Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, TUSHAR BAROT
अहमदाबादच्या शाहपूर भागातील सादुमाता नी पोलमध्ये, नवरात्रीच्या आठव्या रात्री दरवर्षी वातावरण काहीसं वेगळंच असतं.
या रात्री या परिसरातील पुरुष सोळा शृंगार करून सजलेले असतात. ते महिलांप्रमाणे पारंपरिक गुजराती साडी किंवा चनिया-चोळी घालतात. डोक्यावर ओढणी घेतात, केसांचा अंबाडा बांधतात, दागिने घालतात आणि डोळ्यांना काजळही लावतात.
महिलांचा वेश घेऊन नटलेले हे पुरुष सादुमाता चौकातील मंदिरासमोर गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्या श्रद्धेनुसार, हा गरबा केवळ आनंदासाठी किंवा मनोरंजनासाठी नसतो, तर देवीची माफी मागण्याचा एक भाग असतो.
गरबा गाताना हे पुरुष ‘सादुमातानो पावाडो’ गातात. पावाडो हा साधारणपणे छंद आणि दोह्यांच्या स्वरूपात रचलेला शौर्याचं वर्णन करणारा वीरकाव्याचा एक काव्यप्रकार आहे. मात्र, इथे या पावाडोत परिसरातील पुरुषांचा पश्चात्ताप व्यक्त केला जातो.
हा पावाडो अतिशय गंभीर आणि दुःखी स्वरात, शोकगीतासारख्या शैलीत गायला जातो. मंद ढोलाच्या तालावर वेगवेगळ्या रागांमध्ये त्याचं गायन केलं जातं.
या भागातील लोक गरबा गाताना म्हणतात:
“आम्ही तुमची चुकलेली मुलं आहोत, हे सादुमाते… आमचे अपराध माफ करा, आई, तुमच्या चरणी आम्हाला स्थान द्या!”
“डोक्यावर ओढणी घेऊन आम्ही चौकात आलो आहोत, मनापासून माफी मागण्यासाठी… हे सादुमाते, तू दयाळू आहेस, आम्हाला भरभरून आशीर्वाद दे!”
आता प्रश्न असा पडतो की, या भागातील पुरुष महिलांचे कपडे घालून गरबा का खेळतात? यामागे नेमकी काय श्रद्धा आहे? या अनोख्या परंपरेचा इतिहास काय आहे?
सादुबा कोण होत्या आणि त्यांची कथा काय आहे?
ही घटना साधारण 1816 च्या सुमाराची आहे. लोकसाहित्यावरील विविध संशोधन, चारण-बारोट समाजात सांगितल्या जाणाऱ्या जुन्या कथा आणि काही ऐतिहासिक नोंदींनुसार, सादुबा या अतिशय सुंदर स्त्री होत्या.
काही जाणकारांच्या मते, सादुबा या सिद्धपूरच्या रहिवासी होत्या. त्यांचा विवाह अहमदाबादमधील हरिसिंह (काहींच्या मते हथीसिंह) बारोट यांच्याशी झाला होता. काही जण त्यांचे आडनाव भाट असल्याचंही सांगतात.
अहमदाबादच्या इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक अच्युत याज्ञिक यांनी त्यांच्या ‘अहमदाबाद – रॉयल सिटी टू मेगा सिटी’ या पुस्तकात लिहिलं आहे की, 19व्या शतकाच्या सुरुवातीला अहमदाबादमध्ये मराठा पेशवे आणि गायकवाड यांची संयुक्त सत्ता होती. त्या काळात शहरामध्ये मोठा गोंधळ होता आणि लोकांना अनेक प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागत होतं.
फोटो स्रोत, Getty Images
अच्युत याज्ञिक लिहितात, “पेशव्यांचे शेवटचे सरसुभेदार रामचंद्र मुळलेकर यांनी शहरातील लोकांकडून पैसे उकळण्यासाठी एक अनैतिक मार्ग अवलंबला होता. त्यांनी शहरात लोकांची बदनामी करणारे आणि एकमेकांविरुद्ध कान भरणारे, चिथावणीखोर लोक नेमले होते. स्थानिक भाषेत त्यांना ‘चडिया’ असं म्हटलं जात असे.”
हे चडिया म्हणजे खबऱ्या लोक श्रीमंत आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि आर्थिक व्यवहारांबद्दलची खरी-खोटी, बदनामी करणारी माहिती सरसुभेदारांपर्यंत पोहोचवत असत. या माहितीच्या आधारे सरसुभेदार संबंधित नागरिकांना बोलावून घेत आणि त्यांच्याकडून दंडाच्या नावाखाली पैशांची वसुली करत असत.
जर कोणी दंड भरण्यास नकार दिला, तर त्याच्यावर अमानुष अत्याचार केले जात असत. पैसे भरेपर्यंत त्यांना कोठडीतही डांबून ठेवलं जात.
फोटो स्रोत, TUSHAR BAROT
बारोट समाजाचे नेते आणि सादुमाता मंदिराचे व्यवस्थापक तुषार बारोट यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, “हे चडिया पेशव्यांचे गुप्तहेर होते. त्यांचं संपूर्ण जाळं शहरात पसरलं होतं. त्यामुळे शहरात त्यांची दहशत होती.”
‘द जर्नी टू अहमदाबाद – मेगा सिटी’ या पुस्तकात लेखक महेश शहा लिहितात, “त्या काळात चडियांची टोळी इतकी वाढली होती की, ते शहराच्या सुभेदाराकडे लोकांच्या घरातील खासगी गोष्टी सांगत आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसेही उकळत असत. श्रीमंत लोक हे चडियांचे मुख्य लक्ष्य होते.”
ते लिहितात, “त्या काळात ‘ओतियो’ आणि ‘गोधियो’ नावाचे चडिया खूप कुप्रसिद्ध होते. याच काळात सादुबा नावाच्या एका महिलेविरोधात या चडियांनी खोटी तक्रार केली. त्यानंतर सरसुभेदारांनी सादुबा यांना पकडून दरबारात हजर करण्याचा आदेश दिला.”
अच्युत याज्ञिक यांनी ‘ओतिया’ नावाच्या चडियाचं खरं नाव उत्तमचंद असल्याचं नमूद केलं आहे. त्यांच्या मते, ओतियाने शाहपूरमध्ये राहणाऱ्या भाट समाजातील सादुबा नावाच्या चारित्र्यवान महिलेवर व्यभिचार आणि अनैतिक वर्तनाचे खोटे आरोप केले. या आरोपांच्या आधारे सरसुभेदारांनी सादुबा यांना अटक करण्यासाठी सशस्त्र सैनिक पाठवले.
बारोट समाजाचे नेते मधुभाई बारोट यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, “सादुबा सुंदर असल्यामुळे सैनिकांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले. तुमच्या घरात भांडणं सुरू आहेत, असं सांगून त्यांनी सादुबा यांना या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी राजवाड्यात येण्यास सांगितलं.”
बारोट समाजातील ‘त्रागा’ची प्रथा आणि आई-मुलाचं ‘बलिदान’
जेव्हा सरसुभेदार रामचंद्र मुळलेकर यांचे सैनिक सादुबा यांना पकडण्यासाठी आले, तेव्हा त्या दुःखी झाल्या आणि त्यांना खूप राग आला.
अच्युत याज्ञिक लिहितात, “त्या काळात भाट (बारोट किंवा चारण) समाजात स्वतःचा मान-सन्मान आणि सत्याचं रक्षण करण्यासाठी एक अनोखी परंपरा होती. तिला ‘त्रागा’ असं म्हणत. या परंपरेत स्वतःच्या शरीराला इजा करून घेणं किंवा प्राणांचं बलिदान देणं यांचा समावेश होता.”
तुषार बारोट सांगतात, “सादुबा यांना वाटलं की, आपल्यामुळे संपूर्ण समाजाचा नाश होईल. त्यामुळे त्यांनी बलिदान देण्याचा निर्णय घेतला.”
फोटो स्रोत, TUSHAR BAROT
सादुबा यांनी त्यांचे पती हरिसिंह यांना ‘त्रागा’ची परंपरा पाळण्याचा आग्रह केला. या परंपरेचा भाग म्हणून हरिसिंह यांनी आपल्या मुलीची हत्या केली. परंतु, काही जणांच्या मते त्यांनी मुलीऐवजी मुलाची हत्या केली होती.
‘अहमदाबाद – रॉयल सिटी टू मेगा सिटी’ या पुस्तकानुसार, “तरीही ओतिया सादुबा यांना सरसुभेदारांच्या महालातील अंतःपुरात घेऊन जाण्यास उत्सुक होता. त्यामुळे सादुबा यांनी आपल्या पतीला आपलाही जीव घेण्यास सांगितलं. अशा प्रकारे मुलगी (किंवा मुलगा) आणि आई, या दोघांनीही बलिदान दिलं.”
त्या काळात संपूर्ण गुजरातमध्ये भाट समाजात ‘त्रागा’ या परंपरेला खूप महत्त्व होतं. भाट समाजातील एखाद्या व्यक्तीची हत्या करणं हे मोठं पाप मानलं जात असत. सादुबा आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच भाट समाजातील लोकांमध्ये संताप उसळला.
अन्यायाचा विरोध करण्यासाठी हे लोक अहमदाबादच्या भद्रा भागातील महालाबाहेर, आझम खान सराई येथे एकत्र जमा झाले.
‘अहमदाबाद – रॉयल सिटी टू मेगा सिटी’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “लोकांनी सरसुभेदारांकडे ओतियाला शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु, सरसुभेदारांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भाट समाजासोबतच शहरातील व्यापारी, धर्मगुरू आणि फकीरही त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. हे सर्वजण एक दिवस आंदोलनाला बसले. त्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, ओतियाने सरसुभेदारांच्या महालात आश्रय घेतला होता.”
फोटो स्रोत, TUSHAR BAROT
तोपर्यंत अहमदाबादमध्ये इंग्रजांचाही प्रभाव वाढू लागला होता. त्यावेळी बडोद्याचे ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून काम करणारे कर्नल बेलेंटाइन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. परंतु, त्यांनाही यात यश आलं नाही.
लोकांचा संताप वाढतच गेला. त्यांना राजवाड्याबाहेर दोन चडिया दिसले. संतापलेल्या लोकांनी त्यांच्यावर विटा फेकून हल्ला केला. या हल्ल्यात एका चडियाचा मृत्यू झाला.
मधुभाई बारोट सांगतात, “गुजरातमध्ये पेशव्यांच्या विरोधात एका समाजाने एकत्र येऊन बंड केल्याची ही पहिलीच घटना होती.”
शेवटी लोकांनी सरसुभेदाराकडे ओतियाला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली. त्यांनी ओतियाची हत्या करणार नाही, असे वचनही दिले. त्याला शिक्षा म्हणून गाढवावर बसवून संपूर्ण शहरात फिरवू, असं त्यांनी सांगितलं.
इतिहासकारांच्या मते, चडियाची हत्या करायची नाही, या अटीवर सरसुभेदाराने ओतियाला लोकांच्या ताब्यात दिले. पण, लोकांनी दिलेलं वचन पाळले नाही.
अच्युत याज्ञिक आपल्या पुस्तकात लिहितात, “ओतियाची मिरवणूक (धिंड) महालापासून थोड्या अंतरावर गेली. कालूपूर गेटजवळ संतप्त जमावाने त्याच्यावर दगडफेक केली आणि त्याला ठार मारलं.”
सादुबा मातेचं मंदिर
इतिहासकारांच्या मते, या घटनेच्या एका वर्षानंतर म्हणजे 1817 मध्ये सादुबाच्या बलिदानाची आठवण म्हणून लोकांनी शहापूरमध्ये एक छोटंसं मंदिर उभारलं.
अच्युत याज्ञिक लिहितात, “लोकांनी सादुबाला सती मानलं आणि तिच्या सन्मानार्थ ‘सादुबाचे पावाडो’ रचले. काही दशकांनंतर प्रसिद्ध लेखक ए. के. फोर्ब्स यांच्या ‘रासमाला’ या पुस्तकात सादुबाच्या मंदिराचं चित्र प्रसिद्ध झालं. विसाव्या शतकात अहमदाबादच्या इतिहासावर लिहिलेल्या अनेक लेखांमध्ये आणि संशोधनांमध्ये सादुबाच्या या कहाणीचा उल्लेख करण्यात आला.”
तुषार बारोट सांगतात, “बारोट समाजातील लोकांना वाटलं की, आपण एका निरपराध स्त्रीला वाचवू शकलो नाही. त्यामुळे पश्चात्ताप म्हणून त्यांनी एक छोटं मंदिर बांधलं, देवासाठी एक छोटी जागा तयार केली आणि विहीर खोदली.”
फोटो स्रोत, Getty Images
बारोट समाजाचे प्रमुख निलेशभाई बारोट यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, “आमच्या पूर्वजांनी ठरवलं की, माफी मागण्याचा प्रयत्न म्हणून किंवा प्रायश्चित्त घेण्यासाठी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी (आसो सुद आठम), म्हणजेच नवरात्रीच्या आठव्या दिवशी, महिलांचे कपडे घालून गरबा खेळायचा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.”
या परंपरेबद्दल आणखी काही आख्यायिका, कथा सांगितल्या जातात. परंतु, त्यांना कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
मधुभाई बारोट सांगतात, “आज गरबा खेळायला येणाऱ्यांमध्ये आमच्या स्वतःच्या समाजातील पुरुषांपेक्षा इतर समाजातील पुरुषांची संख्या जास्त आहे. या मंदिरावरील लोकांची श्रद्धा जसजशी वाढत गेली, तसतसे लोक इथे गरबा खेळायला येऊ लागले.”
शहापूरमध्ये राहणारे जैमिन भावसार यांचीही या मंदिरावर श्रद्धा आहे. ते सांगतात, “मी यापूर्वी दोन वेळा महिलांचे कपडे घालून गरब्यात सहभाग झालो आहे. यंदाही मी गरबा खेळायला जाणार आहे. या मंदिरावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे या परंपरेत सहभागी होऊन मी देवीची भक्ती करतो.”
मेघाणींनी ‘सादुबा’ ही लघुकथा लिहिली
झवेरचंद मेघाणी यांनीही या घटनेवर आधारित ‘सादुबा’ नावाची लघुकथा लिहिली आहे. पण, या कथेत इतिहासासोबतच लोककथा आणि दंतकथांचाही समावेश आहे.
झवेरचंद मेघाणी यांची ही लघुकथा केवळ एका दंतकथेवर आधारित नाही. त्या काळातील समाजाचं वास्तव, जुन्या रूढी-परंपरा आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहणाऱ्या एका महिलेची ही कहाणी आहे. संवादांच्या माध्यमातून मेघाणी समाजाच्या भित्रेपणावर टीका करतात आणि महिलांचा सन्मान करण्याचा महत्त्वाचा आणि प्रभावी असा संदेश देतात.
फोटो स्रोत, Getty Images
मेघाणी या कथेत लिहितात, “सादुबाने चौकात लाकडं गोळा केली आणि त्यावर कापूर पेटवला. आगीच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेने झेपावू लागल्या. अग्निकुंडात उडी घेण्यापूर्वी सादुबाने पोलमधील (रहिवासी भाग) बंद खिडक्यांकडे हात करून लोकांना शाप दिला.”
सादुबा (शाप देत): “अरे पोलमध्ये राहणाऱ्या भित्र्या बारोटांनो! पुरुष असूनही तुम्ही एका स्त्रीची अब्रू वाचवू शकला नाहीत. तुम्ही घरात लपून बसलात. मी तुम्हाला शाप देते की, आजपासून तुमच्या पुरुषत्वाला कलंक लागेल. तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये पुरुष जन्माला आले, तरी त्यांना नवरात्रीच्या आठव्या दिवशी महिलांचे कपडे आणि साडी नेसून माझ्या चौकात येऊन माफी मागावी लागेल. असं केलं नाही, तर तुमचा वंश नष्ट होईल!”
“सादुबा अग्नीत उडी घेऊन आपले प्राण देतात. हे पाहून सैनिक घाबरून पळून जातात. काही वेळाने पोलची दारं उघडतात आणि पुरुष सादुबाच्या अस्थींसमोर जमिनीवर डोकं टेकवून दंडवत घालतात.”
पण, ही एक लघुकथा आहे. यात मेघाणी वास्तव आणि कल्पना यांची सांगड घालून कथेतून एक स्पष्ट संदेश देतात.
फोटो स्रोत, Getty Images
मेघाणी यांनी आपल्या लघुकथेत बारोट समाजातील लोकांचं वर्णन भित्रे असं केलं आहे. परंतु, तुषार बारोट यांना हे मान्य नाही. ते म्हणतात, “मेघाणी यांनी असं बरंच काही लिहिलं आहे, जे आमच्या समाजाला मान्य नाही.”
अशा प्रकारे, ‘सादुबाच्या बलिदाना’ची आठवण म्हणून बारोट समाजातील पुरुष सादुमाता पोलमधील मंदिराच्या चौकात महिलांचे कपडे परिधान करून गरबा खेळतात.
तुषार बारोट यांचा दावा आहे की, “जगभरात भूतकाळातील चुकांची आठवण म्हणून स्मारकं उभारली गेली असतील. परंतु, आपल्या पूर्वजांनी केलेली चूक जाहीरपणे मान्य करण्यासाठी पुरुषांनी महिलांचा वेश परिधान करून पश्चात्ताप करण्याची अशी परंपरा कदाचित जगात दुसरीकडे कुठेही नसेल.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




