Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
शाकाहार असो वा मांसाहार. जगभरातल्या अनेक पदार्थांत हळदीनं स्थान पटकावलं आहे. अनेक पदार्थांमध्ये ती एक आवश्यक घटक झाली आहे..
पण पदार्थांना चविष्ट बनवण्याबरोबरच, जगातील सर्वांत प्राचीन आणि लोकप्रिय मसाल्यांपैकी एक असलेली हळद आपल्या आरोग्यासाठी काही चमत्कार करू शकते का?
“माझं कुटुंब पंजाबी आहे आणि आम्ही हळद वापरत नाही असा एकही पदार्थ मला आठवत नाही,” असं दक्षिण आशियाई स्थलांतरित समुदायांवर संशोधन करणाऱ्या आणि पॉडकास्ट चालवणाऱ्या अन्नसंशोधक रागिणी कश्यप यांनी फूड चेन कार्यक्रमाला सांगितलं.
हळदीचे सुमारे 30 प्रकार आहेत. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत ती मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकात वापरली जाते. मात्र, दक्षिण आशियाई स्थलांतरित समुदायांसोबत प्रवास करत करत हळद जगभर पसरली.
पूर्वेकडील बाली आणि फिजी या पॅसिफिक बेटांपासून ते पश्चिमेकडील कॅरिबियन बेटांपर्यंत तिचा प्रभाव दिसून येतो.
‘प्रबळ संदेश’
कश्यप सांगतात, 2,500 वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्येही हळदीचा उल्लेख आढळतो. दक्षिण आशियात हळदीला विशेष स्थान आहे आणि तिच्यामध्ये जंतुनाशक तसेच दाहविरोधी गुणधर्म आहेत असा विश्वास खोलवर रुजला आहे.
“मी आजारी पडले की सर्वप्रथम माझ्या मनात हळदीचाच विचार येतो. ती खूप दिलासा देणारी वाटते. त्यात थोडा आराम, थोडं औषध आणि थोड्या आठवणी मिसळलेल्या असतात,” दुबईत राहणाऱ्या कश्यप सांगतात.
फोटो स्रोत, Getty Images
भारतात हळदीचा वापर हळद समारंभात देखील केला जातो. लग्नाआधी होणाऱ्या या विधीत सौंदर्यवर्धनासाठी चेहऱ्यावर हळदीचा लेप लावला जातो.
आता मात्र पश्चिमेकडील ग्राहकांनीही या प्राचीन दाव्यांकडे लक्ष दिल्याने हळदीची विक्री झपाट्याने वाढत आहे.
हळदीची सप्लिमेंट्स, ज्यात साधारणपणे कर्क्युमिन (curcumin) हे संयुग असतं आणि ज्याला हळदीच्या आरोग्यदायी गुणधर्मांसाठी जबाबदार मानलं जातंय ही सप्लिमेंट्स हाडे आणि सांधे निरोगी ठेवण्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायद्यांचे दावे करत विकले जातात.
सोशल मीडियावर लोकांनी स्वतःचे सकारात्मक अनुभव सांगितल्यामुळेही हळदीची लोकप्रियता वाढल्याचं कश्यप सांगतात.
“जर जवळपास अब्जभर लोकांना ठामपणे वाटत असेल की हळद अनेक समस्या दूर करू शकते, तर तो जगभर पोहोचणारा खूप मोठा संदेश असतो,” त्या म्हणतात.
“आणि मग त्यामागे लॉबिंग, सप्लिमेंट कंपन्या वगैरेही जोडल्या गेल्या तर तो संदेश आणखी प्रभावी ठरतो.”
‘सर्वांत वाईट रासायनिक रचना’
मात्र, काही तज्ज्ञ हळदीच्या फायद्यांबाबत साशंक आहेत. अमेरिकेतील मिनेसोटा येथील रसायनशास्त्रज्ञ डॉ. कॅथरिन नेल्सन यांनी कर्क्युमिनवरील 100 हून अधिक संशोधनपत्रांचा आढावा घेतला आहे.
“कर्क्युमिन सर्व काही करू शकतं, असे दावे केला जातात. पण प्रत्यक्षात पाहिलं तर कदाचित त्याचा कोणताही मोठा परिणाम होत नसावा,” त्या म्हणतात.
फोटो स्रोत, Getty Images
हळदीची समस्या तिच्या रासायनिक संरचनेत असू शकते, असं डॉ. नेल्सन सांगतात. त्यामुळे तिचा अभ्यास करणं अवघड ठरतं. ती अत्यंत प्रतिक्रियाशील असून चाचण्यांमध्ये हस्तक्षेप करू शकते. म्हणजे ती प्रत्यक्षात परिणामकारक नसतानाही परिणाम होत असल्याचा भास निर्माण करू शकते.
तसंच, शरीरात हळदीचं शोषणही फारसं चांगलं होत नाही. तोंडावाटे घेतल्यानंतर तिचा अतिशय कमी भाग रक्ताभिसरणात पोहोचतो, असं त्या सांगतात. त्यामुळे अनेक जण त्याचं शोषण वाढावं म्हणून ती काळ्या मिरीबरोबर घेतात.
“उपयुक्त औषध तयार करण्यासाठी सुरुवात करायची असेल, तर ही खरंच सर्वांत वाईट रासायनिक रचनांपैकी एक आहे,” डॉ. नेल्सन म्हणतात.
‘आम्ही निराश झालो होतो’
गेल्या अनेक दशकांत हळदीवर मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं आहे. मात्र त्यातून मिळालेले निष्कर्ष अनेकदा परस्परविरोधी असून अभ्यासांची गुणवत्ता देखील वेगवेगळी आहे.
हळदीचे फायदे सांगणारे अनेक अभ्यास मानवांवर करण्यात आलेले नव्हते, असं कॅनडातील ओंटारिओ प्रांतातील लंडन हेल्थ सायन्सेस सेंटरमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांवर उपचार करणारे डॉक्टर प्रा. अमित गर्ग सांगतात.
त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आतापर्यंतचे दोन सर्वांत मोठे अभ्यास केले आहेत. पहिल्या अभ्यासात महाधमनीतील (aortic aneurysm) फुगवट्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांमध्ये कर्क्युमिनमुळे मूत्रपिंडाला होणारी इजा आणि दाह टाळता येतो का, हे तपासण्यात आलं. मात्र 600 रुग्णांच्या चाचणीत त्याचा कोणताही फायदा आढळला नाही.
यानंतर त्यांनी कर्क्युमिनचे अधिक सूक्ष्म कण वापरून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये त्याचा मूत्रपिंडांच्या आरोग्यावर परिणाम होतो का किंवा आजाराची प्रगती रोखता येते का, याचा अभ्यास केला. मात्र त्यातही असा कोणताही परिणाम सिद्ध करता आला नाही.
“आम्ही निराश झालो होतो,” ते म्हणतात. “कारण आम्ही हा अभ्यास मोकळ्या मनाने सुरू केला होता. ते प्रभावी नाही हे दाखवणं हा आमचा उद्देश नव्हता.”
पण मग असा प्रश्न पडतो की विशेषतः भारतात हजारो वर्षांपासून लोक हळदीचा औषधी पदार्थ म्हणून वापर करत आले आहेत, याचं स्पष्टीकरण काय?
प्रा. गर्ग यांच्या मते, एखाद्या नैसर्गिक पदार्थातून एकच संयुग वेगळं काढून त्याचं औषध बनवण्याचा प्रयत्न करणं आणि संपूर्ण नैसर्गिक पदार्थाचा स्वयंपाकात किंवा त्वचेवर वापर करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मग तज्ज्ञांच्या मते महागड्या हळदीच्या सप्लिमेंट्सवर पैसा खर्च करणं योग्य आहे का?
प्रा. गर्ग सांगतात की किंमत हा मुद्दा बाजूला ठेवला तरी, ती प्रभावी असल्याचे पुरेसे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. ते स्पष्ट करतात की नैसर्गिक आरोग्यविषयक उत्पादने इतर औषधांसारख्या कठोर नियमनाखाली येत नाहीत.
“आपण नक्कीच मोकळ्या मनाने विचार करू शकतो. पण जर आपण एखाद्या गोष्टीचा विशिष्ट परिणाम होतो असं म्हणत असू, तर तो दावा उच्च दर्जाच्या पुराव्यांवर आधारित असायला हवा,” ते म्हणतात.
मात्र जेवणात हळदीचा वापर करून पदार्थांचा आनंद घेण्यात काहीच गैर नाही, असं ते सांगतात.
“लोकांना हळदीचे पदार्थ आवडत असतील, तर मी त्यांना ते खात राहण्याचंच प्रोत्साहन देईन.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




