Home LATEST NEWS ताजी बातमी 20 कोटी वर्षांपूर्वीच्या महाकाय डायनासोर्सच्या पाऊलखुणा, तेलंगणामध्ये संशोधकांना सापडले महत्त्वाचे पुरावे

20 कोटी वर्षांपूर्वीच्या महाकाय डायनासोर्सच्या पाऊलखुणा, तेलंगणामध्ये संशोधकांना सापडले महत्त्वाचे पुरावे

2
0

Source :- BBC INDIA NEWS

डायनासोर्सच्या महाकाय पाऊलखुणा

तेलंगणामध्ये संशोधकांना अतिशय विशालकाय डायनासोर एकापाठोपाठ एक चालत गेल्याचे पुरावे सापडले आहेत. येथे त्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.

मंचेरियल जिल्ह्यातल्या कन्नेपल्ली मंडळातलं सालीगाव सध्या एका ऐतिहासिक शोधामुळे चर्चेत आलं आहे.

इथे मोठ्या डायनासोर्सच्या पाऊलखुणांसोबतच त्यांच्या लहान पिल्लांच्या पावलांचे ठसेही संशोधकांना मिळाले आहेत.

लाखो वर्षं झाली तरी चुनखडीच्या खडकांवर उमटलेले हे प्राचीन ठसे आजही अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.

तेलंगणामधील गोदावरी-प्राणहिता खोऱ्यात यापूर्वी डायनासोरची हाडे सापडलेली असताना आता नव्या संशोधनातून त्यांच्या पावलांचे ठसे समोर आले आहेत.

हे ठसे सुमारे 200 दशलक्ष (20 कोटी) वर्षांपूर्वीच्या जुरासिक काळातील डायनासोर्सचे असावेत असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

14 महाकाय पाऊलखुणा

सालीगावच्या शिवारात चुनखडीच्या खडकांवर डायनासोरच्या पावलांचे हे ठसे सापडले आहेत. या जागेवर एकूण 14 मोठ्या पाऊलखुणा आहेत.

इतकंच नाही तर आजूबाजूला लहान डायनासोर्सच्या पिल्लांच्या पायांचे जवळजवळ 50 ठसेही विखुरलेले पाहायला मिळाले आहेत.

“हे ठसे नक्कीच डायनासोर्सचे आहेत आणि तिथे दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या डायनासोर्सच्या पाऊलखुणा आहेत,” असं भारताचे प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आणि दिल्ली विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक जी.व्ही.आर. प्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं.

तेलंगणामध्ये पहिल्यांदाच मान्यता

या प्राचीन पाऊलखुणांचा शोध आणि अभ्यास सर्वप्रथम बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) वरिष्ठ संशोधन अभ्यासक संगीता दासगुप्ता आणि दुसरे संशोधक अँटनी पॉल रोझारिओ यांनी केला.

“2013 च्या काळात मी जेव्हा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून माझी पीएचडी करत होते तेव्हा मंचेरियल भागात डायनासोरच्या पावलांचे ठसे असल्याचं मला समजलं होतं.

पण ते ठसे नेमके किती मोठ्या प्रमाणावर पसरले होते किंवा विज्ञानाच्या दृष्टीने त्यांचं नक्की काय महत्त्व आहे याची त्यावेळी आम्हाला अजिबात कल्पना नव्हती,” असं त्यांनी सांगितलं.

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.व्ही.आर. प्रसाद

पुढे संगीता यांनी बीबीसीला ईमेल द्वारे माहिती दिली की, 2020 ते 2022 दरम्यान त्या जेव्हा आयआयटी मुंबईत होत्या तेव्हा त्यांनी आपल्या पोस्ट-डॉक्टरेट संशोधनाचा एक भाग म्हणून यावर अभ्यास केला होता.

त्यांच्या याच प्रयत्नांमुळे डायनासोरच्या पावलांचे हे प्राचीन ठसे जगासमोर येऊ शकले. या संशोधनाचे निष्कर्ष मार्च 2025 मध्ये ‘जर्नल ऑफ हिस्टोरिकल बायोलॉजी’ या नियतकालिकात (जर्नल) प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

“आमच्या या संशोधनामुळे डायनासोर्सवर पुढे आणखी अभ्यास करायला मदत होईल. आतापर्यंत झालेल्या संशोधनांमध्ये मोठ्या संख्येने डायनासोरची हाडं सापडली आहेत. पण आता त्यांच्या पावलांचे ठसेही सापडल्यामुळे लाखो वर्षांपूर्वी डायनासोर कसे राहायचे, कसे चालायचे आणि समूहाने एकत्र कसे वावरायचे यांसारख्या विषयांवरील संशोधनाचे दरवाजे उघडले आहेत,” असे संगीता दासगुप्ता यांनी सांगितले.

डायनासोरच्या पाऊलखुणा

“जिथे हे ठसे सापडले आहेत तिथे वावरणारे ‘थेरोपॉड’ प्रजातीचे डायनासोर ताशी साधारण 3.82 किलोमीटरच्या वेगाने धावायचे असा आमचा अंदाज आहे.

तर सॉरोपॉड (Sauropod) प्रजातीच्या डायनासोरच्या पाऊलखुणा असलेली जागा 14 मीटर लांब आहे. हे डायनासोर ताशी 2.3 किलोमीटर वेगाने चालू शकत होते असे आमच्या संशोधनातून समोर आले आहे,” अशी माहिती संगीता दासगुप्ता यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

‘जुरासिक काळातील ठसे’

डायनासोरच्या पावलांचे हे ठसे ज्या चुनखडीच्या खडकांवर उमटले आहेत ते खडक सालीगावच्या उत्तर-पूर्व भागातल्या प्राणहिता-गोदावरी गोंडवाना खोऱ्यात तयार झाले आहेत.

संशोधकांच्या मते, हे ठसे सुरुवातीच्या जुरासिक काळातले म्हणजेच जवळपास 20 कोटी वर्षं जुने आहेत. विज्ञानाच्या भाषेत याला फॉसिल फुटप्रिंट्स (अश्मीभूत पाऊलखुणा) म्हणतात.

“आमच्या संशोधनादरम्यान, आम्ही चार वेगवेगळ्या मार्गांवर डायनासोरच्या पावलांचे हे जुने ठसे शोधून काढले आहेत,” असे संगीता यांनी स्पष्ट केले.

मोठे डायनासोर चालत गेले

या पाऊलखुणांबद्दल माहिती मिळताच बीबीसी प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तिथे एकाच दिशेने जात असलेले 14 मोठ्या पावलांचे ठसे दिसतात.

तेलंगणाचे जीवाश्म शास्त्रज्ञ (पॅलेओन्टोलॉजिस्ट) समुद्रला सुनील यांनी बीबीसीला सांगितले की, “हे ठसे सॉरोपॉड आणि थेरॉपॉड या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या डायनासोर्सचे आहेत.”

डायनासोरच्या पाऊलखुणा

“इथले ठसे पाहून असं वाटतं की, आधी एक लहान डायनासोर चालत गेला असावा आणि त्यानंतर तिथून सॉरोपॉड डायनासोर गेला. म्हणूनच इथे लहान डायनासोर्सचे फक्त काहीच ठसे शिल्लक राहिलेत. म्हणजेच लहान डायनासोरच्या पावलांवरच मोठ्या डायनासोरने पाय ठेवल्यामुळे तिथे हे मोठे ठसे उमटले आहेत,” असं सुनील यांनी सांगितलं.

“यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सॉरोपॉड डायनासोर तिथून पुढे निघून गेल्यावर मागून थेरॉपॉड डायनासोर आले असावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सुनील यांनी सांगितले की, “सॉरोपॉडच्या ठशांवर थेरॉपॉड डायनासोरच्या पायांचे निशाण अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतात. सॉरोपॉड डायनासोरचा पाय हा हत्तीच्या पायासारखा गोल दिसतो. तर थेरॉपॉड डायनासोरच्या पायाला पुढच्या बाजूला तीन बोटं असतात.”

लहान डायनासोर्सच्या विखुरलेल्या पाऊलखुणा

या मोठ्या पाऊलखुणांशिवाय, तिथे अनेक लहान पावलांचे ठसेही आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे ठसे एकाच दिशेने जाणारे नव्हते. तर वेगवेगळ्या दिशेने उमटलेले होते.

जीवाश्म शास्त्रज्ञ समुद्रला सुनील यांनी सांगितलं की, “तिथे लहान डायनासोर्सच्या सुमारे 50 पाऊलखुणा आहेत. ही पिल्लं वेगवेगळ्या दिशांना खेळत पळत असताना हे ठसे उमटले असावेत, असा अंदाज आहे.”

जीवाश्म संशोधक समुद्रला सुनील यांच्या मते, सॉरोपॉड डायनासोरच्या पावलांचे ठसे हे हत्तीच्या पायासारखेच दिसतात.

दोन-दोन फुटांचं अंतर

एखाद्या माणसाला डायनासोरच्या या पावलांच्या ठशांवरून पाऊल टाकत चालणं जरा अवघडच आहे, कारण ते एकमेकांपासून बरेच लांब आहेत.

डायनासोर खूप मोठे असल्यामुळे त्यांच्या पावलांमधील अंतर साधारण दोन ते अडीच फूट इतके आहे.

“या पाऊलखुणा 55-73 सेंटीमीटर लांब आणि 37-49 सेंटीमीटर रुंद आहेत,” असं संगीता दासगुप्ता यांनी आपल्या शोधनिबंधात नमूद केलं आहे.

हे ठसे कसे तयार झाले? आजही सुरक्षित कसे?

सालीगावच्या आसपासच्या भागात चुनखडीचे खडक आहेत. जमिनीवरचे काही खडकांचे थर काढल्यानंतर एका विशिष्ट थरामध्ये डायनासोरच्या पावलांचे हे ठसे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहेत. यातल्या ‘सॉरोपॉड’ प्रजातीच्या डायनासोरच्या पावलांचे ठसे अगदी हत्तीच्या पावलांसारखे गोल आहेत.

थेरॉपॉड प्रजातीच्या डायनासोरच्या पाऊलखुणांमध्ये त्यांच्या पुढच्या बोटांचे ठसे स्पष्ट दिसतात. काही ठशांमध्ये तर त्यांच्या बोटांचे सांधे आणि नखं सुद्धा अगदी साफ पाहायला मिळतात. तिथे सापडलेला एक ठसा सुमारे अर्धा फूट खोल होता.

जीवाश्म शास्त्रज्ञ समुद्रला सुनील यांनी सांगितलं की, “तो सॉरोपॉड डायनासोरच्या पाऊलखुणाचा ठसा आहे. तो अतिशय वजनदार प्राणी असल्याने तिथल्या चिखलामुळे त्याचा पाय इतका खोलवर रुतला असावा.”

“डायनासोर जेव्हा तिथून चालत गेले तेव्हा त्या भागात सगळीकडे चिखल झाला असावा आणि म्हणूनच त्यांच्या पावलांचे हे ठसे तिथे तयार झाले,” असं समुद्रला सुनील यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “त्यानंतर कडक उन्हामुळे ती माती सुकली असेल आणि त्यामुळे हे ठसे तिथे कायमचे कोरले गेले. हा सगळा बदल व्हायला जवळजवळ 10 लाख वर्षं लागली असावीत.”

यापूर्वी राजस्थानमध्येही डायनासोरच्या पाऊलखुणा सापडल्याची माहिती प्राध्यापक जी.व्ही.आर. प्रसाद यांनी दिली.

प्राध्यापक प्रसाद म्हणाले की, “डायनासोर हे विविध खंडांवर राहणारे जीव होते. प्राणहिता-गोदावरी खोऱ्यात गोंडवानाचे खडक आहेत. त्याच कालखंडात हे जीवाश्म तयार झाले होते. ते सर्व नद्या आणि तलावांच्या जवळ जमा झाले होते.”

सॉरोपॉड आणि थेरॉपॉड डायनासोर नक्की काय आहेत?

डायनासोर्सच्या अनेक प्रजातींपैकी ‘सॉरोपॉड’ आणि ‘थेरॉपॉड’ हे त्यांचे अत्यंत मुख्य प्रकार मानले जातात, असं शास्त्रज्ञ सांगतात.

भारतात आतापर्यंत लागलेल्या शोधांवरून असं समोर आलं आहे की, जुरासिक काळात आणि त्यानंतरच्या काळात या दोन्ही प्रकारच्या डायनासोर्सचा इथे मोठा वावर होता. रोफेसर जी.व्ही.आर. प्रसाद यांनी बीबीसीला या दोन्ही प्रजातींमधला फरक समजावून सांगितला.

“सॉरोपॉड डायनासोर आकाराने खूप अवाढव्य होते. पृथ्वीच्या पाठीवर आजवर झालेल्या सगळ्यात मोठ्या प्राण्यांमध्ये सॉरोपॉड डायनासोर्सचा समावेश होतो. ते तब्बल 30 ते 40 मीटर उंच वाढू शकत होते आणि त्यांचं वजन जवळजवळ 70 ते 100 टन असायचं.

मांचेरियाल जिल्ह्यातील कन्नेपल्ली तालुक्यातील सालीगाव गावाच्या शिवारात त्या पाऊलखुणा सापडल्या आहेत.

या डायनासोर्सचं डोकं लहान असायचं आणि दात करवतीसारखे धारदार नसायचे. त्यांची मान आणि शेपूट खूप लांब असायची आणि ते चार पायांवर चालायचे. सॉरोपॉड जातीचे हे डायनासोर पूर्णपणे शाकाहारी होते,” असं स्पष्टीकरण जी.व्ही.आर. प्रसाद यांनी दिलं.

तसंच, ‘थेरॉपॉड’ डायनासोर हे मांसाहारी होते, असंही त्यांनी सांगितलं.

प्रसाद पुढे म्हणाले, “थेरॉपॉड डायनासोर्सचं डोकं आकाराने मोठं असायचं. त्यांचे पुढचे हात पाय अत्यंत लहान असल्यामुळे ते फक्त मागच्या दोन पायांवरच चालायचे. त्यांना एक लांब शेपूट असायची. त्यांची उंची साधारण 7 ते 12 मीटर आणि वजन 2 ते 9 टनांच्या आसपास असायचं. विशेष म्हणजे त्यांचे दात करवतीसारखे टोकदार असायचे.”

जी.व्ही.आर. प्रसाद यांनी पुढे सांगितलं की, “सॉरोपॉड डायनासोर जेव्हा चालायचे तेव्हा त्यांच्या पावलांचे ठसे अगदी हत्तीच्या पायासारखे उमटायचे. तर दुसरीकडे, थेरॉपॉड डायनासोर्सच्या पायाला पुढच्या बाजूला तीन बोटं असायची. पायांच्या या रचनेला विज्ञानाच्या भाषेत ‘ट्रायडॅक्टिलिझम’ म्हणतात.”

1970-80 च्या दशकात मिळाली मान्यता

तेलंगणामध्ये डायनासोर अस्तित्वात असल्याचा पुरावा गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वीच जगासमोर आला होता. प्राणहिता-गोदावरी खोऱ्यात डायनासोर्सचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.

1975 मध्ये, शास्त्रज्ञांना महाराष्ट्रातील सिरोंचा भागातील कोटा खडकांच्या थरांमध्ये ‘बराबियासॉरस टागोरी’ या सॉरोपॉड प्रजातीच्या डायनासोरची जुनी हाडं सापडली होती.

त्यानंतर तेलंगणामध्ये पहिल्यांदा सध्याच्या मांचेरियाल जिल्ह्यातील वेमनपल्ली भागात 1988 मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) चे शास्त्रज्ञ पी. यदगिरी यांच्याकडून पुन्हा एकदा डायनासोरच्या अवशेषांचा शोध लागला.

जिथे आता डायनासोरचे ठसे सापडलेत त्या सालीगावपासून वेमनपल्ली हे गाव साधारण 30 किलोमीटर दूर आहे.

प्राध्यापक जी.व्ही.आर. प्रसाद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “यदगिरी यांनी ज्या सॉरोपॉड डायनासोरचा शोध लावला होता त्याला ‘कोटासॉरस वेमनपल्लीएन्सिस’ असं नाव दिलं गेलं.

कोटासॉरस म्हणजे कोटा खडकांचा थर आणि हा शोध वेमनपल्ली गावात लागल्यामुळे त्याला ‘वेमनपल्लीएन्सिस’ असं नाव देण्यात आलं.”

यदगिरी यांच्या संशोधनाचे निष्कर्ष 2010 मध्ये ‘व्हर्टिब्रेट पॅलेओन्टोलॉजी’ (Vertebrate Paleontology) या अंकांत (जर्नल) प्रकाशित करण्यात आले होते. त्या तपशिलानुसार सध्याच्या मांचेरियाल जिल्ह्यातील वेमनपल्ली जवळील राजाराम गावाजवळ 12 डायनासोर्सची तब्बल 840 अश्मीभूत हाडे सापडली होती.

ही हाडे सुमारे 160 दशलक्ष (16 कोटी) वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. या शोधासाठी सुमारे 2400 घनमीटर क्षेत्रावर उत्खननाचे काम करण्यात आले होते, असे त्या शोधनिबंधात नमूद केले आहे.


या ठिकाणी तब्बल 12 डायनासोर्सची 840 जुनी हाडं सापडली आहेत

‘राक्षसी बोक्का’ जिथे हाडांचा शोध लागला ते ठिकाण

बीबीसीची टीम जिथे डायनासोरची हाडं सापडली होती प्रत्यक्षात तिथं गेली. ही जागा राजाराम गावापासून साधारण अडीच किलोमीटर दूर एका जंगलासारख्या भागात आहे.

तिथल्या तरुण मुलांना या जागेबद्दल काहीच कल्पना नाही. जेव्हा आम्ही गावात जाऊन याविषयी विचारणा केली तेव्हा तरुणांनी आपल्याला याबद्दल माहीत नसल्याचे सांगितले.

मात्र, गावातील काही वृद्धांनी आपल्याला ती जागा ठाऊक असल्याचे म्हटले. राजाराम गावातील लक्ष्मय्या आणि शंकर यांनी आम्हाला डायनासोरची हाडे सापडलेली ती जागा दाखवली.

ती जागा म्हणजे झाडाझुडपांनी वेढलेलं एक सुकलेलं तळं वाटतं. तिथली खोदलेली माती आजूबाजूलाच टाकलेली असल्यामुळे तिथे आता एक छोटासा खड्डा तयार झाला आहे. तिथले स्थानिक लोक या जागेला ‘राक्षसी बोक्का’ म्हणतात.

याबद्दल बोलताना लक्ष्मय्या यांनी सांगितलं की, “इथे राक्षसी आकाराच्या पालींची (म्हणजेच डायनासोरची) हाडं सापडली होती म्हणूनच या जागेला हे नाव पडलं.”

लक्ष्मय्या यांनी सांगितलं की, “खूप वर्षांपूर्वी त्यांनी इथे खोदकाम केलं होतं. त्या काळात इथे राक्षसी आकाराच्या पालींची हाडं मिळाल्याचं बोललं गेलं. ती लोकं इथे तंबू लावून कित्येक दिवस खोदकाम करत होती. मग इथे मिळालेली सगळी हाडं त्यांनी हैदराबादला नेली.”

राजाराम गावात मिळालेली डायनासोरची ही जुनी हाडं, 1988 मध्ये यदगिरी यांच्या टीमने हैदराबादला आणली आणि ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ विभागाकडे सुपूर्द केली. त्यानंतर ही हाडं ‘बी. एम. बिर्ला सायन्स सेंटर’मध्ये पाठवण्यात आली. तिथे या हाडांचा वापर करून डायनासोरचा एक मोठा सांगाडा बनवला गेला जो आजही तिथे येणाऱ्या लोकांसाठी प्रदर्शनात ठेवला आहे.

बी. एम. बिर्ला सायन्स म्युझियममध्ये लावलेल्या एका फोटोत दिसणारे डायनासोरचे अवशेष.

डायनासोरचा हा सांगाडा सध्या बिर्ला सायन्स सेंटरच्या ‘डायनोसोरिअम’ विभागात पाहायला मिळतो. जेव्हा खोदकाम झालं तेव्हा या डायनासोरचं डोकं मिळालं नव्हतं. बिर्ला सायन्स सेंटरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतल्या नॅचरल हिस्टरी म्युझियममधल्या एका प्रतिकृतीच्या आधारावर, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने हे डोकं बनवलं गेलं आणि सांगाड्याला जोडलं गेलं.

डायनासोरचा हा सांगाडा 14.2 मीटर लांब आणि 3.7 मीटर उंच आहे. जेव्हा हा डायनासोर जिवंत होता तेव्हा त्याचं वजन जवळपास 40 टन असावं, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

सालीगावमध्ये जिथे डायनासोरचे ठसे सापडलेत ती जागा आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं संशोधक सांगत आहेत.

बिर्ला सायन्स सेंटरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतल्या नॅचरल हिस्टरी म्युझियम मधल्या एका प्रतिकृतीच्या आधारावर, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने हे डोकं बनवलं गेलं आणि सांगाड्याला जोडलं गेलं.

समुद्रला सुनील यांनी याबद्दल चिंता व्यक्त करत म्हटलं की, “हा चुनखडीच्या खडकांचा भाग असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात खोदकाम चालतं. इथे मिळणारे दगड लोक घराचा पाया बांधण्यासाठी घेऊन जातात. त्यामुळे ही जागा वाचवण्यासाठी सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे.”

या विषयावर अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने मांचेरियाल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार दीपक यांच्याशी संपर्क साधला आहे.

डायनासोरच्या पावलांचे ठसे असलेल्या या भागात कोणत्याही प्रकारचं खोदकाम रोखण्यासाठी आम्ही कडक पावलं उचलणार आहोत.

परवानगीशिवाय खोदकाम करण्यास सक्त मनाई आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांनाही सतर्क केले असून तिथे कोणत्याही प्रकारच्या खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही याची खात्री आम्ही करू,” असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC