Source :- BBC INDIA NEWS
@HelleLyngSvends
हैदराबाद येथे होणाऱ्या ‘भारत समिट 2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी नॉर्वेच्या पत्रकार हेला लेंग येणार होत्या. परंतु, त्यांचा व्हिसा रद्द केल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणावरून वाद वाढला आहे.
हेला लेंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून सांगितलं की, समिटमध्ये सहभागी होता येऊ नये म्हणून त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे.
त्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही आरोप केले आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसने दावा केला आहे की, केवळ हेला लेंग यांनाच नाही, तर जवळपास 116 परदेशी प्रतिनिधींना भारतात येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
या प्रकरणावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

तेलंगणा सरकार आणि समृद्ध भारत फाउंडेशन मिळून ‘भारत समिट – फोर्जिंग अ न्यू वर्ल्ड’ या नावाने एका परिषदेचं आयोजन केलं होतं.
भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि जवाहरलाल नेहरू यांच्या 137व्या जयंतीनिमित्त 13 आणि 14 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ही परिषद झाली.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, भारतासह 70 हून अधिक देशांतील 1 हजारपेक्षा जास्त प्रतिनिधींना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.
परंतु, आता या परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
आयोजकांनी हेला लेंग यांना समिटमधील एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांना व्हिसाही मिळाला होता. परंतु, शेवटच्या क्षणी तो रद्द करण्यात आला.
याबाबत त्यांनी एक्सवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
हेला लेंग यांनी आपल्या व्हीडिओत काय म्हटलं?
हेला लेंग यांनी आपल्या व्हीडिओमध्ये म्हटलं, “हा संदेश अमित शहा यांच्यासाठी आहे. आज मी पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात जाणार होते. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. मी जाण्याची तयारीही केली होती. माझं सामान बांधलं होतं आणि पासपोर्टवर व्हिसाही लागला होता. भारतात जाण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज होते.”
“परंतु, विमानतळावर जाण्यासाठी निघण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी नॉर्वेतील भारतीय दूतावासाचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, ‘तुम्ही आज भारतात जाऊ शकत नाही.’ हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. कारण माझ्याकडे राजकीय मंजुरी होती, व्हिसाही होता आणि हैदराबादमध्ये होणाऱ्या परिषदेत माझी वाट पाहिली जात होती.”
@HelleLyngSvends
हेला लेंग यांनी सांगितलं, “या परिषदेत मला प्रसारमाध्यमं, पत्रकारितेचं स्वातंत्र्य आणि लोकशाही या विषयांवर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पण, मला व्हिसा दिला असला तरी भारतात प्रवेश मिळणार नाही, असं मला सांगितलं गेलं.”
“अमित शाह, इथेच तुमची भूमिका समोर येते. हा विषय तुमच्या अखत्यारित येणाऱ्या गृह मंत्रालयाशी संबंधित असल्याचं दिसतं. कारण याच मंत्रालयाने मला भारतात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.”
हेला लेंग म्हणाल्या, “हे का करण्यात आलं, ते मला समजत नाही. पण, हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं मला वाटतं.”
त्या म्हणाल्या, “मे 2026 मध्ये नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला होता. त्यासाठी मी पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा वापर केला होता. कदाचित त्याचा या गोष्टीशी संबंध असावा.”
“माझ्या नॉर्वेतील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून आणि ऑनलाइन माध्यमांतून मी भारतीय लोकांपर्यंत माझी मतं मांडली होती. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीकाही केली होती. त्यामुळे तर माझा व्हिसा रद्द करण्यात आला नाही ना, असाही प्रश्न मला पडला आहे.”
“माझ्या लेखांमधून मांडलेली मतं किंवा मी घेतलेल्या मुलाखती यामुळे तर हा निर्णय घेतला गेला नाही ना, असाही विचार माझ्या मनात येत आहे.”
ANI
याच वर्षी मे महिन्यात हेला लेंग चर्चेमध्ये आल्या होत्या. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान योनास गार स्टोरे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भाषणं संपल्यानंतर ते तिथून निघत होते. त्याचवेळी पत्रकार हेला लेंग यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला, “पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?”
लेंग यांनी भारतातील प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या स्थितीबाबतही प्रश्न विचारले. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत आणि ते पुढे निघून गेले.
परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितलं?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकारांना सांगितलं, “व्हिसा देण्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक देशाच्या सरकारकडे असतो. तो सरकारच्या सार्वभौम अधिकारक्षेत्रात येतो. या विषयावर मला इतकंच सांगायचं आहे.”
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि यूपीए सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री राहिलेले सलमान खुर्शीद, तसेच समिटचे आयोजक आणि समृद्ध भारत फाउंडेशनचे पुष्पराज देशपांडे यांनीही हेला लेंग यांच्या आरोपांना पाठिंबा दिला आहे.
हेला लेंग प्रकरणावर सलमान खुर्शीद यांनी बीबीसीला सांगितलं, “हे व्हिसा कोण रद्द करत आहे, याची मी कल्पनाही करू शकत नाही. कदाचित हे देवानेच केलं असावं…”
“जगाच्या कानाकोपऱ्यातून इतके लोक भारतात येऊ इच्छित असताना त्यांना जाणीवपूर्वक का रोखलं जात आहे? काही लोकांना येण्यापासून रोखलं जात आहे, तर काहींना परवानगी दिली जात आहे. काहींना वाट पाहायला सांगितलं जात आहे, तर काहींना विमानतळावरूनच परत पाठवलं जात आहे. काही जणांचे व्हिसा तर अगदी शेवटच्या क्षणी रद्द केले जात आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

सलमान खुर्शीद म्हणाले की, सरकारनेच याचं उत्तर द्यायला पाहिजे.
ते म्हणाले, “आम्ही 116 जणांच्या व्हिसासाठी मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक निमंत्रित व्यक्तीसाठी मंजुरी घ्यावी लागेल, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही संपूर्ण यादी पाठवली. पण, काही जणांना मंजुरी मिळाली, तर काहींना नाकारण्यात आली.”
“कोणाची मंजुरी का नाकारली, हे सरकारने स्पष्ट करायला हवं.”
समृद्ध भारत फाउंडेशनचे आयोजक पुष्पराज देशपांडे यांनीही बीबीसीशी बोलताना सांगितलं, “या प्रकरणात राजनैतिक बाबींचा संबंध असल्याने ज्यांना परत पाठवण्यात आलं, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. परंतु, अनेकांना विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.”
“आयव्हरी कोस्टच्या एका माजी राष्ट्राध्यक्षांनाही विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना त्रास देण्यात आला.”
त्यांनी सांगितलं, “आम्ही आमच्याकडून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं होतं. अनेक प्रतिनिधींना राजकीय मंजुरीही मिळाली होती. असं असतानाही जर त्यांना परत पाठवलं जात असेल, तर यामागे काहीतरी मोठी अडचण आहे.”

पुष्पराज देशपांडे म्हणाले, “तुम्ही हेला लेंग यांचं प्रकरण पाहिलंच आहे. अशी आणखीही अनेक प्रकरणं आहेत.”
“दूतावासांमध्ये अनेक अधिकारी आहेत. काही दूतावास संबंधित लोकांनी सरकारवर टीका केली आहे का, हे तपासण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट मागवत आहेत.”
ते म्हणाले, “भारत सरकार दूतावासांना असे निर्देश देत आहे की नाही, हे मला माहीत नाही. परंतु, दूतावासांमधील काही अधिकारी सोशल मीडियावरील पोस्ट तपासत आहेत. सलमान खुर्शीद यांनीही याबाबत सांगितलं आहे. हे अधिकारी संबंधित लोकांचे व्हिसा अर्ज स्वीकारण्यास नकार देत आहेत किंवा राजकीय मंजुरी मिळाल्यानंतरही त्यांचे अर्ज फेटाळून लावत आहे.”
“या सर्व घटना पाहून नेमकं काय घडत आहे, हेच मला समजत नाही.”
भारत समिट म्हणजे काय?
‘भारत समिट’ ही परिषद गेल्या वर्षीही तेलंगणात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भारतासह विविध देशांमधील वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, राजनैतिक अधिकारी, राजकीय नेते आणि प्राध्यापक सहभागी होतात.
या परिषदेत अनेक चर्चासत्रं आयोजित केली जातात. त्यात आजच्या जगासमोरील आव्हानं, या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका, इतर देशांशी भारताचे संबंध आणि लोकशाही अधिक मजबूत करण्याचे मार्ग अशा विविध विषयांवर चर्चा होते.
राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर प्रमुख नेते यांच्यासोबतच अनेक देशांतील विचारवंत आणि राजकीय नेतेही या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांची विचारसरणी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी मिळतीजुळती आहे.
या समिटबद्दल पुष्पराज देशपांडे म्हणाले, “तेलंगणा केवळ गुंतवणुकीसाठीच नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीही खुले आहे. त्यामुळेच अनेक पुरोगामी गट या समिटला ‘ग्लोबल साऊथचं राजकीय दावोस’ असं म्हणत आहेत.”
त्यांनी म्हटलं, “आज संपूर्ण जग अनेक समस्यांचा सामना करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि गगनाला भिडलेली महागाई आपण सर्वजण अनुभवत आहोत. सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होऊ नये, असं आपल्याला वाटत असेल, तर पश्चिम आशियातील देशांशी कसं बोलायचं, इराणशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची, रशिया, अमेरिका आणि व्हेनेझुएलाशी कशाप्रकारचे संबंध ठेवायचे, यावर आपण चर्चा करायला नको का?”

पुष्पराज देशपांडे म्हणाले, “आपल्याला अलिप्ततावादी चळवळीचा आणि नेहरूंचा वारसा लाभला आहे. आपण सर्व देशांशी संवाद साधतो. इतर देश कोणत्या समस्यांचा सामना करत आहेत आणि त्यांना भारताकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणं हा आमचा उद्देश आहे.”
तेलंगणातील भाजप नेत्यांनीही या परिषदेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेत्यांनी या परिषदेला ‘भारतविरोधी समिट’ असं म्हटलं आहे. सलमान खुर्शीद यांनी भाजपच्या या आरोपाचा निषेध केला आहे.
यावर पुष्पराज देशपांडे म्हणाले, “हा केवळ विचारांची देवाणघेवाण करण्याचा एक मंच आहे. इथे कोणत्याही वादग्रस्त विषयावर चर्चा होत नाही. इथे जे काही घडत आहे, ते देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठीच आहे.”
“देशाचं आणि भारतातील जनतेचं भलं व्हावं, हीच आमची इच्छा आहे. याच उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या देशांतील प्रतिनिधींना एकत्र आणत आहोत. त्यांच्याकडील चांगल्या पद्धती आणि विचार समजून घेणं आणि त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण करणं, हा यामागचा मुख्य हेतू आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




