Home LATEST NEWS ताजी बातमी 6 महिन्यांच्या बाळावर पिटबुलचा हल्ला; कुत्र्यांच्या धोकादायक प्रजातींबाबत भारतात काय नियम आहेत?

6 महिन्यांच्या बाळावर पिटबुलचा हल्ला; कुत्र्यांच्या धोकादायक प्रजातींबाबत भारतात काय नियम आहेत?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

पिटबुल

फोटो स्रोत, Renee DeKona/MediaNews Group/Boston Herald via Getty Images

प्राण्यांमध्ये कुत्र्याला माणसाचा सर्वात चांगला मित्र मानलं जातं. परंतु, प्रत्येक कुत्रा माणसासाठी सुरक्षित असेलच असंही नाही. जगात काही कुत्र्यांच्या जाती अत्यंत धोकादायक मानल्या जातात.

भारतामध्येही अलीकडच्या काळात पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये काही लोक गंभीर जखमी झाले आहेत, तर काही घटनांमध्ये लोकांचा मृत्यूही झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारतामध्ये कुत्र्याने चावल्याच्या 37 लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे.

2025 च्या पहिल्याच महिन्यात कुत्रा चावल्याच्या 4 लाख 29 हजार 664 घटनांची नोंद झाली. परंतु, ही केवळ नोंद झालेल्या घटनांचीच आकडेवारी आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांची नोंदच होत नाहीत, असंही मानलं जातं.

दिल्लीजवळच्या सोनीपत इथं नुकतीच एक गंभीर घटना घडल्यानं पुन्हा एकदा यावर चर्चेला जोर आला आहे.

पिटबुलच्या हल्ल्यात 6 महिन्यांचं बाळ जखमी

दिल्लीजवळच्या सोनीपत येथील सिक्का कॉलनीत 14 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी शेजाऱ्याच्या पाळीव पिटबुलने 6 महिन्यांच्या बाळावर हल्ला केला.

बाळाची आत्या त्याला कडेवर घेऊन रस्त्यावरून फिरत होती. त्याचवेळी अचानक कुत्रा बाहेर आला आणि त्याने त्यांच्यावर झडप घातली.

या हल्ल्यात बाळाला शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. सध्या बाळावर रोहतकच्या पीजीआयएमएस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आत्या देखील जखमी झाली. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणी कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

सध्या या प्रकरणी कुटुंबाने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर पिटबुलसारख्या धोकादायक मानल्या जाणाऱ्या कुत्र्यांच्या जातींबाबत भारतातील नियम, कुत्र्यांच्या मालकांची जबाबदारी आणि सार्वजनिक सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वीही कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना

यापूर्वीही पिटबुलच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

ऑगस्ट 2026 मध्ये पंजाबमधील पटियाला येथील घुम्मन नगरमध्ये एका जोडप्यावर पिटबुलने हल्ला केला होता. अंकित सभरवाल आणि त्यांची पत्नी शेफाली भाड्याने घर पाहण्यासाठी गेले होते.

गेट उघडताच तो कुत्रा बाहेर आला आणि त्याने दोघांवर झडप घातली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

2024 मध्ये भारतात कुत्र्याने चावा घेतल्याच्या 37 लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे.

फोटो स्रोत, Peerapon Boonyakiat/SOPA Images/LightRocket via Getty Images

ऑगस्ट 2025 मध्ये चेन्नईत शेजाऱ्याच्या पिटबुल कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 55 वर्षीय करुणाकरण यांचा मृत्यू झाला होता. घरी परत येत असताना कुत्र्याने त्यांचा चावा घेतला. या घटनेत कुत्र्याचा मालकही जखमी झाला. पोलिसांनी निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

2022 मध्ये उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्याची घटना खूप चर्चेत आली होती. पिटबुलने आपल्याच 82 वर्षीय मालकिणीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या महिला गंभीर जखमी झाल्या आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

पिटबुल प्रजाती कुठली?

बीबीसी न्यूज हिंदीच्या 2022 मधील एका व्हीडिओनुसार पिटबुल या कुत्र्यांच्या प्रजातीची उत्पत्ती 19 व्या शतकात इंग्लंडमध्ये झाली. त्या काळात या कुत्र्यांचा वापर मनोरंजनासाठी केला जात असत.

या कुत्र्यांची बंदिस्त जागेत बांधलेल्या बैल, वळू किंवा अस्वलाशी झुंज लावली जात असत.

1835 मध्ये या खेळावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर या कुत्र्यांची एकमेकांशी झुंज लावण्याचा प्रकार सुरू झाला. या प्रकारावर बहुतांश देशांमध्ये बंदी आहे. तरीही कुत्र्यांच्या झुंजीचे बेकायदेशीर प्रकार अधूनमधून अजूनही समोर येतात.

पिटबुल

फोटो स्रोत, Roy Rochlin/Getty Images for Westminster Kennel Club

1960च्या दशकात अमेरिकेत ड्रग्ज तस्करांनी पिटबुल पाळायला सुरुवात केली.

पिटबुलचे जबडे मजबूत असतात. त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता जास्त असते आणि त्यांच्यात शिकार करण्याची प्रवृत्ती दिसते. हे मध्यम आकाराचे, मजबूत शरीरयष्टी आणि सुदृढ स्नायू असलेले शक्तिशाली कुत्रे असतात.

अनेक मालक पिटबुलचं वर्णन विश्वासू आणि कुटुंबासोबत राहणारा कुत्रा म्हणून करतात. पण, योग्य प्रशिक्षण आणि इतर माणसांमध्ये मिसळण्याची सवय नसल्यास, त्याचबरोबर योग्य नियंत्रण नसल्यास, ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

पिटबुलच्या हल्ल्यातून वाचणं कठीण का मानलं जातं?

  • पिटबुल जातीच्या कुत्र्यांना साधारणपणे आक्रमक का मानलं जातं?

याबाबत पेटा इंडियाचे प्रवक्ते सचिन एस. बंगेरा यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, पिटबुल जातीच्या कुत्र्यांना पूर्वीपासूनच ताकदवान आणि लढण्यासाठी तयार केले जात असत. बैलांना काबूत ठेवण्यासाठी आणि नंतर इतर कुत्र्यांशी झुंज देण्यासाठी त्यांची निवडक पद्धतीने पैदास केली जात होती.

त्यामुळे या कुत्र्यांमध्ये अफाट शारीरिक ताकद, मजबूत पकड आणि शिकार पकडल्यानंतर त्याला सहज न सोडण्याची प्रवृत्ती दिसते.

पण, ते असंही सांगतात की कोणत्याही कुत्र्याचं वर्तन केवळ त्याच्या जातीवरच ठरत नाही. त्याचा स्वभाव, इतरांमध्ये मिसळण्याची सामाजिक सवय, प्रशिक्षण, देखभाल आणि आजूबाजूचं वातावरण याचाही त्याच्यावर मोठा परिणाम होतो.

मात्र, स्वतंत्रपणे काम करणाऱ्या प्राणी हक्क कार्यकर्त्या सराहना यांचं म्हणणं आहे की, अनेक लोक पिटबुलसारखे कुत्रे प्रतिष्ठा दाखवण्यासाठी (स्टेटस सिम्बॉल) पाळतात.

त्यांच्या मते, अशा कुत्र्यांना जन्मापासूनच आक्रमक वर्तनाचं प्रशिक्षण दिलं जातं. तसेच, त्यांना आईपासून लवकर वेगळं केलं जातं. याचा त्यांच्या वर्तनावरही परिणाम होतो.

त्या असंही म्हणतात की, वय वाढल्यानंतर हे कुत्रे अशक्त झाले की काही मालक त्यांना सोडून देतात. पण, या जातीच्या कुत्र्यांना आश्रयगृहात इतर कुत्र्यांसोबत ठेवण्यातही अडचणी येतात.

 पिटबुल टेरियर

फोटो स्रोत, MICHAL CIZEK/AFP via Getty Images

  • पिटबुलची पकड इतकी मजबूत कशी असते?

याबाबत पेटाचे बंगेरा सांगतात की, पिटबुलसारखे कुत्रे खूप शक्तिशाली आणि मजबूत स्नायू असलेले असतात. त्यांची छाती रुंद, जबडा मजबूत आणि तोंड मोठं असतं. त्यामुळे ते एखाद्या वस्तूला किंवा प्राण्याला घट्ट पकडण्यास सक्षम असतात.

एकदा हल्ला सुरू केल्यानंतर कुत्र्याला भक्ष्यापासून दूर करणं अत्यंत कठीण होतं.

त्यामुळे पिटबुलचा तीव्र हल्ला झाल्यास दुखापत खूप गंभीर होऊ शकते आणि काही वेळा जीवही जाऊ शकतो. विशेषतः लहान मुलांवर असा हल्ला झाल्यास धोका जास्त असतो.

भारतात पिटबुलबाबत काय नियम आहेत?

मार्च 2024 मध्ये केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले.

यामध्ये पिटबुल टेरियरसह सुमारे 23 ते 24 कुत्र्यांच्या जातींना धोकादायक म्हटलं होतं. यात या जातींचे मिश्रित आणि क्रॉस ब्रीड कुत्र्यांचाही समावेश होता.

या कुत्र्यांची आयात, पैदास आणि विक्रीवर बंदी घालण्याची सूचना देण्यात आली. आधीपासून पाळल्या जाणाऱ्या अशा कुत्र्यांची नसबंदी करण्याचीही शिफारस करण्यात आली होती.

या यादीमध्ये पिटबुल टेरियर, अमेरिकन स्टॅफर्डशायर टेरियर, रॉटवायलर, अमेरिकन बुलडॉग, डोगो अर्जेंटिनो, फिला ब्राझिलेरो, केन कॉर्सो, मास्टिफ, वुल्फ डॉग, कांगाल आणि कॉकेशियन शेफर्ड यांसारख्या कुत्र्यांच्या जातींचा समावेश आहे.

हा केंद्राचा आदेश म्हणजे पूर्णपणे कायदेशीर बंदी नव्हती. दिल्ली उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयासह काही न्यायालयांनी यात हस्तक्षेप केला.

इंडियन पिटबुल

फोटो स्रोत, Nasir Kachroo/NurPhoto via Getty Images

मे 2024 मध्ये केंद्र सरकारने नोटीस काढून पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू करू नये, असं सांगितलं.

म्हणजेच, पिटबुल पाळण्यावर देशभरात सध्या एकसारखी कठोर कायदेशीर बंदी नाही. पण, पिटबुलची पैदास, विक्री आणि पालनाबाबतचे नियम राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानुसार वेगवेगळे असू शकतात.

काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने पावलं उचलली आहेत.

उत्तर प्रदेश मधील लखनौ आणि गाझियाबादमध्ये या जातींच्या कुत्र्यांना परवाना न देण्याचे आणि त्यांची नसबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोवा सरकारने 2025 मध्ये असा कायदा केला, ज्यामुळे सरकार कोणत्याही कुत्र्याच्या प्रजातीला ‘धोकादायक प्राणी’ म्हणून घोषित करू शकते.

एकदा एखाद्या जातीला धोकादायक घोषित केल्यानंतर त्या जातीचे कुत्रे पाळणे, त्यांची पैदास करणे आणि त्यांना गोव्यात आणणं यावर बंदी येते.

पूर्वीपासून पाळलेल्या अशा कुत्र्यांची नसबंदी करणे बंधनकारक आहे. हे नियम न पाळल्यास 15 दिवस ते 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

पेटाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, कानपूर महानगरपालिकेने पिटबुल आणि रॉटवायलर पाळण्यावर बंदी घातली आहे.

गाझियाबादमध्येही पिटबुल, रॉटवायलर आणि डोगो अर्जेंटिनो या कुत्र्यांबाबत पावलं उचलण्यात आली आहेत.

चंदीगडमध्ये धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कायद्यानुसार जबाबदार कोण?

पिटबुलने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्यास पीडित व्यक्ती पोलिसांत तक्रार करू शकते. उपचाराचा खर्च आणि झालेल्या इतर नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करता येऊ शकतो.

बंगेरा यांच्या मते, गंभीर दुखापत किंवा मालकाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्यास भारतीय न्याय संहितेतील फौजदारी तरतुदी लागू होऊ शकतात.

कुत्र्यापासून धोका असल्याची माहिती असूनही मालकाने त्याला नियंत्रणात ठेवलं नसेल, तर त्याची जबाबदारी आणखी वाढू शकते.

पिटबुल

फोटो स्रोत, JOSH EDELSON/AFP via Getty Images

  • कुत्रा पाळताना मालकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

याबाबत पेटाने सांगितलं की, पिटबुल प्रकारच्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून घ्यावे. आवश्यक असेल तिथे त्यांची नोंदणीही करावी.

कुत्र्याला सुरक्षित वातावरणात ठेवावे आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाताना मजबूत हार्नेस आणि पट्टा वापरणे आवश्यक आहे.

कुत्र्याला कधीही साखळीने बांधू नये. त्याला हल्ला करण्यासाठी चिथावू नये आणि कुत्र्याचा झुंजीसाठी किंवा सुरक्षा किंवा पहारा देण्यासाठी वापर करू नये.

प्रजनक (ब्रीडर) अनेकदा कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता पिटबुलची विक्री करतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC