Home LATEST NEWS ताजी बातमी कंबर, मान आणि सांधे का दुखतात? कोणत्या व्यायाम आणि आहारामुळे हे दुखणं...

कंबर, मान आणि सांधे का दुखतात? कोणत्या व्यायाम आणि आहारामुळे हे दुखणं थांबवता येतं जाणून घ्या

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मान दुखत असलेली महिला (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

वाढत्या वयासोबतच अनेक लोकांना हाडांच्या विविध समस्या जाणवू लागतात.

पण आजकाल अगदी तरुणांमध्येही मानदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मात्र, या समस्या सुरू होण्याआधीच त्या रोखणे शक्य आहे का? आणि जर तुम्हाला आधीच असा त्रास होत असेल तर त्यावर नेमका उपाय काय?

बीबीसी पंजाबीच्या ‘सेहत सिक्रेट्स’ या हेल्थ पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रुपिंदर सिंग चाहल यांनी याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. डॉ. रुपिंदर सिंग हे सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील स्पाइन सर्जरी विभागाचे व्हाइस चेअरमन आहेत.

प्रश्न: संधिवात म्हणजे नेमकं काय आणि हा त्रास का सुरू होतो?

उत्तर: आर्थरायटिस किंवा संधिवात म्हणजे सांध्यांना सूज येणे. यातील सर्वात सामान्य आणि मुख्य प्रकार म्हणजे ‘ऑस्टिओआर्थरायटिस’. वाढत्या वयासोबत सांध्यांची झीज होऊन त्यांना सूज येते तेव्हा हा त्रास उद्भवतो.

संधिवात हा एकच विशिष्ट आजार नसून यात अनेक आजारांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, वाढत्या वयानुसार सांध्यांची झीज झाल्यामुळे होणारा ऑस्टिओआर्थरायटिस. तसेच ऑटो-इम्यून आर्थरायटिस, ज्यामध्ये शरीराची स्वतःचीच रोगप्रतिकारशक्ती आपल्या सांध्यांवर हल्ला करू लागते.

संधिवात हा अनेक विकारांचा एक प्रकार आहे. आजकाल हा त्रास झपाट्याने वाढत आहे. कारण तो थेट आपल्या बदलत्या जीवनशैलीशी संबंधित आजार बनला आहे. लठ्ठपणा आणि अनुवंशिकता ही यामागची सर्वात मोठी कारणे आहेत. याशिवाय सिगारेट, दारूचे व्यसन आणि मधुमेह हेदेखील संधिवात बळावण्याचे मुख्य घटक ठरत आहेत.

बीबीसीच्या पत्रकार प्रियांका धीमान यांनी डॉ. रुपिंदर सिंग चाहल यांच्याशी हाडांच्या समस्यांविषयी संवाद साधला आहे.

प्रश्न: लहान मुलांमध्ये हा त्रास नेमका कशामुळे होतो?

उत्तर: काही मुलांमध्ये हा दोष अनुवंशिक असतो. विशेषतः सांध्यांशी निगडित अशा तक्रारी, ज्या वेळेनुसार हळूहळू आणखी बिघडत जातात.

याव्यतिरिक्त शारीरिक हालचालींची कमतरता आणि वाढलेला लठ्ठपणा हेसुद्धा यामागील मोठे कारण आहे. दुसरीकडे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. आजकाल आपण खातो ते अन्न, प्रामुख्याने ‘जंक फूड’ हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते आणि आपल्या आहारात पौष्टिक अन्नाचा अभाव असतो.

मुळात शारीरिक हालचालींचा अभाव आहे. खेळ आणि मोकळी मैदाने आता नाहीशी झाली आहेत. तर शाळांमध्ये मुलांसाठी खेळायला पुरेशी जागाच उरलेली नाही.

प्रश्न: सुरुवातीला कोणती लक्षणे दिसून येतात?

उत्तर: सर्वात मोठी अडचण म्हणजे सांध्यांचे दुखणे दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाते.

एरवी साध्या दुखण्यात थोडेफार चालल्यामुळे त्रास होतो आणि काही वेळाने तो आपोआप बराही होतो. पण या दुखण्यात तसे होत नाही. ही वेदना थांबतच नाही. सांध्यांवर सूज येते आणि सांध्यांची हालचाल हळूहळू मंदावते किंवा कठीण होते.

