Source :- BBC INDIA NEWS

आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या मागे गेलेली दोन वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाली आहे.
ही घटना दोंडावका पंचायतमधील सीएच अग्रहारम येथील पामवृक्षांच्या मळ्यात घडली आहे. बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे. तपास पथकाकडून युद्ध पातळीवर तिचा शोध घेतला जात आहे.
अनेक दिवस उलटून गेले तरी ज्ञानेश्वरीचा कोणताच ठावठिकाणा लागलेला नाही. तिचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस, ड्रोन पथके आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहेत.
40 एकर पाम वृक्षाच्या लागवडीखालील क्षेत्रात आणि 500 एकर डोंगराळ भागात शोधमोहीम सुरू आहे.
खराब हवामान असूनही ही शोधमोहीम सुरू आहे.
पाम वृक्षाच्या बागा, दाट झुडपे, कालवे, तलाव, विहिरी आणि रिकाम्या घरांची तपासणी केली जात आहे. एखादं मूल सापडू शकेल अशी प्रत्येक ठिकाणाचा शोध घेतला जात आहे.
सामान्य बेपत्ता प्रकरणांपेक्षा या प्रकरणात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवूनही मुलीचा मागमूस लागत नसल्याने हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे.
आतापर्यंतची शोधमोहीम कशी सुरू आहे? पोलिसांची पुढील योजना काय आहे?
‘त्या’ दिवशी नेमकं काय झालं होतं?
दोन वर्षांची ज्ञानेश्वरी 6 जून रोजी बेपत्ता झाली. तिचे वडील सुनकार गणेश काकीनाडा जिल्ह्यातील दोंडावका पंचायतमधील सीएच अग्रहारम येथील पाम वृक्षाच्या बागेत (मळा) देखरेखीचे (केअरटेकर) काम करतात. त्यांचं कुटुंबही त्याच ठिकाणी वास्तव्यास आहे.
गणेश, त्यांची पत्नी भवानी, दोन वर्षांची ज्ञानेश्वरी तसेच सहा महिन्यांची आणखी एक मुलगी आणि गणेश यांचे आई-वडील असे सर्वजण त्या 40 एकरांच्या पाम वृक्षाच्या मळ्यात राहतात. त्यांचं सुमारे 700 चौरस फुटांचं दोन मजली घर मळ्याच्या अगदी मध्यभागी आहे.
6 जून रोजी नेमकं काय झालं होतं, याची माहिती ज्ञानेश्वरीचे आई-वडील भवानी आणि गणेश यांनी बीबीसीला दिली.

ज्ञानेश्वरीची आई भवानी यांनी सांगितलं की, “शनिवारी सकाळी ज्ञानेश्वरी आमच्यासोबत होती. तिचे वडील बागेत कामासाठी चालले होते. ते जात असताना ज्ञानेश्वरीही त्यांच्या मागे थोड्या अंतरावर चालत गेली होती, पण त्यांनी तिला परत आणलं.”
“मी धाकट्या मुलीला आंघोळ घालत असताना त्यांनी ज्ञानेश्वरीला घराजवळ सोडलं आणि आपण बागेत कामाला चाललोय, तोपर्यंत तिच्याकडे लक्ष ठेव, असं त्यांनी मला सांगितलं.”
“मी ज्ञानेश्वरीला उचलून घेतलं, पण वडील जात असल्यामुळे ती रडू लागली. त्याच वेळी धाकटी मुलगीही मोठमोठ्याने रडत होती. त्यामुळे तिला दूध पाजण्यासाठी मी घरात गेले. ज्ञानेश्वरी नेहमी घराभोवती खेळत असते किंवा वडिलांसोबत असते.”
ज्ञानेश्वरीच्या आई-वडिलांनी म्हणण्यानुसार, ती वडिलांच्या मागे मागे बागेत गेली आणि बागेच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरून अचानक बेपत्ता झाली.
6 जूनपासून शोध सुरू, तरी ज्ञानेश्वरी बेपत्ता
शोध मोहिमेची माहिती देताना गृहमंत्री वंगलपुडी अनिता म्हणाल्या की, “मुलगी सकाळी सुमारे 11.50 वाजता घराबाहेर जाताना दिसली होती. तेव्हापासून ती परत आलेली नाही.”
“तिचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील पोलिसांनाही शोधमोहिमेत सहभागी करून घेतलं आहे.”
“आम्ही डोंगराळ भागातून शोधमोहीम सुरू केली आहे. वन्यजीव संरक्षणात तज्ज्ञ असलेल्या ‘हनुमान टीम’लाही या मोहिमेत सहभागी करून घेतलं आहे. पोलीस अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार, या जंगलात खाली जाण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे.”

‘कोणताच सुगावा हाती नाही’
मुलीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, “लोकांकडून मिळणाऱ्या विविध सूचनांची आम्ही दखल घेत आहोत. घरोघरी जाऊन तपासणी केल्यामुळे काही ग्रामस्थांना याचा त्रास झाला आणि काहींनी आमच्यावर टीकाही केली. तरीही, आम्ही आसपासच्या सर्व गावांमध्ये कसून तपासणी करत आहोत.”
मंत्र्यांनी सांगितलं की, मुलीला एखादा जंगली प्राणी घेऊन गेला का किंवा तिचे अपहरण झाले, यादृष्टीनेही तपास केला जात आहे.

साधारणपणे हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये काही तासांतच त्याव्यक्तीच्या ठावठिकाण्याबद्दल एखादा धागादोरा किंवा माहिती मिळते. पण, या प्रकरणात अनेक दिवस उलटूनही कोणताही पुरावा न मिळाल्याने तपास अधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तुनी परिसरात यापूर्वी इतकी मोठी शोधमोहीम कधीही राबवण्यात आली नव्हती. तसेच, या भागात मुलांच्या अपहरणाची अशी कोणतीही घटना घडल्याची त्यांना माहितीही नाही.
कुंपणावर बांधलेल्या बाहुल्या
पोलीस मुलीला एखादा जंगली प्राणी घेऊन गेला का, या दृष्टीनेही तपास करत आहेत. कारण ही घटना जंगलालगतच्या पामवृक्षाच्या बागेत घडली आहे. परिसरात प्राण्यांचा वावर आहे का, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी काही खेळणी आणि बाहुल्या बागेच्या कुंपणाला बांधून ठेवली आहेत.
परंतु, बागेच्या कुंपणाला बांधलेल्या बाहुल्या आणि खेळण्यांबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
परिसरात एखादा जंगली प्राणी येतो का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी या बाहुल्या आणि खेळणी ठेवली असल्याचे सांगण्यात आल्याचे ज्ञानेश्वरीची आई भवानी यांनी सांगितलं.

पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
तपासासाठी मोबाईल डेटा, फोन कॉलची नोंद आणि स्थानिक माहितीचेही विश्लेषण केले जात आहे.
स्थानिक रहिवासी चिन्ना राव म्हणाले की, “इथे केवळ स्थानिक लोकच राहतात. बहुतेक लोक 10 किलोमीटरच्या परिसरातूनच येतात. या बाजूच्या गावांतून सुमारे 10 जण आणि दुसऱ्या बाजूनेही 10 जण येतात. या परिसराबाहेरील कोणी येथे येत नाही.”
कुत्र्याच्या मृत्यूमुळे वाढले गूढ
तिच्यासोबत असलेल्या आणि नंतर परत घरी आलेल्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे या प्रकरणात आणखी एक गूढ निर्माण झाले आहे.
ज्ञानेश्वरीच्या आई म्हणाल्या, “कुत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे माझी चिंता आणखी वाढली आहे. माझी मुलगी परत येईल का, ती कुठे आहे आणि कशी आहे, याबद्दल आता अधिक काळजी वाटत आहे.”
त्या म्हणाल्या, ‘मला कोणावरही संशय नाही’. तसेच, आजूबाजूच्या परिसरात आमची कोणाशी विशेष अशी ओळखही नव्हती. त्या दिवशी नेमकं काय घडलं असेल, याची कल्पनाही करू शकत नाही.”

गृहमंत्री वंगलपुडी अनिता म्हणाल्या की, “मागील सहा महिन्यांपासून कुटुंबाने पाळलेला कुत्रा घरी परतल्यानंतर विचित्र म्हणजे असामान्यपणे वागत होता. काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत.”
“तसेच त्याचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठीही पाठवण्यात आला आहे. कुत्र्याला साप चावला होता का, याबाबत डॉक्टरांना विचारलं असता, प्राथमिक तपासणीत तसे कोणतेही संकेत आढळून आले नाहीत.”
तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू
इतके प्रयत्न करूनही ज्ञानेश्वरीचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनत चालले आहे.
जसजसे दिवस जात आहेत, तशी ज्ञानेश्वरीच्या प्रकृतीची चिंता कुटुंबीयांना अधिक सतावत आहे.

शेकडो जवान, ड्रोन, शोध पथके, एसडीआरएफ-एनडीआरएफची मदत आणि तांत्रिक तपास अशा जवळपास सर्वच उपलब्ध साधनांचा वापर पोलिसांनी केला आहे. तरीही, ज्ञानेश्वरीचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
तपासाचे क्षेत्र वाढवणार असून तांत्रिक पुराव्यांचीही अधिक सखोल तपासणी करणार असल्याचे पेद्दापूरमचे डीएसपी एबीजी तिलक यांनी बीबीसीला सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




