Home LATEST NEWS ताजी बातमी सौदी अरेबियात बांगलादेशी जोडप्याला मृत्युदंड : नेमके आरोप काय होते? ‘हे’ आहेत...

सौदी अरेबियात बांगलादेशी जोडप्याला मृत्युदंड : नेमके आरोप काय होते? ‘हे’ आहेत अनुत्तरीत प्रश्न

2
0

Source :- BBC INDIA NEWS

'अनैतिक कृत्य' म्हणजे नेमकं काय केलं? सौदीत दोघांना फाशी, तरीही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित

गेल्या आठवड्यात सौदी अरेबियात दोन बांगलादेशी नागरिकांना फाशी देण्यात आली.

सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका पुरुषानं आणि एका महिलेनं मक्केतील मशिदीत “अशोभनीय” किंवा “अनैतिक” कृत्य केलं होतं.

मात्र, ते कृत्य नेमकं काय होतं, हे त्यांनी सार्वजनिकरीत्या स्पष्ट केलेलं नाही.

फाशी देण्यापूर्वी आपल्याला त्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती, असं बांगलादेशच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सौदी अरेबियात 30 लाखांहून अधिक बांगलादेशी नागरिक राहतात आणि तिथंच काम करतात. त्यामुळे या प्रकरणाकडे बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधलं गेलं आहे.

या दोघांना फाशी देऊन एक आठवडा झाला आहे, मात्र अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत.

सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं म्हटलं की, या दोन बांगलादेशी नागरिकांनी मशिदीचं पावित्र्य भंग केलं होतं आणि त्यांना कथितरीत्या ‘ताझीर’ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामी कायद्यातील या प्रकारात न्यायाधीशांना शिक्षा ठरवण्याचा अधिकार असतो.

गुन्ह्याचं गांभीर्य आणि तो एका पवित्र स्थळी घडल्याची बाब या शिक्षेतून प्रतिबिंबित होते, असं सौदी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणातील पुरावे, न्यायालयीन कार्यवाही किंवा अपील प्रक्रियेबाबतची माहिती सौदी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक केलेली नाही.

या दोघांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देण्यात आली होती का? यासह न्यायालयीन प्रक्रियेची माहिती बांगलादेशनं सौदी अरेबियाकडे मागितली आहे.

त्यांच्यावर नेमका काय आरोप होता?

या दोघांना फाशी देण्यात आल्याची माहिती त्यांना सौदी माध्यमांतील वृत्तांमधूनच समजली, असं सौदी अरेबियातील बांगलादेशच्या दुतावासातील अधिकाऱ्यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं.

बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा ओबैद म्हणाल्या, या दोघांना 2023 पासून ताब्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

सौदी अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी बांगलादेशला पाठवल्या जाणाऱ्या कैद्यांच्या यादीत या दोघांची नावं होती, असं बांगलादेशचं म्हणणं आहे. मात्र, यापैकी कोणालाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचा उल्लेख त्या याद्यांमध्ये नव्हता, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यानं बीबीसी बांगलाला सांगितलं, फाशीच्या अवघे काही दिवस आधी त्या बांगलादेशी पुरुषानं तुरुंगातून आपल्या नातेवाईकांशी संवाद साधला होता. मात्र, लवकरच मृत्युदंड दिला जाणार असल्याचे कोणतेही संकेत त्यानं दिले नव्हते.

फाशीबाबत बांगलादेशला माहिती देणं आवश्यक होतं का?

कॉन्सुलर संबंधांबाबतीत असलेल्या व्हिएन्ना करारानुसार, परदेशी नागरिकांना ताब्यात घेतल्यानंतर आपल्या देशाच्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधण्याचा अधिकार आहे, याची माहिती त्यांना देणं आवश्यक आहे. त्यांनी वाणिज्य दूतावासाला माहिती देण्याची विनंती केली, तर अधिकाऱ्यांनी कोणताही वेळ न दवडता तसं केलं पाहिजे.

मात्र, एखाद्या देशाच्या नागरिकाशी संबंधित फौजदारी खटल्यातील प्रत्येक टप्प्याची माहिती त्या देशाच्या सरकारला देणं या करारानुसार बंधनकारक नाही.

फाशीबाबत बांगलादेशला माहिती देणं आवश्यक होतं का?

बांगलादेशचे माजी राजदूत हुमायुन कबीर यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं, फौजदारी प्रकरणांमधील न्यायालयीन कार्यवाही सामान्यतः त्या देशाच्या अंतर्गत न्यायव्यवस्थेचा विषय असते आणि एखाद्या प्रकरणातील प्रत्येक टप्प्याची माहिती दुसऱ्या देशाच्या सरकारला देणं सौदी अधिकाऱ्यांसाठी आवश्यकच आहे, असं नाही.

अटक, खटला किंवा फाशी यापैकी कोणत्याही बाबतीत आपल्या दूतावासाला किंवा वाणिज्य दूतावासाला माहिती देण्यात आली नव्हती, असं बांगलादेशचं म्हणणं आहे.

कायदेशीर प्रक्रिया आणि दोन्ही देशांमधील माहितीच्या देवाणघेवाणीबाबत स्पष्टीकरण देण्याची औपचारिक मागणी बांगलादेशनं सौदी अरेबियाकडे केली आहे.

बांगलादेशच्या या मागण्यांना सौदी अरेबियाने अद्याप सार्वजनिकरीत्या उत्तर दिलेलं नाही.

याबाबत काही करता आलं असतं का?

इतरांप्रमाणेच परदेशात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनाही त्या देशातील स्थानिक कायदे लागू होतात. मात्र दुतावास त्यांना कॉन्सुलर मदत देऊ शकतात, स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती मागवू शकतात आणि आपल्या नागरिकांशी संबंधित प्रकरणांवर लक्ष ठेवू शकतात.

काही प्रकरणांमध्ये, परदेशात गंभीर गुन्हेगारी आरोपांना सामोरं जाणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी सरकार दया दाखवण्याची मागणी करू शकतं.

श्रीलंकेचे नागरिक अनोजन सिवारसा यांच्याशी संबंधित सौदी अरेबियातील अलीकडच्या एका प्रकरणाचा बांगलादेशात संदर्भ दिला जात आहे.

सौदी अरेबियाचा ढाक्यातील दुतावास

ईशनिंदात्मक मानल्या गेलेल्या फेसबुक कमेंटमुळे सिवारसा यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीनं राजनैतिक आणि कायदेशीर प्रयत्न सुरू केले.

सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली असं त्यानंतर श्रीलंकेच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं.

त्या प्रकरणातील परिस्थिती वेगळी होती आणि या प्रकरणातही तसाच निकाल शक्य झाला असता, असे कोणतेही संकेत नाहीत. मात्र, दयेची मागणी करण्याचा काही पर्याय उपलब्ध होता का, असा प्रश्न या प्रकरणामुळे बांगलादेशात उपस्थित झाला आहे.

आता पुढं काय?

शमा ओबैद सांगतात, सरकार अद्याप निकालाची प्रत आणि सौदी अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती मिळण्याची वाट पाहत आहे.

बांगलादेशनं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांना समन्स धाडलं आहे.

या प्रकरणाची माहिती फाशी देण्याआधी बांगलादेशला का देण्यात आली नाही आणि या दोन बांगलादेशी नागरिकांना न्यायालयात स्वतःचा बचाव करण्याची संधी देण्यात आली होती का, याबाबतही बांगलादेशने सौदी अरेबियाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे या दोघांचे मृतदेह परत आणण्याचा. मृतदेह बांगलादेशात परत आणावेत, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मात्र हे कधी किंवा कशा प्रकारे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

या प्रकरणाबाबत सौदी अरेबियाकडून अधिक माहिती मिळाल्यानंतर बांगलादेश त्यावर काय भूमिका घेतो, हे पाहावं लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC