मिळवण्यासाठी डॉ. रेश्मा विश्नानी यांच्याशी संपर्क केला.
डॉ. रेश्मा या मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्वचारोगतज्ज्ञ, ट्रायकॉलॉजिस्ट आणि ॲस्थेटिक डर्मेटॉलॉजिस्ट सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीबीसी मराठीच्या पुढील प्रश्नांना उत्तरं दिली. –
प्रश्न- सोरायसिस हा संसर्गजन्य आजार आहे का? स्पर्श किंवा जवळच्या संपर्कातून तो पसरतो, असं अनेकांना अजूनही का वाटतं?
डॉ. रेश्मा विश्नानी- सोरायसिस हा संसर्गजन्य नाही आणि हे वारंवार ठामपणे सांगण्याची गरज आहे. स्पर्श, मिठी मारणं, हस्तांदोलन, एकत्र जेवण, स्विमिंग पूल वापरणं किंवा लैंगिक संबंध यांमधून तो पसरत नाही. सोरायसिस हा अनुवांशिक अतिसंवेदनशिलता आणि रोगप्रतिकारक यंत्रणेच्या असामान्य प्रतिसादामुळे होतो.
हा कोणत्याही जिवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होत नाही, त्यामुळे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही. त्वचेवरील लाल, खवलेदार चट्टे संसर्गजन्य त्वचारोगांसारखे दिसू शकतात, त्यामुळे हा गैरसमज निर्माण होतो. या चुकीच्या समजुतीमुळे रुग्णांना सामाजिक कलंक आणि एकाकीपणाचा सामना करावा लागतो. सोरायसिस हा रोगप्रतिकारक यंत्रणेशी संबंधित आजार आहे, हे समजून घेणं भेदभाव कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- सोरायसिस हा फक्त त्वचेचा आजार आहे का, की तो शरीराच्या इतर भागांनाही प्रभावित करू शकतो?
डॉ. रेश्मा विश्नानी- अनेकांना हे माहीत नसतं की सोरायसिस हा केवळ त्वचेपुरता मर्यादित नाही. आता तो एक संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा दाहजन्य आजार मानला जातो.
सुमारे एकतृतीयांश रुग्णांमध्ये पुढे सोरायटिक आर्थरायटिस विकसित होऊ शकतो, ज्यामुळे सांधेदुखी, कडकपणा आणि सूज येऊ शकते. मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या सोरायसिस असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप-2 मधुमेह, दाहजन्य आतड्यांचे आजार आणि नैराश्याचा धोका अधिक असतो. नखांमध्ये बदल आणि डोळ्यांमध्येही दाह निर्माण होऊ शकतो. म्हणूनच सोरायसिसच्या उपचारात फक्त त्वचेवर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण आरोग्याचा विचार करावा लागतो.
प्रश्न- सोरायसिस आनुवंशिक आहे का? कुटुंबातील इतिहासामुळे धोका किती वाढतो?
डॉ. रेश्मा विश्नानी- सोरायसिसमध्ये आनुवंशिकतेची भूमिका नक्कीच असते, पण हे चित्र तितकंसं सरळ नाही. आजपर्यंत 80 हून अधिक आनुवंशिक संवेदनाक्षम क्षेत्रांची ओळख पटली आहे. त्यापैकी HLA-C*06:02 हा एक महत्त्वाचा आनुवंशिक घटक मानला जातो.
कुटुंबातील जवळच्या नात्यातील व्यक्तीला सोरायसिस असल्यास धोका वाढतो, पण अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना मजबूत कौटुंबिक इतिहास असूनही हा आजार होत नाही. त्याउलट काहींना कोणताही कौटुंबिक इतिहास नसतानाही सोरायसिस होतो. त्यामुळे केवळ जनुके पुरेशी नसतात; पर्यावरणीय घटक आणि रोगप्रतिकारक प्रतिसादही महत्त्वाचे असतात. एकंदरीत सोरायसिस हा बहुघटकांमुळे होणारा आजार आहे.

प्रश्न- काही विशिष्ट अन्नपदार्थ सोरायसिसला कारणीभूत ठरतात का, की आहार आणि सोरायसिस यांच्यातील संबंध अधिक गुंतागुंतीचा आहे?
डॉ. रेश्मा विश्नानी- कोणताही विशिष्ट अन्नपदार्थ सोरायसिस निर्माण करतो, असं सिद्ध झालेलं नाही. मात्र आहार आणि सोरायसिस यांच्यातील संबंध लक्षात घेण्यासारखा आहे. ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, त्यांच्यासाठी निरोगी वजन राखणं महत्त्वाचं असतं कारण लठ्ठपणामुळे शरीरातील दाह वाढतो आणि उपचारांचा परिणाम कमी होऊ शकतो.
ज्या व्यक्तींना सीलिॲक रोग असल्याचं निश्चित झालं आहे, त्यांना ग्लुटेनमुक्त आहाराचा फायदा होऊ शकतो. मात्र सर्वांनीच ग्लुटेन टाळावं, अशी शिफारस करण्याचं कारण नाही. संतुलित भूमध्यसागरीय (Mediterranean) पद्धतीचा आहार एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण तो वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. आहाराविषयीचा सल्ला नेहमी वैयक्तिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असावा.
प्रश्न- सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का, की तो आयुष्यभर नियंत्रणात ठेवावा लागणारा आजार आहे?
डॉ. रेश्मा विश्नानी- सोरायसिस हा दीर्घकालीन आजार आहे आणि सध्या त्यावर कायमस्वरूपी इलाज उपलब्ध नाही. मात्र आज उपलब्ध असलेल्या उपचारांमुळे तो प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो.
अनेक रुग्ण दीर्घकाळ त्वचा पूर्णपणे किंवा जवळपास स्वच्छ ठेवण्यात यशस्वी होतात. उपचारांमध्ये स्थानिक औषधं, फोटोथेरपी, मेथोट्रेक्सेटसारखी पारंपरिक औषधं आणि विशिष्ट दाहजन्य मार्गांना लक्ष्य करणाऱ्या आधुनिक बायोलॉजिक थेरपींचा समावेश होतो.
लवकर निदान, नियमित फॉलो-अप, उपचारांचं पालन आणि इतर संबंधित आजारांचं व्यवस्थापन यामुळे दीर्घकालीन नियंत्रण आणि जीवनमानात मोठी सुधारणा शक्य होते.
फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- आज उपलब्ध असलेले नवीन उपचार पर्याय कोणते आहेत?
डॉ. रेश्मा विश्नानी- गेल्या दशकात सोरायसिसच्या उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार उपचारांमध्ये स्थानिक औषधं, फोटोथेरपी, तोंडावाटे घेण्याची औषधं आणि दाह निर्माण करणाऱ्या विशिष्ट रोगप्रतिकारक मार्गांवर लक्ष्य करणाऱ्या आधुनिक उपचारांचा समावेश होतो. आज अनेक रुग्णांना त्वचा पूर्णपणे किंवा जवळपास स्वच्छ ठेवता येते आणि त्यांचं जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकतं.
सोरायसिस आणि मानसिक आरोग्य
सोरायसिस हा केवळ त्वचेचा आजार नाही. तो व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही खोल परिणाम करू शकतो. संशोधनानुसार, सोरायसिस असलेल्या सुमारे 30 ते 50 टक्के रुग्णांना नैराश्य किंवा चिंतेचा त्रास होतो.
त्वचेवर दिसणाऱ्या लक्षणांमुळे आत्मसन्मान, सामाजिक आत्मविश्वास आणि जवळच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. शिवाय, मानसिक ताणामुळे सोरायसिसचा उद्रेक वाढू शकतो, तर सोरायसिसमुळे ताण वाढू शकतो. त्यामुळे हे एक दुष्टचक्र बनते.
फोटो स्रोत, Getty Images
सोरायसिस असलेल्या रुग्णांमधील मानसिक त्रास कसा ओळखावा आणि कधी मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडे जावं हा प्रश्न आम्ही पुणेस्थित सिनियर क्लिनिकल सायकोथेरपिस्ट विजय महाले यांना विचारला.
विजय महाले म्हणाले, “सोरायसिस असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक त्रास अनेकदा उघडपणे दिसत नाही. त्यामुळे तज्ज्ञ नियमित स्क्रीनिंग, रुग्णांशी संवाद आणि त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून हा त्रास ओळखण्याचा प्रयत्न करतात. HAM-D आणि HAM-A सारख्या प्रमाणित चाचण्यांचा वापर नैराश्य आणि चिंता मोजण्यासाठी केला जाऊ शकतो. ‘सोरायसिसमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो?’ किंवा ‘या आजारामुळे तुम्हाला कधी खूप उदास किंवा चिंताग्रस्त वाटतं का?’ असे खुले प्रश्न विचारल्यानं रुग्णांच्या भावनिक संघर्षाची माहिती मिळते. आत्महत्येचे विचार, गंभीर नैराश्य, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम, किंवा मानसिक कारणांमुळे उपचार टाळणं यांसारखी लक्षणे दिसल्यास रुग्णाला मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडे तातडीने जाणं आवश्यक असते.”
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)
रुग्णांना सल्ले नको, आधार द्या
सोरायसिस सारख्या आजारात रुग्णाला मित्र, कुटुंबीय आणि त्यांच्या जोडीदारांनी मदत करण्याची विशेष गरज असते. त्यांच्या भावना, त्यात होणारे बदल, त्याचं निरीक्षण करणं आवश्यक असतं. त्यांना सतत सल्ले देण्याऐवजी आधाराची गरज असते.
फोटो स्रोत, Getty Images
विजय महाले सांगतात, “सोरायसिस असलेल्या व्यक्तीला मदत करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्यांच्या भावनांना मान्यता देणं. त्यांना निराश वाटणं, लाज, राग किंवा दुःख समजून घ्या, पण लगेच उपाय सांगण्याची घाई करू नका. नको असलेले वैद्यकीय सल्ले देण्याऐवजी ‘तुला सूचना हव्यात का, की फक्त मन मोकळं करायचं आहे?’ असा प्रश्न विचारता येईल. त्यांना केवळ त्वचेच्या आजाराबाबतच पाहू नका, तर एक संपूर्ण व्यक्ती म्हणून स्वीकारा. त्यांच्या मर्यादांचा आदर करा, त्यांच्यावर सामाजिक सहभागाचा दबाव टाकू नका आणि सोरायसिसबद्दल स्वतः माहिती मिळवून त्यांच्यावर स्पष्टीकरण देण्याचं ओझं कमी करा. काय चूक-काय बरोबर हे ठरवत बसण्यापेक्षा त्यांचं नीट ऐकून घेणं आणि आपण त्यांच्या सोबत आहोत ही भावना देणं, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.”

थेरपिस्ट त्यांना कशी मदत करू शकतात असं विचारल्यावर विजय महाले म्हणाले, “थेरपिस्ट म्हणून आमची भूमिका केवळ मानसिक लक्षणांवर उपचार करण्यापुरती मर्यादित नसते, तर रुग्णाला स्वतःकडे अधिक दयाळूपणे पाहण्यास मदत करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. CBT (कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी) नकारात्मक विचारपद्धती बदलण्यास मदत करू शकते, तर ACT (अॅक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी) व्यक्तीला शारीरिक अस्वस्थता असतानाही अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करते. रुग्णांनी स्वतःबद्दल कठोर न होता, ताण कमी करण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वसन, योग यांचा आधार घ्यावा आणि हळूहळू सामाजिक आयुष्यात पुन्हा सहभागी व्हावं. समुपदेशन, सपोर्ट ग्रुप्स आणि त्वचारोगतज्ज्ञ व मानसिक आरोग्यतज्ज्ञ यांच्यातील समन्वय हा दीर्घकालीन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे.”
रुग्णांना समजून घेणं महत्त्वाचं
सोरायसिसभोवती असलेला सामाजिक कलंक रुग्णांसाठी मोठं नुकसान करतो. हा आजार संसर्गजन्य आहे किंवा अस्वच्छतेशी संबंधित आहे, या चुकीच्या समजुतींमुळे लोक हस्तांदोलन, शारीरिक संपर्क किंवा सार्वजनिक जागेत एकत्र येणं टाळतात. त्यामुळे रुग्णांना एकाकीपणा जाणवू शकतो.
मुलांना शाळेत छेडछाड आणि चिडवण्याचा सामना करावा लागतो, तर प्रौढांना नोकरीच्या ठिकाणी भेदभाव, मुलाखतीत अस्वस्थ प्रसंग आणि सामाजिक किंवा क्रीडा उपक्रमांमध्ये संकोच अनुभवावा लागतो. कालांतराने याचा आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि चिंता तसेच नैराश्य वाढू शकतं. अधिक जनजागृतीमुळेच हा दृष्टिकोन बदलू शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
सोरायसिसच्या रुग्णांसाठी डॉ. केदार तिळवे माइंडफुलनेसचा पर्याय सुचवतात. ते मुलंडच्या फोर्टिस हॉस्पिटल आणि वाशी इथल्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल इथं मनोविकारतज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. तिळवे सांगतात, “या रुग्णांना माइंडफुलनेस-आधारित ताणनियंत्रण तंत्रांचा (Mindfulness-Based Stress Reduction Techniques) नियमित सराव लाभदायक ठरू शकतो. छंद जोपासणं, मद्यपान आणि धूम्रपान टाळणं यामुळेही परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता वाढते. तसेच, योग्य वेळी मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी संपर्क साधल्यास गंभीर मानसिक आरोग्य संकट उद्भवण्यापासून बचाव करता येऊ शकतो.”
फोटो स्रोत, Getty Images
सोरायसिसच्या रुग्णांशी बोलताना, त्यांच्याबरोबर जगताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत. आपल्या म्हणजेच कुटुंबीयांच्या वागण्याचा त्यांच्या स्थितीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यांना नीट समजून घेणं आवश्यक असतं.
कुटुंबीयांनी आणि रुग्णांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत असा प्रश्न विचारल्यावर डॉ. केदार तिळवे म्हणाले,”रुग्ण व्यक्त करत असलेल्या मानसिक आरोग्याशी संबंधित चिंता दुर्लक्षित करणं किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं ही एक सामान्य चूक आहे. अचानक वर्तनातील बदल, मनःस्थितीतील चढ-उतार किंवा उपचारांचं सातत्यानं पालन न करणं यांसारख्या धोकादर्शक चिन्हांकडं दुर्लक्ष केल्यास गंभीर मानसिक आजार उद्भवू शकतात. नियमित दिनचर्या, चांगला काम-जीवन समतोल (Work-Life Balance) आणि निरोगी जीवनशैली यांचा मानसिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाचा वाटा असतो. तसेच, माइंडफुलनेस-आधारित ताणनियंत्रण तंत्रांचा वापर आणि वेळेवर जवळच्या मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडे मदत घेणंही अत्यंत आवश्यक आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