रोजच्या शारीरिक कष्टांमुळे होणारे दुखणे साधारणपणे काही दिवसांत आपोआप थांबते. पण हा त्रास मात्र संपत नाही, सतत जाणवत राहतो. काही वेळा सांध्याभोवतीची जागा लाल पडते किंवा तिथे इन्फेक्शन होते. ही सर्व लक्षणे त्या सांध्याची कार्यक्षमता आणि आयुष्य कमी झाल्याचे स्पष्ट संकेत देतात.

कंबर दुखत असलेल्या महिलेचा प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: तुमच्याकडे सध्या कोणत्या त्रासाचे रुग्ण सर्वात जास्त येत आहेत?

उत्तर: आजकाल आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने सांधेदुखीच्या तक्रारी जास्त असतात. अतिभारामुळे होणारा त्रास, ज्याला वैद्यकीय भाषेत आर्थरायटिस म्हणतात. आपल्याकडे बोलीभाषेत ‘गुडघ्यातले किंवा सांध्यातले वंगण संपले’ असे म्हटले जाते.

दुसरा सर्वात मोठा त्रास म्हणजे हाडे ठिसूळ आणि कमजोर होणे. तिसरी गंभीर बाब म्हणजे पंजाबमधील निम्म्या भागात पाण्याचा दर्जा अत्यंत वाईट आहे. पाण्यात जास्त फ्लोराइड असल्यामुळे होणारा ‘फ्लोरोसिस’ हा दात आणि हाडे दोन्ही आतून पोखरतो ज्यामुळे किरकोळ धक्क्यानेही हाडे मोडण्याचा धोका कित्येक पटींनी वाढतो.

प्रश्न: हाडे कमकुवत नेमकी कशामुळे होतात?

उत्तर: हाडांच्या कमकुवतपणामागे एखादा आजार, झालेली दुखापत किंवा आहारात कॅल्शियमसारख्या पोषक घटकांचा अभाव ही प्रमुख कारणे असू शकतात. नियमित व्यायामाची कमतरता आणि काही औषधांचा प्रभाव यामुळेही हाडे कमजोर होतात.

याशिवाय व्यसनाधीनता हेही एक मोठे कारण आहे. धुम्रपान किंवा दारूचे अतिसेवन केल्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होते आणि हाडे आतून पोकळ होऊ लागतात.

प्रश्न: हाडे ठिसूळ झाल्यावर शरीरावर त्याचे काय परिणाम दिसतात?

उत्तर: हाडे कमजोर झाली की वारंवार बारीक फ्रॅक्चर होतात आणि त्यामुळे शरीरात सतत दुखणे राहते. वजन सांभाळणारे सांधे कमजोर पडू लागतात.

बऱ्याचदा कुठलाही मोठा मार लागलेला नसतानाही पाठदुखीचा त्रास सुरू होतो. महिलांमध्ये ही समस्या प्रामुख्याने जास्त दिसते. कारण मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेनची पातळी वेगाने घटते. परिणामी त्यांच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर होण्याचा धोका वारंवार उद्भवतो.

प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रुपिंदर सिंग चाहल

प्रश्न: गुडघेदुखीचा त्रास नेमका का होतो?

उत्तर: गुडघ्याचा सांधा थोडा वेगळा आहे. कारण आपल्या शरीराचा बहुतांश भार याच सांध्यावर पडतो. याची हालचाल एकाच दिशेने शक्य असते. एकतर गुडघा वाकवता येतो किंवा सरळ करता येतो. या दोन्ही हाडांमध्ये खूप कमी अंतर असते जिथे ‘कार्टिलेज’ म्हणजे गादीसारखे मऊ हाड असते.

या कार्टिलेजवर प्रमाणाबाहेर भार आला की त्याची झीज सुरू होते. तसेच खेळताना अचानक गुडघा पिरगाळला गेला तर हे कार्टिलेज आतून फाटू शकते. याला वैद्यकीय भाषेत ‘मेनिस्कस टीअर’ म्हणतात.

या सांध्यावर वरच्या बाजूला ‘पटेला’ म्हणजे आपल्या गुडघ्याची वाटी असते. तिथे जागा खूप कमी असल्यामुळे एखादी दुखापत झाल्यास तिथे लगेच रक्त किंवा पाणी साचते आणि त्यामुळे प्रचंड वेदना सुरू होतात.

प्रश्न: गुडघा प्रत्यारोपणाची प्रक्रिया नेमकी काय असते?

उत्तर: लोकांना बऱ्याचदा वाटते की गुडघा निकामी झाला तर नवीन गुडघा आणून बसवला की तो लगेच काम करू लागेल. पण वस्तुस्थिती तशी नसते. गुडघ्याच्या आत असणारे कार्टिलेज पूर्णपणे झिजल्यामुळे दोन्ही हाडांमधील गॅप संपतो.

लोक अनेकदा म्हणतात की हाडांमधली जागा कमी-जास्त झाली आहे. पण मूळ अडचण अशी असते की आतली गादी म्हणजेच कार्टिलेज नष्ट झालेले असते. या प्रक्रियेत सांध्याचा तो खराब झालेला थर तासून काढला जातो आणि तिथे स्टील किंवा टायटॅनियमपासून तयार केलेले दोन इम्प्लांट्स बसवले जातात.

आणि त्या दोन्ही भागांमध्ये प्लास्टिकचा एक तुकडा बसवला जातो. जेणेकरून गुडघा सहजपणे वाकवता यावा. पण ही शस्त्रक्रिया नेमकी कधी करावी, हे समजणे फार गरजेचे आहे. आजची मुख्य अडचण म्हणजे या कृत्रिम इम्प्लांट्सचे आयुष्य केवळ 15 ते 20 वर्षे इतकेच असते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया नेहमी शेवटचा पर्याय मानली पाहिजे.

साध्या गुडघेदुखीवर थेट नी रिप्लेसमेंट करणे हा काही प्राथमिक उपचार नाही. गरजेनुसार योग्य वेळी केली, तरच ही सर्जरी अत्यंत प्रभावी ठरते. मात्र वजन फार जास्त असेल किंवा हाडे आधीच ठिसूळ असतील आणि स्टीलचे इम्प्लांट बसवून त्यावर भार टाकला, तर ते योग्य प्रकारे काम करत नाही. तसेच जर तुमचे स्नायू पुरेसे बळकट नसतील तर शस्त्रक्रियेनंतरही तुम्हाला नीट चालता येणार नाही.

साध्या गुडघेदुखीवर थेट नी रिप्लेसमेंट करणे हा कायमस्वरूपी किंवा प्राथमिक उपाय नाही.

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: या सर्जरीला एकूण किती खर्च येतो?

उत्तर: प्रत्येक हॉस्पिटलनुसार हा खर्च वेगवेगळा असू शकतो. हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि ते कोणत्या भागात आहे, यावर खर्च ठरतो. शिवाय वेगवेगळ्या राज्यांमध्येही दरांमध्ये फरक पडतो.

याव्यतिरिक्त इम्प्लांटचा खर्चही असतो. सरकारने एका विशिष्ट इम्प्लांटची कमाल किंमत ठरवून दिलेली असली, तरी एकूण उपचारांचा खर्च हा शहर आणि परिसराच्या हिशोबाने कमी-जास्त होऊ शकतो.

म्हणजे काही ठिकाणी या सर्जरीसाठी साधारण 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो, तर इतर काही ठिकाणी हा खर्च 10 लाख रुपयांपर्यंतही पोहोचू शकतो.

प्रश्न: पाठदुखी आणि मानदुखीचे मुख्य कारण काय असते?

उत्तर: यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. बसण्या-उठण्याची चुकीची पद्धत, दिवसभर एकाच जागेवर बसून राहणे किंवा मोबाईल वापरताना सतत खाली मान झुकवून ठेवणे. विद्यार्थ्यांमध्ये याला प्रामुख्याने ‘टेक्स्ट नेक’ किंवा ‘टीचर नेक’ म्हटले जाते.

अजिबात हालचाल न केल्यामुळे सांध्यांवर सतत भार राहतो. दुसरीकडे यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचाही धोका असतो. तुम्ही चालणे-फिरणे थांबवले, की हाडांमधले कॅल्शियम आपोआप कमी होऊ लागते आणि हाड मोडण्याची म्हणजे फ्रॅक्चर होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते.

नायूही बळकट होऊ शकत नाहीत. ही यामागची मुख्य कारणे ठरतात. जर तुम्ही रोज 8 तासांची ड्युटी करत असाल तर दर 30 ते 45 मिनिटांनंतर एकदा जागेवरून उठणे आवश्यक आहे.

एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपल्या पाठीच्या मणक्यांमध्ये ‘डिस्क’ असतात, ज्या गाडीच्या शॉक अ‍ॅब्जॉर्बरसारख्या धक्के सहन करण्याचे काम करतात. त्यावर एकाच जागी सतत दाब पडू देऊ नका. याचाच अर्थ असा की खूप जास्त वेळ एकाच पोझिशनमध्ये बसून किंवा उभे राहू नका.

मान गोल-गोल फिरवू नये,पाहा डॉक्टर काय सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: मान आणि पाठीच्या दुखण्यावर नेमका कोणता व्यायाम करावा?

उत्तर: मानेच्या बाबतीत लोक सर्रास एक मोठी चूक करतात, ती म्हणजे मान गोल-गोल फिरवणे. असे अजिबात करू नये. कारण मानेचा सांधा हा काही खांद्यासारखा चौफेर फिरणारा ‘बॉल आणि सॉकेट’ सांधा नसतो.

तुम्ही मान जितक्या वेळा अशी गोल फिरवता, तितक्या वेळा तिथल्या नाजूक जॉइंट कॅप्सूलला दुखापत होते. म्हणून मान फिरवण्याऐवजी ती 6 योग्य दिशांमध्ये स्ट्रेच करा. पुढे, मागे आणि दोन्ही बाजूंना वाकवा. त्याचबरोबर खांद्यांचा व्यायाम करा; खांदे 10 वेळा पुढून मागे आणि 10 वेळा मागून पुढे गोलाकार फिरवून थोडे वर-खाली करा.

दिवसभर बसून काम करणाऱ्यांना मी दर तासाला हा स्ट्रेचिंगचा व्यायाम करण्याचा सल्ला देतो. शिवाय मी सर्वांना आणखी एक सोपी टीप देतो..जेव्हा कोणी तुम्हाला भेटायला येईल तेव्हा अर्धा-पाऊण तास बसून राहिल्यावर खुर्चीवरून उठून त्यांचे स्वागत करा. यामुळे दुहेरी फायदा होतो…तुम्ही स्वागतासाठी उठलात म्हणून समोरचा माणूस प्रभावीत होतो आणि तुमच्या पाठीलाही सततच्या भारापासून थोडी विश्रांती मिळते.

पाठीच्या दुखण्यावर पाठीवर झोपून ‘एअर सायकलिंग’ करणे चांगले ठरते. शिवाय ‘ब्रिजिंग’ करणेसुद्धा अत्यंत गुणकारी मानले जाते.

प्रश्न: बसण्याची पद्धत नेमकी कशी ठेवायला हवी?

उत्तर: जर तुमचे काम तासनतास बसून राहण्याचे असेल, तर खुर्चीखाली पायाला एक फूटरेस्ट असायला हवा, जेणेकरून गुडघे थोडे वाकलेले आणि किंचित वर राहतील. याशिवाय खुर्चीला हातांसाठी आर्मरेस्ट म्हणजे हात ठेवण्यासाठी आधार असणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्ही आरामात बसू शकता.

पाठीच्या खालच्या भागातील ठेवणीला (लॉर्डोसिस) आधार देण्यासाठी आजकाल पाठीच्या कण्याला सपोर्ट करणाऱ्या चांगल्या खुर्च्या मिळतात. खुर्ची खूप जास्त मऊ नसावी, नाहीतर तुम्ही त्यात रुतून बसाल आणि उठताना त्रास होईल. खुर्ची थोडी कडक आणि आधार देणारी असावी. केवळ योग्य पद्धतीने बसणे पुरेसे नसून मधूनमधून पोझिशन बदलत राहणेही खूप गरजेचे आहे. म्हणूनच दर 30 ते 45 मिनिटांनी एकदा खुर्चीवरून उठून फेरफटका मारा. बसताना कधीही वाकून बसू नका. नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवूनच बसा.

तज्ज्ञांच्या मते बसताना पाठ सरळ ठेवा आणि सरळ बसण्याचा प्रयत्न करा.

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: हाडांच्या मजबुतीसाठी आहारात कशाचा समावेश करावा?

उत्तर: कॅल्शियमने भरपूर असलेला आहार सर्वात जास्त फायदेशीर ठरतो. दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्रोत आहेच, सोबत पनीर आणि दह्यातूनही भरपूर कॅल्शियम मिळते. शेवग्याची पाने किंवा शेंगा, ज्याला ड्रमस्टिक अथवा ‘मोरिंगा’ म्हणतात. दक्षिण भारतात त्याचा वापर खूप होतो. हा कॅल्शियमचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. याव्यतिरिक्त बदाम आणि नाचणीमध्येही कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगले असते.

जर शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात अडथळा आणणारा एखादा आजार असेल तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या आवश्यकतेनुसार सप्लिमेंट्स घेता येतात. पण ही सप्लिमेंट्स प्रमाणापेक्षा जास्त घेणे अंगाशी येऊ शकते. खासकरून व्हिटॅमिन डीच्या बाबतीत.

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेतल्यास किडन्या निकामी होण्याचा किंवा त्यांना इजा पोहोचण्याचा धोका असतो. हे चरबीत विरघळणारे (फॅट-सोल्युबल) व्हिटॅमिन असल्याने शरीरात बराच काळ साठून राहते.

साधारणपणे व्हिटॅमिन डीचा डोस डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहूनच ठरवतात. त्यामुळे आधी रक्ताची तपासणी करून व्हिटॅमिन डीची पातळी जाणून घेणे आणि नंतरच योग्य डोस सुरू करणे जास्त योग्य ठरते. गरजेपेक्षा जास्त किंवा डॉक्टरांना न विचारता व्हिटॅमिन डी घेणे टाळावे.

हल्ली कॅल्शियमच्या गोळ्यांसोबत रोजच्या गरजेइतके व्हिटॅमिन डी एकत्रच मिळून जाते. मात्र अनेक लोक डॉक्टरांना न विचारताच आठवड्याला एक व्हिटॅमिन डीची गोळी परस्पर खाताना दिसतात.

पण लक्षात ठेवा, वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेऊ नये. कारण याचे अतिसेवन किडन्या खराब करू शकते.

आजकाल व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 या दोन सप्लिमेंट्सचा वापर खूप वाढला आहे. यातील व्हिटॅमिन B12 हे पाण्यात सहज विरघळते त्यामुळे शरीराला नको असलेला भाग लघवीवाटे लगेच बाहेर पडतो. मात्र, व्हिटॅमिन डी चरबीत साठून राहत असल्याने ते घेताना खूप सावधगिरी बाळगायला हवी.

प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रुपिंदर सिंग चाहल

प्रश्न: काय टाळणे गरजेचे आहे?

उत्तर: धुम्रपान आणि मद्यपान शरीराचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांचे सेवन टाळायला हवे. तसेच गरज नसताना आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड्स घेणे टाळावे. कारण स्टिरॉइड्समुळे हाडे कमजोर होऊ शकतात.

अनेक गंभीर आजारांमध्ये स्टिरॉइड्स रुग्णाचा जीव वाचवणारी ठरतात. पण डॉक्टर त्यांचे प्रमाण अतिशय मोजून-मापून ठरवून देतात. औषध कधी सुरू करायचे, त्याचा डोस हळूहळू कसा कमी करत न्यायचा आणि ते कधी पूर्णपणे बंद करायचे, याचे एक नियोजन असते. बऱ्याचदा स्टिरॉइड्स एकदम अचानक बंद करता येत नाहीत.

खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा गरज नसताना स्टिरॉइड्स दिले किंवा घेतले जातात. कारण त्यामुळे सूज लगेच कमी होते. म्हणूनच हाडांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर स्टिरॉइड्स नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत.

हाडे बळकट ठेवण्यासाठी चांगल्या आहारासोबत व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. हाडांवर योग्य पद्धतीने जितका भार पडेल आणि तुम्ही शरीराची जितकी हालचाल कराल, हाडांची ताकद टिकून राहण्यास तितकीच जास्त मदत होईल.

प्रश्न: नेमका कोणता व्यायाम करणे योग्य ठरेल?

उत्तर: मी ट्रेडमिल वापरणे पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतो. कारण साध्या किंवा सामान्य ट्रेडमिलमध्ये वापरलेले बुशिंग आणि बेअरिंग चांगल्या दर्जाचे नसतात. तसेच त्याचे कुशनिंग पॅडही उत्तम दर्जाचे नसतात.

शिवाय तुम्ही मशीनने ठरवलेल्या स्पीडवर धावत असता, जी तुमच्या शरीराच्या नैसर्गिक गतीशी जुळेलच असे नाही. यामुळे थेट गुडघ्यांवर ताण येऊन त्यांना इजा होण्याचा धोका असतो. ट्रेडमिलवर धावण्यापेक्षा साधे चालणे किंवा फिरणे केव्हाही जास्त फायदेशीर आहे.

चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. शक्य असेल तर कच्च्या मातीवर चाला. उद्यानांमध्ये असणारे रबर ट्रॅकसुद्धा फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

चालताना चांगल्या क्वालिटीचे वॉकिंग शूज वापरणे खूप गरजेचे आहे. शूज खूप जुने झाले की त्यांचे कुशनिंग आणि तळातले रबर झिजून जाते. त्यामुळे बुटांच्या दर्जाकडे आणि स्थितीकडे नीट लक्ष द्या.

जर तुम्ही आधीपासून नियमित जॉगिंग करत असाल आणि शरीराला सवय असेल तर ते खुशाल सुरू ठेवा. पण जर वयाच्या 40-45 व्या वर्षी नव्याने व्यायाम सुरू करत असाल, तर एकदम धावण्यापेक्षा सुरुवातीला रोज चालण्याने सावकाश सुरुवात करणे केव्हाही चांगले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: हाडांच्या तक्रारींवर योग्य उपचार पद्धती कोणती?

उत्तर: वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेणे केव्हाही उत्तम ठरते. गरजेनुसार आणि वयाच्या टप्प्यानुसार रक्ताच्या चाचण्या, हृदयाचे चेकअप आणि महिलांसाठी पॅप स्मिअर आणि मॅमोग्राफीसारख्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.

आजच्या काळात उपचारांपेक्षा प्रतिबंध म्हणजेच वेळीच काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. सुरुवातीच्या दिवसांतच आजाराचे निदान झाले तर आजार बळावण्याआधीच त्यावर सहज उपाय करता येतात.

साधे दुखणे किंवा लहानसहान त्रास औषधे, थेरपी किंवा प्राथमिक उपचारांनी बरे झाले पाहिजेत. मात्र 4 ते 6 आठवडे उलटूनही दुखणे थांबले नाही किंवा काही गंभीर लक्षणे जाणवू लागली तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

हाडांचा त्रास असेल तर सगळ्यात आधी योग्य निदान होणे गरजेचे असते. जेणेकरून हाडात नक्की काय बिघाड झाला आहे हे स्पष्ट होईल. यासाठी सर्वप्रथम एक्स-रे काढला जातो. वयानुसार हाडे ठिसूळ झाली आहेत का हे तपासण्यासाठी ‘डेक्सा स्कॅन’ करून हाडांची ताकद मोजली जाते.

ऑस्टिओपोरोसिस किती गंभीर आहे, यावरच पुढचे उपचार ठरवले जातात.

रक्ताच्या तपासणीद्वारे कॅल्शियम आणि इतर घटकांची पातळी तपासता येते. यानंतर साधे कॅल्शियम आणि सप्लिमेंट्स पुरेसे ठरतील की हाडे बळकट करण्यासाठी इतर औषधे द्यावी लागतील, याचा डॉक्टर निर्णय घेतात.

जर हाडात खूप असह्य वेदना असतील किंवा फ्रॅक्चर झालेले असेल तर त्या हाडाला सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रेस किंवा इतर योग्य उपचारांची मदत घेतली जाते.

आजकाल मणक्यांच्या विशिष्ट प्रकारच्या फ्रॅक्चरसाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता आधुनिक उपचार केले जाऊ शकतात. हे उपचार अगदी लहान कट देऊन किंवा सुईच्या आधारे करता येतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया आता ‘डे-केअर’ तत्त्वावर होतात, ज्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहावे लागत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC