Home LATEST NEWS ताजी बातमी तुळजापुरात तरुणाची हत्या, दुसऱ्याला गंभीर मारहाण, माजी नगराध्यक्ष अटकेत; नेमकं प्रकरण काय?

तुळजापुरात तरुणाची हत्या, दुसऱ्याला गंभीर मारहाण, माजी नगराध्यक्ष अटकेत; नेमकं प्रकरण काय?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

घटनेतील मुख्य आरोपी संतोष कदम (डावीकडे) आणि मारहाणीत मृत्यू झालेला 18 वर्षीय समीर जब्बार पटेल (उजवीकडे)

तुळजापूर शहरात 2 तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

या मारहाणीत समीर जब्बार पटेल या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून अरबाज सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109(1), 140(3), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2),352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी समीरच्या आई अन्सर पटेल यांनी दिलेल्या जबाबात माजी नगरसेवक संतोष देविदास कदम, संजय जाधव, प्रणव देवकते यांच्यासह इतर व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.

संतोष कदम या आरोपीचे वकील संजय पवार यांच्याशी बीबीसी मराठीने दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी अटक केलेल्या आरोपींचा या प्रकरणाशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचं म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

18 वर्षीय समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी. कॉम प्रथम वर्षात शिकत होता. शिक्षण घेत तो एका पावभट्टीत कामाला जातो. समीर पटेलचे वडील हे रिक्षा चालक असून आई गृहिणी आहे.

एफआयआरमधील जबाबानुसार, “3 नोव्हेंबर 2026 रोजी परीक्षा देऊन घरी परतलेल्या समीरला त्याच्या नातेवाईकांमार्फत घाटशिळ पार्किंग परिसरात बोलावण्यात आले. त्यानंतर त्याला संतोष कदम यांच्या घरी नेण्यात आले.”

“तिथे समीरला पूर्वीच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. यानंतर ते समीरला गाडीत घेऊन गेले. त्याचा मोबाईल हिसकावून सिमकार्ड काढून घेतले”, असेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कदम हे भारतीय जनता पार्टीशी निगडित असून ते शहराचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यांना अटक झाली आहे.

तक्रारीनुसार, रात्री समीरचा शोध घेत असताना तो भारतीबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात एका वॉचमनच्या घराशेजारी जखमी अवस्थेत आढळला. समीरच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. यावेळी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आपल्या मुलाला संतोष कदम यांच्या घरी बोलावून त्याला काठीने, पट्ट्याने, मारहाण करून जीवे ठार मारल्याचा आरोप अन्सर पटेल यांनी तक्रारीत केलाय.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कदम हे भारतीय जनता पार्टीशी निगडित असून ते शहराचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यांना अटक झाली आहे.

त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन बंद आला. कदम यांच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

बीबीसी मराठीशी बोलताना तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, “जे घडलंय ते अतिशय चुकीचं आहे. त्याच्या अनुषंगाने पोलीस खात्याला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. यातील आरोपींना तातडीने अटक केले आहे. बाकी एफआयआरच्या अनुषंगाने जी नाव आली आहेत त्यांचा शोध आणि तपास दोन्ही गोष्टी चालू आहेत. आम्ही यावर लक्ष ठेऊन आहोत आणि पोलिसांचे वरिष्ठही या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.”

जखमी तरुण काय म्हणाला?

या मारहाण प्रकरणात अरबाज सय्यद हा तरुण जखमी झालाय. त्याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेविषयी बोलताना जखमी अरबाज सय्यद सांगतो, ”मी ब्रिजजवळ थांबलेलो होतो. काही जणांनी मला मारहाण करत गाडीवर बसवून नेलं. मला शिंदे महाराज यांच्याकडे नेलं. तिथे मला अर्धा तास बेदम मारहाण केली. माझा मोबाईल चेक केला, त्यात काही सापडलं नाही, त्यानंतर मला आणखी मारलं.”

“त्यांनी मला विचारलं की, कुठल्या मुलीसोबत तुझे संबंध आहेत? मी मारहाणीच्या भीतीने म्हणालो की, तुम्ही म्हणाल तो गुन्हा कबूल करायला मी तयार आहे. नंतर ते समीर पटेलकडे गेले. त्याला इतकं मारलं की तो जाग्यावर मृत झाला. मी चक्कर येऊन पडलो, पाणी मागितलं तर पाणी सुद्धा दिलं दिलं नाही.”

पोलीस काय म्हणतात?

धाराशिवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर

याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धाराशिवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर म्हणाले, “या प्रकरणात आत्तापर्यंत 4 जणांचे आरोपी म्हणून नाव समोर आलं आहे. 2 अनोळखी इसम आहेत. त्यामुळे दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे.”

आरोपीच्या वकिलांनी काय म्हटलं?

संतोष कदम या आरोपीचे वकील संजय पवार यांच्याशी बीबीसी मराठीने दूरध्वनीवरून संपर्क केला. यावेळी ते म्हणाले, “अटक केलेल्या आरोपींचा या प्रकरणाशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्यांनी घरी बोलवून समजवण्याचं काम केलं. उलट मारणारे दुसरेच आहेत, आमच्या अशिलाचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि आम्ही तसे कोर्टात मांडले आहे.”

इम्तियाज जलील यांचा इशारा

AIMIM चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर एक मारहाणीचा व्हीडिओ शेअर केला.

त्यांनी म्हटलं, “तुळजापूर तालूक्यात एका आश्रमाच्या आवारात निर्घृणपणे मारहाण केल्याने 18 वर्षीय समीर जब्बार पटेल याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र अरबाज अफसर सय्यद यालाही मारहाण करण्यात आली. तो गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.”

“गैर-मुस्लीम मुलींशी बोलत असल्याच्या संशयावरून 20 जणांच्या गटाने दोन्ही मुलांना जबरदस्तीने एका ठिकाणी नेऊन पट्ट्यांनी आणि सळ्यांनी मारहाण केली. पोलीस महासंचालकांना विनंती आहे की, सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तात्काळ आणि कठोर कारवाई न केल्यास आम्ही तुळजापूर येथे भव्य मोर्चा काढू,” असा इशारा जलील यांनी दिला.

पोलीस ठाणे तुळजापूर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी देखील या घटनेबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, “देवेंद्रजी, तुमच्या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? तुळजापूरमध्ये समीर शेख या युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे, तर या अमानुष कृत्याचा व्हीडिओही बनवण्यात आला.”

“गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेनाशी झाली आहे का? या प्रकरणातील आरोपी हा तुमच्या पक्षाचा माजी नगराध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. मग सत्तेच्या बळावर गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे का?”

या प्रकरणावर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC