Home LATEST NEWS ताजी बातमी हृदयाची तपासणी करायला अजून वेळ आहे असं वाटतंय? चाळीशीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून...

हृदयाची तपासणी करायला अजून वेळ आहे असं वाटतंय? चाळीशीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

3
0

Source :- BBC INDIA NEWS

छातीवर हात ठेवलेला तरुण

  • Published

  • वाचन वेळ: 7 मिनिटे

हृदयविकार म्हटलं की, ‘तो वय वाढल्यावरच होतो’, ‘हार्ट अटॅक ही काही तरुणांची समस्या नाही’ असा समज अजूनही काही लोकांच्या मनात आहे. बऱ्याचदा विशी-तिशीतले तरुण ‘आपल्याला याचा धोका नाही’ असं समजत असतात.

गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅकनं तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये वेगानं प्रवेश केला दिसतो.

तसंच, हार्ट अटॅकसाठी उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं, लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, अपुरी झोप, सततचा मानसिक ताण, बैठं जीवन असे अनेक घटक कारणीभूत असतात.

तरुण असतानाच या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या असतील तर त्या भविष्यातील अनेक आजारांचं कारण ठरू शकतात. तसंच, हा धोका कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता आपल्या शरीरात वाढू शकतो.

हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांवर आधीपासूनच लक्ष असलं पाहिजे अनेक तज्ज्ञ सुचवतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, हृदयविकाराची जोखीम वाढवणारे घटक लवकर ओळखण्यासाठी नियमित रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हृदयविकार आणि स्ट्रोकसारखे आजार हे जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी आहेत आणि त्याची जोखीम वाढवणारे घटक जीवनशैलीशी संबंधित आहेत.

जागतिक हृदयदिनाच्या पार्श्वभूमीवर, वयाची 40 वर्षं पूर्ण होण्याआधी हृदयाची तपासणी कोणाला आणि कधी आवश्यक असते, कोणत्या चाचण्या खरोखर उपयुक्त आहेत, तसेच कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नयेत याविषयी तज्ज्ञ काय सांगतात, याचा आढावा घेऊ.

ECG तपासणी सर्वांनी करावी का?

लक्षणं नसताना आणि हृदयविकाराचा विशेष धोका नसलेल्या प्रत्येक तरुण व्यक्तीने ईसीजी किंवा इकोकार्डिओग्राफी ही नियमित प्रतिबंधात्मक तपासणी करण्याची आवश्यकता नाही.

छातीत दुखणं, हृदयाचे ठोके वाढणं , बेशुद्ध पडणं, दम लागणं किंवा डॉक्टरांना तपासणीत काही संशयास्पद लक्षणं आढळल्यास या तपासण्यांची गरज भासू शकते.

हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी अनेक चाचण्या उपलब्ध असल्या तरी प्रत्येक व्यक्तीला सर्व चाचण्यांची गरज असतेच असं नाही.

तज्ज्ञांच्या मते, 30-40 वयोगटातील बहुतांश निरोगी व्यक्तींमध्ये नियमित रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची चाचणी आणि लिपिड प्रोफाइल ही मूलभूत तपासणी अधिक उपयुक्त ठरू शकते. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) माहितीनुसार, कोलेस्टेरॉलची तपासणी हृदयविकाराचा धोका समजून घेण्यासाठी महत्त्वाची मानली जाते.

मात्र, जोखीम जास्त असल्यास HbA1c, Lipoprotein(a) अर्थात Lp(a) आणि काही प्रकरणांमध्ये ApoB यांसारख्या चाचण्यांचाही विचार केला जाऊ शकतो. अलीकडच्या लिपिड व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये Lp(a) सारख्या मार्कर्सकडे वाढतं लक्ष दिलं जात आहे.

छातीवर हात ठेवलेला तरुण

याबद्दल डॉ. लक्ष्मण गायकवाड यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. ते एम्स हॉस्पिटल डोंबिवली येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

ते म्हणाले, “कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, वाढतं वजन, उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेच्या समस्या कमी वयात दिसू लागल्या आहेत. अनेकदा सुरुवातीला यांची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे तरुण वयापासून हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.”

20 ते 30 या वयात हृदयासंदर्भातील त्रास वाढवणारे घटक कोणते?

उच्च रक्तदाब, एलडीएल कोलेस्ट्रॅाल वाढणं, मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, अपुरी झोप आणि दीर्घकाळ सतावणारा ताण हे घटक तरुण वयातच दिसू शकतात. काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळेही कोलेस्ट्रॅालचे प्रमाण खूप वाढलेलं असू शकतं.

अशा स्थितीत रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी कोणत्या वयापासून करावी? असं आम्ही डॉ. गायकवाड यांना विचारलं.

ते म्हणाले, “रक्तदाबाची तपासणी ही प्रत्येक प्रौढ व्यक्तींमध्ये नियमित आरोग्य तपासणीचा एक भाग असावी. कोलेस्ट्रॅालची तपासणीही प्रौढ वयात सुरू करता येते आणि त्यानंतरची वारंवारता ही एखाद्या व्यक्तीला असलेल्या धोक्यावर अवलंबून असते. कुटुंबात कमी वयात हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॅाल फार वाढण्याची समस्या असल्यास नियमितपणे तपासणी करण्याची आवश्यकता असते.”

हृदयरोग टाळण्यासाठी तारुण्यातच प्रयत्न सुरू करणं आवश्यक ठरतं, असं तज्ज्ञ सांगतात.

हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास काय काळजी घ्यावी याबद्दल सांगताना डॉ. लक्ष्मण गायकवाड म्हणाले, ” हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास हा एक धोकादायक घटक आहे. एखाद्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना कमी वयात हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका आला असल्यास त्या व्यक्तीला अधिक धोका असू शकतो. अशा परिस्थितीत रक्तदाब,कोलेस्ट्रॅाल आणि इतर जोखीम घटकांचे मूल्यांकन लवकर करणं योग्य ठरतं. काही वेळा अनुवंशिकतेनं येणाऱ्या कोलेस्ट्रॅाल विकारांचीही तपासणी करण्याची गरज भासते.”

ते सांगतात, ” चाळीशीपूर्वीच छातीत जडपणा, वेदना, विशेषतः हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे या वेदना पसरत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अचानक दम लागणे, घाम येणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, छातीत धडधड होणे अशी लक्षणेही महत्त्वाची आहेत. अशी लक्षणे अचानक सुरू झाल्यास तातडीची वैद्यकीय मदत घ्यावी.”

डॉ. गायकवाड म्हणाले, “चाळीशीपूर्वी हृदयविकाराचा धोकाच नसतो, हा एक गैरसमज आहे. प्रत्येक तरुण व्यक्तीला हृदयाच्या विशेष तपासण्या करण्याची गरज नसली तरी रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल, रक्तातील साखरेची पातळी, वजन आणि जीवनशैली याकडे लहान वयापासून लक्ष दिल्यास भविष्यातील हृदयविकाराचा धोका ओळखण्यास आणि तो कमी करण्यास मदत होऊ शकते.”

तरुण वयात वाढलेलं कोलेस्ट्रॉल किती गंभीर असू शकतं?

ज्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची जोखीम वाढवणारे घटक आधीपासूनच आहेत, त्यांनी तपासणीसाठी 40 वर्षांपर्यंत थांबण्याची गरज नाही.

यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वजन असणं किंवा लठ्ठपणा असलेले लोक, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेले, धूम्रपान करणारे, मूत्रपिंडाचे आजार असलेले किंवा कोलेस्ट्रॉलशी संबंधित गंभीर समस्या असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.

लहान वयात हृदयविकार झालेल्या कुटुंबीयांचा इतिहास असणं हेही तपासणी लवकर सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण आहे. अशा व्यक्तींनी विशिष्ट वयाची वाट पाहण्याऐवजी जोखीम वाढवणारे घटक लवकर ओळखून त्यांचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे.

Lp(a) किंवा लिपोप्रोटीन (a) हा अनुवंशिकतेशी संबंधित हृदयविकाराची जोखीम वाढवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची पातळी प्रामुख्यानं जीवनशैलीपेक्षा अनुवंशिकतेवर अवलंबून असते. विशेषतः कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा इतिहास असल्यास प्रौढांनी आयुष्यात किमान एकदा तरी Lp(a) तपासणी करून घ्यावी. ही तपासणी हृदयविकाराचा धोका अधिक अचूकपणे समजून घेण्यास मदत करू शकते.

लठ्ठ माणूस

चाळीशीच्या आतच कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं ही धोक्याची घंटा ठरू शकते.

याबद्दल डॉ. वैभव देढिया यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. ते मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

ते म्हणाले, ” कोलेस्ट्रॉलचं मूल्यमापन करताना त्याची पातळी आणि ती किती काळ वाढलेली राहते हे तपासणं दोन्ही महत्त्वाचं असतं. LDL कोलेस्ट्रॉलमध्ये अगदी किरकोळ वाढ असली तरी ती अनेक वर्षे कायम राहिल्यास त्याचं महत्त्व वाढतं. म्हणूनच एखादी व्यक्ती तरुण आहे म्हणून वाढलेल्या कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करता कामा नये. “

डॉ. वैभव देढिया पुढं सांगतात, “LDL ची पातळी 190 mg/dL किंवा त्याहून अधिक असल्यास त्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. अशावेळी आनुवंशिक हायपरकोलेस्टेरोलेमिया (Familial Hypercholesterolaemia) यासारख्या स्थितींचा विचार करावा लागतो. एकूणच, कोलेस्टेरॉल सातत्याने वाढलेलं असल्यास मध्यम वयाची वाट पाहण्याऐवजी त्यावर लवकर उपाय करणं गरजेचं आहे.”

आरोग्य चांगलं राहाण्यासाठी नियमित कार्डिओ व्यायाम आणि स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आवश्यक आहे.

डॉ. वैभव देढिया यांनी बीबीसी मराठीच्या प्रश्नांची उत्तरं विस्तृत दिली आहेत. तारुण्यात जीवनशैली चांगली असल्यास भविष्यातला धोका टाळता येतो असं त्यांनी सांगितलं.

प्रश्न- 20 आणि 30 च्या दशकातील जीवनशैलीतील बदल पुढील आयुष्यातील हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात का?

डॉ. वैभव देढिया- नक्कीच. हृदयविकाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न हा दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण असतो. आपल्या 20 आणि 30 व्या वर्षांत लागलेल्या सवयी आणि जोखीम घटकांचा परिणाम पुढील अनेक दशकांवर होऊ शकतो. जितक्या लवकर आपण वजन, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो आणि तंबाखूपासून दूर राहतो, तितका जास्त फायदा आयुष्यभर मिळू शकतो.

प्रतिबंध घालणं म्हणजे आजारीच लक्षणं दिसू लागल्यानंतर किंवा 40-50 वर्षांचं वय झाल्यानंतर सुरू करायची गोष्ट नाही. जितक्या लवकर हे बदल केले जातील तितकी दीर्घकालीन जोखीम कमी करण्याची संधी उपलब्ध होते

प्रश्न- हृदयाचं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी किती व्यायाम आवश्यक आहे? स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचं महत्त्व किती?

डॉ. वैभव देढिया- आठवड्याला 150 ते 300 मिनिटं मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करणं हा एक योग्य मानला जाऊ शकतो. यामध्ये भरभर चालणं, सायकल चालवणं किंवा नियमित करता येतील असे इतर एरोबिक व्यायाम समाविष्ट होतात. यासोबतच आठवड्यात किमान दोन वेळा स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करणंही महत्त्वाचं आहे. हृदयाचं आरोग्य केवळ कार्डिओ एक्सरसाइजवर अवलंबून नसतं. स्नायूंची ताकद टिकवून ठेवणं आणि दैनंदिन जीवनात सक्रिय राहणंही तितकंच आवश्यक असतं. अधूनमधून तीव्र व्यायाम करण्यापेक्षा सातत्याला अधिक महत्त्व आहे.

दिवसातून एकदा तासभर व्यायाम केला म्हणजे आपण सुरक्षित आहोत असं नाही. दिवसभर बसून राहणं योग्य नाही. सतत हालचाल करत राहणं आवश्यक आहे.

प्रश्न- झोप, तणाव आणि सतत बसून राहणं यांचा तरुणांच्या हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

डॉ. वैभव देढिया- या तिन्ही गोष्टी इथं विचारात घेतल्या पाहिजेत. अपुरी झोप आणि दीर्घकाळाचा तणाव हे शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर (Metabolic Health) विपरीत परिणाम करू शकतात आणि कालांतरानं हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. सतत बसून राहणं हाही एक धोका आहे, विशेषतः ज्या व्यक्ती दिवसाचा बराच वेळ डेस्कवर काम करत घालवतात त्यांच्यासाठी तो धोका वाढतो.

म्हणून केवळ दिवसातील एकदा व्यायाम करणं पुरेसं नाही. दिवसभर हालचाल करणं, दीर्घकाळ बसून राहणं टाळणं, पुरेशी झोप घेणं आणि तणावाचं व्यवस्थापन करणंही तेवढंच गरजेचं आहे.

प्रश्न- 40 वर्षांखालील लोकांमध्ये हृदयविकाराबाबत कोणते गैरसमज आढळतात?

डॉ. वैभव देढिया- सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे तरुण वय म्हणजे हृदय निरोगी असणारच. तसंच, एखादी व्यक्ती सडपातळ आहे म्हणजे तिला हृदयविकाराचा धोका नाही, असंही नाही.

हृदयाचं आरोग्य जपणं ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि हृदयविकाराची जोखीम वाढवणारे अनेक घटक बरीच वर्षं कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता वाढत राहू शकतात. म्हणून एखाद्या विशिष्ट वयाची किंवा लक्षणांची वाट न पाहता रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, जीवनशैली आणि कुटुंबातील वैद्यकीय इतिहास यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे.”

चाळीशीपूर्वी काय करता येईल?

  • तुमची रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर यांची पातळी जाणून घ्या.
  • धूम्रपान करू नका.
  • नियमित व्यायाम करा.
  • वजन निरोगी मर्यादेत ठेवा.
  • हृदयासाठी पोषक असा संतुलित आहार घ्या.

तरुण आहोत म्हणून छातीत अस्वस्थता जाणवणं, धाप लागणं, बेशुद्ध पडणं किंवा हृदयाची धडधड वाढणं यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC