Home LATEST NEWS ताजी बातमी सोन्याचा एक कंगवा आणि अख्खं साम्राज्य गेलं लयाला; काय आहे ‘वल्लभी’ची कहाणी?

सोन्याचा एक कंगवा आणि अख्खं साम्राज्य गेलं लयाला; काय आहे ‘वल्लभी’ची कहाणी?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

एका सोन्याच्या कंगव्यामुळे राजघराण्यात कशी पडली फूट?

गुजरातचा लिखित इतिहास मौर्यांच्या काळापासून उपलब्ध आहे. पण, या राज्याचा सविस्तर इतिहास वल्लभीपूरपासून अधिक ठळकपणे समोर येतो.

गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर इ.स. 470 च्या सुमारास वल्लभी इथं मैत्रक घराण्याची स्थापना झाली.

डॉ. हरिप्रसाद गंगाधर शास्त्री यांनी ‘History of Gujarat – Ancient Times’ या पुस्तकात मैत्रक घराण्याबद्दल लिहिलं आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, प्राचीन गुजरातच्या इतिहासात मैत्रकांची सत्ता ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक काळ टिकलेली सत्ता आहे. इ.स. 470 ते 788 म्हणजे तीन शतकांहून अधिक काळ इथे मैत्रक घराण्याची सत्ता होती.

इतिहासातील नोंदीनुसार भट्टारक हा मैत्रक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतरही या राजघराण्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले.

या घराण्याची सत्ता संपूर्ण सौराष्ट्रासह कच्छ, उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातच्या विस्तीर्ण प्रदेशांवर होती.

मैत्रकांच्या काळात वल्लभी ही गुजरातची राजधानी होती. गिरीनगरनंतर वल्लभी हे गुजरातचं राजकीय केंद्र बनलं. या शहराचं वैभव आणि अफाट संपत्ती यांची नोंदही इतिहासात आढळते.

प्रा. मौलाना सय्यद अबू जफर नदवी ‘History of Gujarat – From the Arrival of the Aryans to the Attack of the Muslims’ या पुस्तकात लिहितात, “या शहराची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली होती. हूणांच्या काळापासून ते अरब प्रवाशांपर्यंत अनेकांनी इथल्या समृद्धी, संपत्तीचे दाखले दिले आहेत. शहरात व्यापारही भरभराटीला आला होता. अनेक श्रीमंत कुटुंबं इथं राहत होती आणि शंभरहून अधिक कोट्यधीश होते.”

अभिजात संस्कृती आणि विद्वत्तेचा वारसा लाभलेल्या या शहराचं अस्तित्व जितकं ‘भव्य’ होतं, तितकीच त्याच्या ऱ्हासाची कहाणी ‘धक्कादायक आणि अनोखी’ आहे.

इतिहासाच्या पुस्तकांमधील नोंदींनुसार, सेनापती भट्टारकाची राजधानी असलेल्या आणि सुमारे हजार मैलांच्या परिसरात विस्तारलेल्या या वैभवशाली शहराच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली एक फणी किंवा कंगवा.

नेमकं काय घडलं? वल्लभीचा उदय कसा झाला आणि या समृद्ध शहराचा ऱ्हास कसा झाला? जाणून घेऊया वल्लभीच्या उदयापासून अस्तापर्यंतची संपूर्ण कहाणी.

मैत्रक घराण्याचा उदय

“स्कंदगुप्ताच्या मृत्यूनंतर गुप्त साम्राज्याची सत्ता कमकुवत झाली आणि दूरवरचे प्रांत स्वतंत्र होऊ लागले. त्याच काळात सेनापती भट्टारक याने वल्लभी येथे आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं,” असं डॉ. हरिप्रसाद गंगाधर शास्त्री यांनी लिहिलं आहे.

रसिकलाल छो. परिख यांनी ‘गुजरातचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास : खंड 3 – मैत्रक आणि अनु-मैत्रक काळ’ हे पुस्तक लिहिलं आहे.

ते म्हणतात, “भट्टारकाने राज्य कसं मिळवलं, याची सविस्तर माहिती उपलब्ध नाही.

‘प्रचंड सामर्थ्य असलेल्या शत्रूंच्या शेकडो आक्रमणांचा सामना करत त्याने कीर्ती मिळवली,’ असं त्याच्या प्रशस्तीत म्हटलं आहे. यावरून त्याला तत्कालीन सत्ताधाऱ्यांशी कठीण संघर्ष करावा लागला असावा, हे स्पष्ट होतं.”

“भट्टारकाचा उल्लेख सेनापती असा केला जातो, यावरून सिंहासनावर विराजमान होण्यापूर्वी तो एखाद्या राज्याचा सेनापती होता, असं दिसतं. सौराष्ट्रातील वल्लभीपूर इथं त्यानं आपली राजधानी स्थापन केली, यावरून तो यापूर्वी गुप्त साम्राज्याच्या सौराष्ट्र प्रांताचा सेनापती असावा.”

इतिहासातील नोंदींनुसार सेनापती भट्टारकापासून शिलादित्यापर्यंत, मैत्रक घराण्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांच्या कारकिर्दीत वल्लभीची कीर्ती देशात आणि परदेशातही पसरली.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार, मैत्रक घराण्याचा संस्थापक सेनापती भट्टारक याच्यापासून गुजरातमध्ये अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. या घराण्याची सत्ता संपूर्ण सौराष्ट्रासह कच्छ, उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातच्या विस्तीर्ण प्रदेशांवर होती.

डॉ. शास्त्री यांनी लिहिलं आहे, “सोलंकी राजघराण्याच्या काळात गुजरातने जितकी प्रगती केली, तितकी मैत्रक आणि अनु-मैत्रक काळात केली नसेल, पण स्वशासनाच्या दिशेने टाकलेलं पाऊल ही त्यांची अभूतपूर्व कामगिरी मानली जाते. यापूर्वी गुजरातवर अन्य प्रदेशांतील राजांचा अंमल होता. मैत्रकांनी परकीय सत्तेच्या अधीन राहण्याची असहायता संपुष्टात आणली. या प्रदेशात स्थानिक राजघराण्यांची सत्ता प्रस्थापित झाली, ही काही लहान घटना नव्हती.”

रसिकलाल परिख लिहितात, “बाहेरील प्रदेशांच्या सत्तेच्या जोखडातून मुक्त होऊन गुजरातमध्ये स्वतंत्र सत्ता स्थापन करणं, ही मैत्रक घराण्याची पहिली महत्त्वाची राजकीय कामगिरी होती. त्यानंतर मैत्रकांची सत्ता सौराष्ट्र, कच्छ, उत्तर गुजरात, मध्य गुजरात आणि पश्चिम माळवा या प्रदेशांवर पसरली आणि शतकानुशतकं टिकून राहिली. ही मैत्रक राज्याची दुसरी मोठी राजकीय कामगिरी मानली जाते.

मैत्रक राजांनी आपल्या विशाल साम्राज्यात सुव्यवस्थित राज्यव्यवस्था विकसित केली. त्यांनी धर्म, शिक्षण, साहित्य, कला, व्यापार आणि उद्योग यांना प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर राज्यातील आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचाही विकास केला.”

अशा प्रकारे, गुजरातच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात मैत्रक राज्याला अनेक दृष्टींनी महत्त्वाचं स्थान आहे.

वल्लभीचं डोळं दिपवणारं वैभव

डॉ. शास्त्री यांनी म्हटलं आहे, “वल्लभी हे सौराष्ट्राच्या पूर्व भागातील एक प्रसिद्ध शहर होतं. संस्कृत शब्दकोशांमध्ये ‘वल्लभी’ या शब्दाचे दोन प्रमुख अर्थ दिले आहेत.

(1) छत किंवा बांबू वगैरेपासून तयार केलेलं छप्पर.

(2) घराचा सर्वात वरचा भाग. मैत्रक राज्याची राजधानी बनलं, तोपर्यंत वल्लभीला सौराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर म्हणून आधीच प्रसिद्धी मिळाली होती.”

संशोधक आणि इतिहासकारांनी आपल्या पुस्तकांमध्ये वल्लभीच्या वैभवाचं सुरेख वर्णन केलं आहे.

‘History of Saurashtra’ या पुस्तकात लेखक शंभुप्रसाद देसाई लिहितात, “चिनी प्रवासी ह्युएन त्संग इ.स. 640 मध्ये वल्लभीपूर इथं पोहोचला. त्याने वल्लभीचं जे वर्णन केलं आहे. त्यावरून वल्लभीचा विस्तार आणि वैभव यांची कल्पना येते.”

त्यांनी लिहिलं आहे, “या राज्याचा विस्तार सहा हजार ली (सहा हजार ली म्हणजे 1200 मैल) होता, तर त्याच्या राजधानीचा विस्तार सहा मैल होता. इथली जमीन, हवा आणि पाणी, तसेच लोकांच्या चालीरीती आणि स्वभाव माळव्याप्रमाणेच होते.

“इथली लोकसंख्या जास्त होती आणि सर्व कुटुंबं श्रीमंत होती. दहा लाखांहून अधिक संपत्ती असलेली शेकडो कुटुंबंही येथे होती. दूरवरच्या देशांतील दुर्मिळ वस्तू येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या.”

“इ.स. ६४० मध्ये चिनी प्रवासी ह्युएन त्सांग वल्लभीपूर येथे पोहोचला. त्याने आपल्या दृष्टिकोनातून वल्लभीचं वर्णन केलं आहे. त्यावरून वल्लभीचा विस्तार आणि वैभव यांची कल्पना येते.”

‘Sanskrit History of Gujarat’ या पुस्तकात लेखक रजनीकुमार पंड्या लिहितात, “ह्युएन त्संगच्या वर्णनावरून वल्लभी हे व्यापार आणि वाणिज्याचं एक मोठं केंद्र असल्याचं लक्षात येतं. वल्लभीमध्ये सुमारे शंभर कुटुंबं कोट्यधीश होती. मैत्रकांच्या काळात वल्लभी हे बौद्ध धर्माचं एक मोठं केंद्र होतं.”

याच पुस्तकात ते पुढे लिहितात, “चिनी प्रवासी इत्सिंग याच्या मते, पूर्वेकडील नालंदा आणि पश्चिमेकडील वल्लभी ही भारतातील दोन प्रमुख बौद्ध विद्यापीठं होती.”

प्रा. मौलाना सय्यद अबू जफर नदवी यांनीही वल्लभीच्या वैभवाचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात, “ह्युएन त्संगच्या प्रवासवर्णनात या शहराची लोकसंख्या मोठी असल्याचं नमूद केलं आहे. शहरातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांची संख्याही शेकडोंमध्ये होती. इथं अनेक पाठशाळा, मठ आणि मंदिरं होती. एका अंदाजानुसार, शहराची लोकसंख्या लाखोंमध्ये असावी.

“या शहराची आर्थिक स्थितीही अत्यंत चांगली होती. ह्युएन त्संगपासून ते अरब प्रवाशांपर्यंत अनेकांनी इथल्या संपत्तीची प्रशंसा केली आहे. व्यापारही भरभराटीला आला होता. सर्व बंदरं व्यापारी मालाने गजबजलेली असत. दीव, खंभात, भडोच, चेमूर, सोपारा आणि ठाणे ही प्रमुख बंदरं होती.

वल्लभीच्या ऱ्हासाचं कारण ठरला एक कंगवा?

प्रा. मौलाना सय्यद अबू जफर नदवी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, “अडीचशे वर्षांहून अधिक काळ यशाच्या शिखरावर असलेल्या या भव्य शहराचा विनाश कसा झाला, हा हरूनच्या खजिन्याप्रमाणेच एक गूढ विषय आहे. याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.”

यामधील एक आख्यायिका खूप जास्त प्रचलित आहे. अनेक लेखकांनी त्याचा उल्लेख केला आहे.

वल्लभीपूरमध्ये काकू नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो नगरशेठ होता. शहरातील अनेक मोठ्या वास्तू त्याच्या मालकीच्या होत्या. त्याच्या मुलीकडे सोन्याचा कंगवा होता, ज्यावर मौल्यवान हिरे होते. राजाच्या मुलीला याबद्दल समजलं. तिला तो कंगवा हवा होता. मात्र, काकूच्या मुलीने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे राजकन्या संतापली आणि तिने वडिलांकडे तक्रार केली.

राजाने स्वतः काकूकडे त्या कंगव्याची मागणी केली; पण काकूनेही तो देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे राजा संतापला आणि त्याने काकूच्या मुलीवर बलात्कार करण्यासाठी सैनिक पाठवले. या अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार करून काकूने मोठी रक्कम भेट म्हणून देत परकीय सैन्याची मदत मिळवली. या सैन्याने वल्लभीपूरची लूट केली.

संशोधक आणि इतिहासकारांनी आपल्या इतिहासग्रंथांमध्ये वल्लभीच्या वैभवाचं सुरेख वर्णन केलं आहे.

डॉ. शास्त्री यांनी वल्लभीच्या विनाशाची कथा जैन ग्रंथांमध्ये सविस्तर वर्णन केल्याचं नमूद केलं आहे. या परंपरागत कथेनुसार, वल्लभीचा राजा शिलादित्य याने शहरातील सर्वांत प्रतिष्ठित व्यक्ती असलेल्या काकूच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा रत्नजडित कंगवा हिरावून घेतला. या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती मुलगी म्लेंच्छांच्या प्रदेशात गेली. म्लेच्छांच्या राजाने मागितलेली रक्कम देऊन तिने वल्लभीवर आक्रमण करण्याची तयारी केली.

म्लेंच्छ सैन्य वल्लभीपूरमध्ये पोहोचल्यावर काकूच्या युक्तीमुळे राजा शिलादित्याचा दैवी घोडा आकाशात उडून गेला. राजा असहाय झाला. युद्धात त्याचा मृत्यू झाला आणि म्लेच्छांनी वल्लभीचा विध्वंस केला. ही घटना विक्रम संवत् 845 म्हणजेच इ.स 788-789 मध्ये घडल्याचं सांगितलं जातं.

अरबी लेखक अल्-बैरुनी याच्या नोंदींवरून जैन ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला ‘म्लेंच्छपती’ म्हणजे अल्-मन्सुरा येथील शासक म्हणजेच सिंधचा अरब गव्हर्नर असावा, असं मानलं जातं.

वल्लभीचा ऱ्हास कशामुळे झाला?

‘History of Saurashtra’ या पुस्तकात आणखी एका आख्यायिकेचा उल्लेख आहे. संकटाच्या काळात सूर्यकुंडातून सूर्याचा घोडा प्रकट होत असे. शिलादित्य त्या घोड्यावर स्वार होऊन युद्ध करत असे आणि त्यामुळे त्याचा नेहमी व्हायचा, अशी समजूत होती.

काकूने हे रहस्य अरबांना सांगितलं. त्यांनी गायींची हत्या करून त्यांचे मृतदेह सूर्यकुंडात टाकले. त्यामुळे घोडा आकाशात उडून गेला आणि शिलादित्य वाळवंटात भरकटला, अशी ही कथा आहे.

या पुस्तकातील नोंदीनुसार, वल्लभीपूरवर अचानक झालेल्या आक्रमणामुळे तेथील लोक आणि सैनिक भयभीत झाले. युद्ध किती भीषण होतं किंवा किती काळ चाललं, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र, खलिफाचा सेनापती अमर बिन जमाल याच्या सैन्याने युद्धात शिलादित्याचा वध केला आणि वल्लभीचं साम्राज्य इतिहासातून कायमचं पुसलं गेलं.

जैन ग्रंथांमधील नोंदींवरून असं दिसतं की, राजा शिलादित्य आणि राजधानी वल्लभीचा विनाश केल्यानंतर अरब सैन्य माघारी फिरलं. मात्र, त्यानंतर मैत्रक घराण्याची सत्ता पूर्णपणे संपुष्टात आली. अशा प्रकारे, मैत्रक घराण्याच्या अखेरच्या राजा शिलादित्याचं कथित अत्याचारी धोरण त्याच्या राज्याच्या दुर्दैवी अंताला कारणीभूत ठरल्याचं या कथांमधून मांडलं जातं.

जैन ग्रंथांसह अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये वल्लभीच्या विनाशाबाबत वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. त्यांपैकी नेमकी कोणती कथा निर्विवादपणे खरी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, बहुतेक कथांमध्ये रंक काकूची कथा किंवा तिच्याशी साधर्म्य असलेली आख्यायिका आढळते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC