Source :- BBC INDIA NEWS

मंदा दोरपेड्डी

फोटो स्रोत, BHAGYASHREE RAUT

“दुसऱ्याच्या बाळाला पाहून वाटायचं की, माझं बाळ असतं, तर त्याला फिरवलं असतं, त्याच्यावर खूप प्रेम केलं असतं. त्याचे खूप लाड केले असते.”

आपल्या अंगणात झाडाभोवती बांधलेल्या कट्ट्यावर बसून मंदा दोरपेड्डी आपली आई होण्याची ईच्छा किती तीव्र होती हे बोलून दाखवत होत्या.

मंदा या आत्मसमर्पित नक्षलवादी असून सध्या त्या गडचिरोलीतल्या एका वस्तीत राहतात. त्यांनी 4 खोल्यांचं पक्क घर बांधलं असून घराजवळच्या नर्सरीत मोलमजुरी करून आपलं पोट भरतात.

आत्मसमर्पण केल्यानंतर आता आपण नवरा बायको दोघंच जगण्यापेक्षा मुल-बाळ हवं असं त्यांना वाटायचं. पण, ही गोष्ट शक्य होणार नाही असाही विचार त्यांच्या मनात यायचा. कारण, त्यांच्या पतीची नक्षलवादी चळवळीत असताना नसबंदी झाली होती.

पण, आता मंदा यांची आई होण्याची इच्छा पूर्ण झाली. त्यांना 2 मुली असून त्यांचं हसतं खेळतं चौकोनी कुटुंब आहे. हे शक्य झालं ते गडचिरोली पोलिसांच्या प्रोजेक्ट संजीवनीअंतर्गत क्रिष्णा यांची नसबंदी रिओपन केल्यामुळे.

त्या म्हणतात, “मी गर्भवती होते तेव्हा असं वाटायचं की, आता आपलंही बाळ येईल. आपल्याला बाळ होईल. आपण त्याला खूप खेळवू. मी एकदम ‘दिलखुश’ झाले होते.”

आपल्या आयुष्यात मुली आल्यामुळे अनेक गोष्टी बदलल्याचं त्यांचे पती क्रिष्णा दोरपेड्डी सांगतात.

ते म्हणतात, “नसबंदी काढल्यानंतर पहिली मुलगी झाली. मी बाहेरून घरात आलो की पप्पा आले, पप्पा आले म्हणत धावत बाहेर येतात. आपण काय खाऊ आणला ते बघतात. ही आपल्यासाठी मोठी खुशीची गोष्ट आहे.”

बाप बनल्यानंतर क्रिष्णा प्रचंड आनंदी आहेत. पण, हा आनंद आधी त्यांच्या आयुष्यात नव्हताच. ते 2003 मध्ये नक्षलवादी चळवळीत सहभागी झाले. त्यांच्या गावात नक्षलवादी येऊन ‘नाच-गाणं’ करायचे, त्यांचा पोशाख आणि हातात असलेली बंदूक असं सगळं पाहून आपण चळवळीत गेल्याचं ते सांगतात.

त्यांना 2006 मध्ये लग्न करायचं होतं. त्यावेळी त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत 11 वर्षं नक्षलवादी चळवळीत काम केलं.

पण, पोलिसांची गस्त वाढली होती. जंगलात राहणं त्यांना अवघड वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांनी पत्नीसह लपून गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.

क्रिष्णा दोरपेड्डी

फोटो स्रोत, BHAGYASHREE RAUT

क्रिष्णा म्हणतात की, 2009 पासून पोलीस फोर्स वाढली होती. कुठं पाणी मिळत नव्हतं. कधी स्वयंपाक करून जेवायलाही मिळत नव्हतं. जिकडे गेलो तिकडे पोलीस येत होते. आता इथं राहून मरायला लागेल असं वाटलं. त्यामुळे आम्ही एका रात्री लपून निघालो आणि पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.

आत्मसमर्पण केलं त्याचवेळी त्यांनी इंटरोगेशनमध्ये बाप होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

आतापर्यंत 50 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसंबदी रिओपन शस्त्रक्रिया

फोटो स्रोत, BHAGYASHREE RAUT

“जंगलात मुलं तर ठेवू शकत नव्हतो. पण, इकडे आल्यावर मनात आलं की, आपण नसबंदी खोलायची का? इंटरोगेशनमध्ये सांगितलं की, माझी नसबंदी झाली आहे. ओपन करायची असेल तर करता येईल का? मी तयार आहे,” असंही ते नमूद करतात.

त्यानंतर एकच वर्षात त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करून रिओपन करण्यात आली आणि ती यशस्वी सुद्धा झाली.

2016 मध्ये क्रिष्णा आणि मंदा यांना पहिली मुलगी झाली. आता त्यांची दुसरी मुलगी पण 3 वर्षांची आहे.

आतापर्यंत 50 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसबंदी काढली

क्रिष्णा आणि मंदा यांना शिक्षण घेता आलं नाही. पण, आता त्यांची मोठी मुलगी घराजवळच्या शाळेत चौथीत शिकते. आपल्या मुलांना शिकून मोठ्ठं बनवायचं स्वप्न त्यांनी बघितलं आहे.

क्रिष्णा म्हणतात, “आम्ही काहीच शिकू शकलो नाही. पण, आमच्या मुलींना तरी शिकवायचं स्वप्न आहे. जितकं शिकतात पोरी तितकं शिकू दे. आम्ही मोलमजुरी करून तिला पैसे देऊ. पण, शिकू दे. त्यांच्या मनात काय स्वप्न आहे ते पूर्ण करू दे.”

फक्त क्रिष्णाच नाहीतर त्यांच्यासारख्या 50 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची आतापर्यंत नसबंदी रिओपन शस्त्रक्रिया झाली आहे. यापैकी 14 जणांना अपत्य सुद्धा झाली आहेत.

त्यापैकीच एक असलेल्या जानू हेडो सांगतात, “मुलं राहिले तर आयुष्य चांगलं वाटतं. आपण म्हातारं झाल्यावर आपल्याला मुलं आधार असतात. जंगलात मुलं ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे आम्ही तिथं मुलांना जन्म देऊ शकत नव्हतो. पण, इकडे आम्ही मोकळं जगू शकतो.”

जानू यांना देखील एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्या गडचिरोली शहरातच असलेल्या नवजीवन सोसायटीमध्ये राहतात.

आतापर्यंत 50 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसंबदी रिओपन शस्त्रक्रिया

फोटो स्रोत, BHAGYASHREE RAUT

गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतानाच त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी कोणत्या गोष्टी हव्या हे विचारलं जातं. त्यापैकी एक म्हणजे त्यांना आई-वडिल व्हायची इच्छा आहे का? हे सुद्धा विचारतात.

गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले, “जेव्हा आत्मसमर्पणाची चर्चा सुरू असते तेव्हा आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात यायला ज्या गोष्टी लागतात ते गडचिरोली पोलीस देतील, असं सांगतो. बऱ्याच लोकांनी आत्मसमर्पण केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, आम्ही पती पत्नी आहोत. पण, आम्हाला कौटुंबिक जीवन जगात येत नाही.”

गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नीलोत्पल

फोटो स्रोत, BHAGYASHREE RAUT

“आम्हाला मुलं हवी आहेत. त्यांना ही गोष्ट उपलब्ध करून द्यावी ही संधी आम्हाला दिसली. नसबंदी ही अशी शस्त्रक्रिया आहे जी रिओपन करता येते. त्यामुळे आम्ही प्लास्टीक सर्जनच्या माध्यमातून ही सोय आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना उपलब्ध करून दिली,” अशी माहिती निलोत्पल यांनी दिली.

त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

‘लग्नाच्या आधी नसबंदी करायचा नियम’

गेल्या जानेवारी महिन्यात देखील भूपतीसह काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. ते सध्या पोलीस संकुलातील ‘सरेंडर सेल’मध्येच राहतात.

त्यांच्यापैकी 14 जणांची सर्चच्या माध्यमातून नसबंदी रिओपन करण्यात आली. आता त्यांनाही आपल्याला मुल होईल, अशी आशा आहे.

शस्त्रक्रिया झालेला शिवकुमार तल्लम सांगतो, “आम्ही जंगलात मुलं ठेवू शकत नव्हतो. कारण, जंगलात मुलं ठेवले आणि वेळेवर पोलीस आले तर काय करायचं? असा प्रश्न होता. त्यामुळे लग्न करायच्या आधी नसबंदी शस्त्रक्रिया करावी लागत होती. पार्टीचा तसा नियम होता. पण, आता नसबंदी रिओपन झाल्यानं मुलं होतील अशी आशा आहे.”

अवघ्या 30 वर्षांचा असलेल्या राम ताराम म्हणतो, “आता आम्ही जवान आहोत, तर काम करू शकतो. म्हातारपणात आमचं काय होईल? आमच्या म्हातारपणातील आधारासाठी मुलं हवी आहेत. त्यामुळे नसबंदी रिओपन केली आहे. आता आम्ही घरी जाणार, शेती करणार आणि मुलंही होतील.”

‘दलममधीलच व्यक्ती करायची शस्त्रक्रिया’

या सगळ्यांची शस्त्रक्रिया ही जंगलात झाली होती. तिथंच एका डॉक्टरनं त्यांची शस्त्रक्रिया केल्याचं ते सांगतात. हे डॉक्टर म्हणजे एमबीबीएस डॉक्टरकडून ट्रेनिंग घेतलेले दलममधलेच लोक होते.

असाच जंगलात शस्त्रक्रिया करणारा अर्जून इचामी सुद्धा आम्हाला भेटला. अर्जून हा 6वी शिकला आहे. पण, तो जंगलात सगळ्या शस्त्रक्रिया करत असल्याचं सांगतो.

तो म्हणतो, “मला एका एमबीबीएस डॉक्टरनं 6 महिने ट्रेनिंग दिलं. मी सगळं सायन्स शिकून घेतलं की आजार कसे होतात? त्यावर काय उपाय करायचे. एमबीबीएस डॉक्टरनं मला सगळं शिकवलं.”

“त्यानंतर मी फक्त नसबंदीच नाहीतर इतरही शस्त्रक्रिया करत होतो. काही लोक रायपूरला उपचारासाठी जायचे. पण, तिथं फायदा झाला नाही, तर मी जंगलात त्यांच्यावर उपचार करायचो. आतापर्यंत मी 500 जणांच्या नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत,” असंही तो नमूद करतो.

अर्जूनने देखील 1 वर्षांपूर्वीच आत्मसमर्पण केलं. तो आता कसनसूरजवळील गावात आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि शेती करतो.

पण, अशा लोकांनी शस्त्रक्रिया केल्यानं त्यामध्ये काही त्रूटी आढळल्याचं सर्चमधले सर्जन डॉ. अमित पाटीदार सांगतात.

ते म्हणतात, “जंगलात झालेल्या काही शस्त्रक्रिया नॉनस्टँडर्ड होत्या. एका बाजूला केलेली होती, तर दुसऱ्या बाजूला नव्हतं. कारण, या शस्त्रक्रिया जंगलात अप्रशिक्षित लोकांनी केलेल्या होत्या.”

“शस्त्रक्रिया स्टँडर्ड पद्धतीनं झाल्या नसल्या तरी त्यांना मुलं झाली नाहीत हेही तितकंच खरं आहे,” असंही ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC