Home LATEST NEWS ताजी बातमी मोबाईलमधील ‘ब्लूटूथ’ हे नाव पडलं तरी कसं? 1,000 वर्षांपूर्वीच्या राजाशी ‘असं’ आहे...

मोबाईलमधील ‘ब्लूटूथ’ हे नाव पडलं तरी कसं? 1,000 वर्षांपूर्वीच्या राजाशी ‘असं’ आहे कनेक्शन!

4
0

Source :- BBC INDIA NEWS

हॅराल्ड गोर्मसन, ज्याने 10 व्या शतकात डेन्मार्कवर राज्य केलं.

जेलिंगमध्ये सापडलेले 2 प्राचीन शिलालेख अशा एका वायकिंग राजाची कहाणी सांगतात ज्याने अखंड डेन्मार्क घडवला. त्याच्या नावावरूनच आज आपण वापरत असलेले ‘ब्लूटूथ’ हे नाव ठेवण्यात आले.

तुम्ही तुमचा फोन वायरलेस पद्धतीने हेडफोनला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करत असाल तर तुम्ही ‘ब्लूटूथ’शी परिचित असाल.

हे तंत्रज्ञान आजच्या आधुनिक युगातलं वाटत असलं, तरी या नावामागची कहाणी चक्क 1,000 वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकावणारी आहे. ही कथा आहे एका पराक्रमी वायकिंग राजाची. त्याच्या पाऊलखुणा कोपनहेगनपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या ‘जेलिंग’ या छोट्या डॅनिश शहरात आजही जिवंत आहेत.

या ठिकाणी उभे असलेले 2 प्राचीन काळातील शिलालेख त्यांच्या राजवटीची रंजक गोष्ट सांगतात. जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांपैकी एका तंत्रज्ञानाला त्यांचे हे विचित्र टोपणनाव कसे मिळाले, याबाबत ते माहिती देतात.

‘ब्लूटूथ’ नाव पडलेला वायकिंग राजा

हा राजा होता हॅराल्ड गोर्मसन. त्याने 10 व्या शतकात डेन्मार्कवर राज्य केलं. त्याचं टोपणनाव ‘ब्लूटूथ’ (जुनी नॉर्स भाषा: Blátǫnn) असं होतं. या नावाचा पहिला लिखित उल्लेख त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 150 वर्षांनी आढळतो. त्याच्या निळसर किंवा किडलेल्या दातामुळे त्याला हे टोपणनाव पडलं असावं, असं मानलं जातं.

जेलिंग येथील 2 शिलालेखांपैकी हॅराल्डने स्वतः कोरून घेतलेल्या मोठ्या शिलालेखावर असा उल्लेख आहे की, त्याने “स्वतःसाठी संपूर्ण डेन्मार्क आणि नॉर्वेवर ताबा मिळवला आणि तिथल्या लोकांना ख्रिश्चन केलं.” विशेष म्हणजे याच दगडावर स्कॅन्डिनेव्हियामधील येशू ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या रूपांपैकी एक रूप कोरलेलं पाहायला मिळतं.

“200 वर्षांच्या व्हायकिंग युगानंतर डेन्मार्क हे एक राष्ट्र म्हणून आकाराला येत होतं. तिथे या उत्तरेकडच्या लोकांना बऱ्याच गोष्टी अगदी कमी वेळात शिकाव्या लागल्या होत्या,” असं ‘कॉन्गेर्नेस जेलिंग एक्सपिरियन्स सेंटर अँड म्युझियम’चे क्युरेटर ॲडम बाक यांनी सांगितलं.

“ते युरोपातील वेगवेळ्या राजकीय पद्धती, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने मिळणारे फायदे आणि संपूर्ण राज्याची सत्ता एकाच जागी कशी केंद्रित करायची हे सर्व बारकाईने शिकून घेत होते.”

जेलिंग हे ठिकाण इतके महत्त्वाचे का आहे?

राजा हॅराल्डची जीवनगाथा जेलिंगच्या भूभागावर आजही कोरलेली दिसते. हॅराल्ड यांचे वडील गोर्म यांनी आपली पत्नी थायरा यांच्या आठवणीत येथील 2 शिलालेखांपैकी लहान आणि सर्वात जुना शिलालेख तयार करून घेतला. विशेष म्हणजे, डेन्मार्क देशाच्या अंतर्गतच ‘डेन्मार्क’ या नावाचा पहिल्यांदा लिखित स्वरूपात उल्लेख याच शिलालेखावर सापडतो, असं मानलं जातं.

जवळच्याच वेजले शहरात राहणाऱ्या अ‍ॅन हॅव्हगार्ड मिकेलसन म्हणतात, “आम्ही या शिलालेखाला ‘डेन्मार्कचा जन्मदाखला’ मानतो.” त्या अर्थाने जेलिंग हे डेन्मार्कचे जन्मस्थानच ठरते.

आज या गावात केवळ 4,000 लोक राहत असले, तरी राजा हॅराल्ड ब्लूटूथ यांच्या काळात हेच सत्तेचं सर्वात मोठं केंद्र होतं. सुरुवातीला पारंपरिक श्रद्धेनुसार दफनभूमी असणाऱ्या या जागेत हॅराल्ड यांच्या कारकिर्दीत जुन्या पॅगन आणि नव्या ख्रिश्चन परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

हॅराल्डच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक म्हणजे डेन्मार्कचं ख्रिश्चन धर्मात झालेलं धर्मांतर. हे साधारण 965 च्या सुमारास घडलं होतं, असं मानलं जातं.

पूर्वी जेलिंगच्या या संपूर्ण परिसराभोवती लाकडी तटबंदी होती, त्या जागा आज पांढऱ्या खांबांनी दर्शवल्या गेल्या आहेत. तसेच शेकडो खुणांच्या साहाय्याने एका भव्य जहाजाच्या आकाराची रचना रेखाटलेली दिसते. 2 दफन टेकड्या आणि 1 ख्रिश्चन चर्च मिळून हा संपूर्ण परिसर पूर्ण होतो.

क्युरेटर बाक सांगतात की, ही जागा “वायकिंग योद्ध्यांचे शौर्य किंवा थॉर व ओडिन या देवांविषयी कमी आणि इथले राजकारण, सत्ता व जुन्या परंपरा सोडून नव्या युगाकडे झालेली वाटचाल” जास्त अचूकपणे दाखवून देते.

1994 मध्ये जेलिंगच्या या टेकड्या, शिलालेख आणि चर्चला डेन्मार्कची पहिली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता मिळाली.

जवळच असलेल्या ‘काँगर्नस जेलिंग’ माहिती केंद्रात आधुनिक डिजिटल प्रदर्शनांद्वारे जुन्या वायकिंग परंपरा ते नव्या ख्रिश्चन धर्मापर्यंतचा हा रंजक प्रवास पाहायला मिळतो. तिकडे डेन्मार्कचा ‘जन्मदाखला’ आणि ‘बाप्तिस्म्याचा दगड’ ठरलेले ते 2 ऐतिहासिक शिलालेख आजही काचेच्या पेटीत सुरक्षित जपून ठेवलेले आहेत.

वायकिंग राजा ते ब्लूटूथचा रंजक प्रवास

1990 च्या दशकाच्या अखेरीस तोशिबा, आयबीएम, नोकिया, इंटेल आणि एरिक्सन या नामांकित कंपन्यांचे इंजिनीअर्स एका क्रांतिकारक तंत्रज्ञानावर एकत्र काम करत होते.

वेगवेगळ्या ब्रँड्सची उपकरणं एकमेकांशी जोडणं हा यामागचा उद्देश होता. या नवीन प्रोजेक्टसाठी त्यांना एका तात्पुरत्या सांकेतिक नावाची गरज होती.

अमेरिकन कंपनी इंटेलचे इंजिनीअर जिम कार्डाक जेव्हा स्वीडनच्या इंजिनीअर्ससोबत काम करत होते तेव्हा त्यांच्यात वायकिंग्सबद्दल चर्चा सुरू झाली.

या विषयात रस निर्माण झाल्यामुळे त्यांनी लगेच वायकिंग इतिहासावरचे एक पुस्तक वाचून काढले (हे पुस्तक आजही जेलिंगच्या म्युझियममध्ये पाहायला मिळते).

ज्याप्रमाणे त्यांचे हे नवीन तंत्रज्ञान वेगवेगळ्या उपकरणांना एकमेकांशी जोडणार होते, अगदी तसेच डेन्मार्क आणि नॉर्वेला एकत्र आणणाऱ्या त्या पराक्रमी राजाच्या इतिहासाने जिम यांना भुरळ घातली.

जेलिंगचे चर्च, दफन टेकड्या आणि हे शिलालेख डेन्मार्कच्या पहिल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा भाग आहेत.

अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्याआधीच ब्लुटूथ हे सांकेतिक नाव लिक झाले आणि त्यानंतर जे घडले तो तंत्रज्ञानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे.

“पीआर टीममधील लोकांना ते नाव अजिबात आवडले नाही. कारण ‘ब्लूटूथ’चा संबंध ते दातांच्या अस्वच्छतेशी जोडत होते,” असे बॅक म्हणाले. “त्यांना याची खूप काळजी वाटत होती आणि त्यांनी हे तंत्रज्ञान काय आहे हे चांगल्याप्रकारे सांगणारी अशी अनेक वेगवेगळी नावे सुचवली होती, पण ती खूपच कंटाळवाणी होती. ‘ब्लूटूथ’ हे नाव इतके वेगळे असल्यामुळेच ते खूप लोकप्रिय झाले.”

आज जगभरात मोबाईल आणि कॉम्प्युटरवर दिसणारा हा आयकॉनिक लोगो राजा हॅराल्ड ब्लूटूथ यांच्या स्मरणार्थ नॉर्स लिपीतले ‘H’ आणि ‘B’ ही 2 अक्षरे एकमेकांत गुंफून साकारला गेला आहे.

तब्बल 1,000 वर्षांनंतर अखंड राष्ट्र घडवणारा राजा म्हणून हॅराल्ड यांच्या नावाला अचानक एक नवीन ओळख मिळाली.

2023 मध्ये या तंत्रज्ञानाला 25 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा जिम कार्डाक आणि त्यांच्या सहकारी संस्थापकांनी ‘काँगर्नस जेलिंग’ला भेट दिली.

तिथे त्यांनी राजा हॅराल्ड यांच्या नावाचा परवानगी न घेता वापर केल्याबद्दल गमतीने माफी मागितली. संग्रहालयानेही त्यांची माफी स्वीकारत पुढील 1,000 वर्षांपर्यंत हे नाव वापरण्याची परवानगी त्यांना दिली.

“हॅराल्ड यांना स्वतःचे मोठेपण मिरवायला आवडायचे,” असं बाक म्हणाले. “मला वाटतं की, आज दररोज अब्जावधी लोक त्यांचं नाव घेतात हे जाणून त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC