Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मी वाचलो नाही, तर माझ्या मुलांना निरोप द्या’, स्मित मच्छर यांच्याबद्दल परदेशी...

‘मी वाचलो नाही, तर माझ्या मुलांना निरोप द्या’, स्मित मच्छर यांच्याबद्दल परदेशी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

4 वर्षांपूर्वी फ्लायदुबईमध्ये रुजू झालेल्या स्मित मच्छर यांना सौदी अरेबियातील रुग्णालयातून यूएईमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाचा अपघात होण्यापासून रोखल्याबद्दल भारतीय पायलट स्मित मच्छर यांचं एखाद्या हिरोसारखं कौतुक होत आहे.

लहानपणी स्मित मच्छर यांनी पायलट होण्याचं स्वप्न कधीही पाहिलं नव्हतं, असं ब्रिटनची वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

रॉयटर्सने म्हटलं, “स्मित मच्छर यांना आपल्या कुटुंबाचा कपड्यांचा व्यवसाय पुढे न्यायचा होता. परंतु, वयाच्या 19व्या वर्षी त्यांना विमान उड्डाणाची (एव्हिएशन) आवड निर्माण झाली. त्यांच्या या आवडीमुळे आईला काळजी वाटू लागली होती. आता हजारो तास विमान उडवल्यानंतरही मच्छर यांचं विमान उड्डाणावरचं प्रेम अजूनही कायम आहे. पण, ते या आवडीबद्दल कॉकपिटच्या बाहेर फारसं बोलताना दिसत नाहीत.”

बुधवारी (30 सप्टेंबर) त्यांचं विमान तबुकच्या दिशेने वळवण्यात आलं. इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, को-पायलटने विमान हवेत असताना स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला आणि 174 प्रवासी असलेल्या विमानाला पाडण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे, असं फ्लाय दुबईने म्हटलं आहे.

रॉयटर्सने म्हटलं, “इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईचे रहिवासी असलेले स्मित मच्छर कॉकपिटमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते. तरीही त्यांनी कॉकपिटचं दार उघडण्यासाठीची रिलीज सिस्टिम सुरू करण्यात यश मिळवलं.”

“त्यानंतर प्रवासी आणि क्रूने को-पायलटला ताब्यात घेतलं. विमानात प्रवासी म्हणून असलेल्या फ्लायदुबईच्या 2 पायलटांनी विमान उतरवण्यास मदत केली.”

बोइंग 737 विमानाचे अनुभवी कॅप्टन स्मित मच्छर यांनी सुमारे 15 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत सुमारे 9750 तास विमानाचे उड्डाण केले आहे. पण, त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात करिअरला उशिरा सुरुवात केली.

पायलट होण्याचा विचारही केला नव्हता

मच्छर यांनी 2025 मध्ये झलक मेहता यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “आजच्या अनेक पायलटांप्रमाणे विमान उडवणं हे माझं लहानपणीचं स्वप्न नव्हतं. माझ्या आयुष्यात विमान उड्डाणाची आवड खूप उशिराने आली.”

शालेय शिक्षणानंतर त्यांनी टेक्सटाइल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर त्यांनी मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं.

दरम्यान, वयाच्या 19व्या वर्षी एका एव्हिएशन सेमिनारमध्ये त्यांना विमान उड्डाणाच्या क्षेत्राची माहिती मिळाली.

त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं, “याच वेळी मला विमान उड्डाणाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला माझ्या आईला या क्षेत्रातील करिअरबद्दल खूप भीती होती.”

30 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलमधील तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. यावेळी प्रवाशांचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केलं. 174 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाने सौदी अरेबियातील तबुकच्या प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर ते तेल अवीवला पोहोचलं.

स्मित मच्छर यांनी म्हटलं होतं, “उशीर किंवा विलंब होणे ही माझी समस्या नाही. विमानातून तुम्ही सुरक्षित बाहेर येत आहात, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कॉकपिट किंवा विमानातून बाहेर आल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मी पायलट आहे, हे कळू नये असंच मला वाटतं.”

“मला एव्हिएशनबद्दल बोलायचं नसतं. युनिफॉर्म घातला की अनावश्यक गोष्टी करायच्या नाहीत. केवळ आपलं काम चोख पार पाडायचं. कॉकपिटमधून बाहेर पडल्यानंतर काम तिथेच संपतं. त्याचा विचार करायचा नाही. कारण आता तुमच्या कुटुंबाला तुमची गरज असते. मुलांना तुमच्यासोबत खेळायचं असतं.”

न्यूझीलंडमध्येही स्मित मच्छर यांची चर्चा

न्यूझीलंडच्या आरएनझेड या वृत्तसंस्थेशी बोलताना मेनलँड एअरचे स्मित यांचे माजी ट्रेनर फिलिप कीन म्हणाले, “मच्छर यांनी न्यूझीलंडमध्ये 18 महिने प्रशिक्षण घेतलं होतं. माझ्या माजी विद्यार्थ्याने या कठीण प्रसंगाचा खूप चांगल्या पद्धतीने सामना केला, याचा मला आनंद आहे.”

कीन यांनी आरएनझेडच्या ‘चेकपॉइंट’ कार्यक्रमात सांगितलं, “ही बातमी वाचून मला खूप आनंद झाला. शरीरात चाकू घुसलेला असतानाही त्याने ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली.”

ग्राफिक्स

यापूर्वी कीन यांनी ‘न्यूझीलंड हेराल्ड’ला मच्छर हे उत्साही आणि ऊर्जावान असून सरासरीपेक्षा चांगले पायलट आहेत, असं म्हटलं होतं.

ते म्हणाले, “ही घटना खूपच भीतीदायक आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अजूनही जिवंत आहे.”

“विमान खूप उंचीवरून खाली येत होतं. विमानाचं नियंत्रण सुटलं नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्या पायलटने विमान अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

कीन यांनी सांगितलं की, ते ईमेल च्या माध्यमातून स्मिथच्या संपर्कात होते.

इस्रायली प्रवासी असफ राजुआन हे यापूर्वी मार्ग बदललेल्या फ्लायदुबईच्या विमानातून प्रवास करत होते. 30 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलमधील लोड येथील बेन गुरियन विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

न्यूझीलंडमधील इस्रायलचे राजदूत अलोन रोथ यांनी म्हटलं की, विमानाचं मोठं नुकसान झालं असतानाही ते सुरक्षित उतरलं, हा चमत्कारच म्हणावा लागेल.

रोथ म्हणाले, “हल्ला करणाऱ्या व्यक्तीला कॉकपिटमधून बाहेर काढणाऱ्या इस्रायली प्रवाशाने विमानाचं नियंत्रण सांभाळलं. विमान सुमारे 20 हजार फूट उंचीवरून वेगाने खाली येत होतं. त्याने विमान आणखी खाली जाण्यापासून रोखलं.”

“विमान कोसळण्यापासून अवघी काही सेकंद दूर होतं. गंभीर जखमी असूनही कॉकपिटचं दार उघडण्यात यश मिळवणाऱ्या पायलट स्मित मच्छर यांच्या धैर्याचं मी कौतुक करतो. त्यामुळे विमानातील इतर लोकांना मदत करता आली.”

स्मित यांच्या विमानात महिलेला प्रसूतीकळा

फिलिप कीन यांनी अमेरिकेच्या सीएनएन वृत्तवाहिनीला सांगितलं, “तो नेहमी आनंदी आणि उत्साही स्वभावाचा तरुण होता. त्याने खूप मेहनत केली.”

ड्युनेडिनमधील मेनलँड एअरचे सीईओ कीन यांनी सांगितलं, “त्याच्या हास्यात एक वेगळेपण होते. तो नेहमी आनंदी राहणारा मुलगा होता.”

बुधवारच्या घटनेपूर्वी, 15 वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या विमान उड्डाणाच्या कारकिर्दीत घडलेली एक अनोखी घटना म्हणजे विमानातच एका बाळाचा जन्म झाला होता.

मच्छर यांनी ‘बोना-फाइड बॅन्टर’ पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, विमानात प्रवास करणाऱ्या एका महिलेची प्रसूतीची तारीख अजून आलेली नव्हती. पण, तिला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या.

ते म्हणाले, “7 ते 10 मिनिटांतच ती म्हणू लागली, ‘कॅप्टन, आता बाळाचा जन्म होणार आहे.'”

मच्छर यांनी सांगितलं की, त्यांनी आणि फर्स्ट ऑफिसरने सुरक्षित लँडिंगसाठी जवळचं विमानतळ शोधायला सुरुवात केली. त्यांनी वेगवेगळ्या विमानतळांवरील हवामानाची माहिती घेतली आणि कुठे विमान उतरवणं शक्य आहे, हे तपासलं. त्यांच्याकडे केवळ 6 ते 7 मिनिटे होती. परंतु, काही मिनिटांतच त्यांना फोन आला, ‘विमानात बाळाचा जन्म झाला आहे.’

ते म्हणाले, “आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते.”

30 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलमधील तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांचं त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केलं.

न्यूझीलंडमधून फ्लायदुबईच्या विमानातील मच्छर यांच्या धाडसाची बातमी पाहिल्यानंतर त्यांचे माजी प्रशिक्षक कीन यांनी आपल्या या माजी विद्यार्थ्याचं भरभरून कौतुक केलं.

त्यांनी सीएनएनला सांगितलं, “ही खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी होती. काही सेकंदांत विमानातील सर्वांचा जीव जाऊ शकला असता. सुदैवाने ते कॉकपिटचं दरवाजा उघडू शकले. स्वतःला सावरत त्यांनी सगळ्यांचा जीव वाचवला. आणखी अर्धा मिनिट उशीर झाला असता, तर सर्व काही संपलं असतं.”

ते म्हणाले, “मला त्याचा खूप अभिमान आहे. त्याने ही परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. शेवटी सगळं ठीक झालं, ही खूप चांगली गोष्ट आहे.”

सीएनएनच्या वृत्तानुसार, “39 वर्षीय स्मित मच्छर दोन मुलांचे वडील आहेत. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर विमानाच्या कॉकपिटमधील एक धक्कादायक दृश्य समोर आलं. कॉकपिटमध्ये सर्वत्र रक्त पसरलं होतं आणि गंभीर जखमी पायलट जमिनीवर पडले होते.”

विमानात स्मित यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर

विमानात प्रवासी म्हणून असलेले आणि मच्छर यांच्यावर उपचार करण्यात मदत करणारे डेंटिस्ट शोता मुसाएव यांनी सीएनएनला सांगितलं की, मच्छर यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि ते गंभीर जखमी झाले होते.

ते म्हणाले, “मला वाटतं, आम्ही आणखी काही वेळ थांबलो असतो तर त्यांना वाचवणं कठीण झालं असतं. त्यांचा रक्तदाब वेगाने कमी होत होता. ते अचानक बेशुद्ध पडले आणि आजूबाजूला सर्वत्र रक्त सांडलं होतं.”

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सीएनएनला सांगितलं की, त्यांच्या धाडसामुळे ‘9/11 सारखी मोठी दुर्घटना टाळण्यास मदत झाली.’

गुरुवारी (1 ऑक्टोबर) इस्रायली आर्मी रेडिओशी बोलताना शोता मुसाएव यांनी सांगितलं, “कॉकपिटमध्ये सर्वत्र रक्त पसरलं होतं. मच्छर यांच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. चाकूच्या हल्ल्यात कॅप्टनचा डावा हात जवळपास कापला गेला होता.”

“त्यांची नाडी कमजोर होऊ लागली आणि ते बेशुद्ध पडू लागले, तेव्हा आम्ही विमानातील राखीव पायलटांना शक्य तितक्या लवकर विमान उतरवण्यास सांगितलं. तोपर्यंत या पायलटांनी विमानाचा ताबा घेतला होता. त्यानंतर विमान उत्तर-पश्चिम सौदी अरेबियातील तबुक शहरात उतरलं.”

ते म्हणाले, “मला वाटत नाही की, ते इस्रायलपर्यंतचा संपूर्ण प्रवास करू शकले असते. त्यांना जगायचं होतं, मरायचं नव्हतं. कॅप्टनने मला सांगितलं, ‘मी वाचलो नाही तर माझ्या मुलांना एक संदेश द्या.’ मी त्यांना म्हटलं, ‘देव तुमच्यासोबत आहे. प्रार्थना करा. सर्व काही ठीक होईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत.'”

ब्रिटिश वृत्तपत्र ‘फायनान्शियल टाइम्स’ने आपल्या वृत्तात लिहिलं, “एका इस्रायली अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हल्ला करणारा को-पायलट ओमानचा नागरिक आहे. नेतन्याहू यांनी सांगितलं की, सौदी अधिकारी त्याची चौकशी करतील.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं, “असं दिसतंय की को-पायलट कदाचित दहशतवादी होता किंवा मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती होती आणि त्याने पायलटवर हल्ला केला.”

ओमानच्या अधिकाऱ्यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. को-पायलटने पायलटवर हल्ला का केला, याचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC