Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Mustan Mirza/BBC
( या बातमीतील तपशील विचलित करू शकतात.)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या गोविंदपूर या गावाला जेव्हा बीबीसी मराठीने 1 जून रोजी भेट दिली तेव्हा गावात अगदी शुकशुकाट होता.
काही पत्र्याची, काही कच्च्या मातीची घरं दिसत होती पण अनेक घरांना कुलूप होतं. अगदी कर्फ्यू असावा तसं हे वातावरण होतं.
29 मे रोजी झालेल्या घटनेने हे गावच नाही तर संपूर्ण परिसरच हादरला होता. ती घटना म्हणजे जमिनीचा वाद विकोपाला जाणे आणि त्यातून 6 जणांची हत्या.
या हत्येनंतर अटकसत्र सुरू झालं. पण ही घटना का घडली आणि त्यानंतर गावातील वातावरण कसे आहे, आरोपी कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावाला भेट दिली.
भीमा नदीकाठी वसलेल्या या गावातील अनेक कुटुंबांनी तात्पुरतं गाव सोडलं असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे.
गोविंदपूर 300-350 उंबऱ्यांचं गाव. स्थानिक शिक्षकांच्या मते या गावची लोकसंख्या अंदाजे 1500 असावी.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या गावाचं मुख्य पीक गहू आणि ऊस असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
फोटो स्रोत, Mustan Mirza/BBC
बीबीसी मराठीची टीम ज्यावेळी गावात पोहोचली तेव्हा त्या ठिकाणी बहुतेक घरांना कुलपं दिसत होती. त्याबाबत पोलिसांनी सांगितलं की, गावातील पुरुष मंडळी गाव सोडून निघून गेली आहे. गावात रात्रीच्या वेळी महिला असतात, असं पोलिसांनी सांगितलं.
बीबीसी मराठी ज्यावेळी गावात पोहचली त्यावेळी पोलिसांच्या व्हॅन त्याठिकाणी होत्या. घटनेनंतर पोलीस तिथेच ड्युटीवर तैनात होते. गावात अंदाजे 30 ते 40 पोलीस बंदोबस्तासाठी होते. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी 10-12 पोलीस तैनात होते.
घटनास्थळावर कुणाचाही प्रवेश होऊ नये म्हणून पोलिसांच्या टीमने मार्किंग केली होती. तसेच संबंधित एरिया सील करण्यात आला होता.
त्याबरोबरच गावात इतर ठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त होता.
फोटो स्रोत, Mustan Mirza/BBC
बीबीसी मराठीने या घटनेतील आरोपी असलेल्या कल्लणगौडा पाटील यांच्या घरालाही भेट दिली, पण ते घर देखील बंद आहे.
कल्लणगौडा यांचे घर शेतातच आहे. या घराचं बांधकाम एखाद्या वाड्यासारखं दिसलं. आजूबाजूला ऊस, गव्हाची शेती दिसत होती. त्यांच्या घरासमोरच ट्रॅक्टर देखील होते.
त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या जागेत जनावरांचा गोठा होता. त्यात अंदाजे 30-40 जनावरं होती.
पण गेल्या 2-3 दिवसांत कुणीही त्याकडे फिरकले नसल्यामुळे ती जनावरं तहानेने व्याकुळ होऊन हंबरत आहेत, असे त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी सांगितले.
29 मे रोजी नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मे रोजी गोविंदपूर येथे झालेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर जखमी झाले.
13 जून रोजी बीबीसी मराठीने चडचण पोलिसांकडून या प्रकरणासंबंधी अपडेट घेतली. त्यानुसार आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणखी 20 संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणात चैतन्यकुमार दुंडप्पा निराळे यांनी चडचण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हल्ल्यात चैतन्य यांचे वडील, काका, भाऊ आणि चुलत भावाचा मृत्यू झाला आहे.
तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी गोविंदपूर परिसरातील सुमारे 25 एकर जमीन कायदेशीररित्या खरेदी केली होती. मात्र, जमीन खरेदीनंतर काही व्यक्तींनी त्या जमिनीवर हक्क सांगण्यास सुरुवात केली.
शेतातील कामांना विरोध, धमक्या आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये आक्षेप नोंदवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 29 मे रोजी सकाळी जमिनीवरील साफसफाईचे काम सुरू असताना काही जण मोटरसायकलहून घटनास्थळी आले आणि काम थांबवण्याची मागणी केली.
त्यानंतर दुपारी ते पुन्हा मोठ्या संख्येने परतले. त्यांच्याकडे तलवारी, कोयते, चाकू, काठ्या आणि इतर धारदार शस्त्रे होती. काही लोकांच्या डोळ्यांत तिखटपूड फेकून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात दुंडप्पा रेवणसिद्ध निराळे, शिवपुत्र रेवणसिद्ध निराळे, चंद्रकांत उर्फ चंदू रेवणसिद्ध निराळे, रेवणसिद्ध उर्फ राहुल दुंडप्पा निराळे, समर्थ शिवपुत्र निराळे आणि शब्बीर बाबुसाब अत्तार यांचा मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी झाले.
बीबीसी मराठीने 1 जून रोजी निराळे यांच्या चडचण येथील घराला भेट दिली. गोविंदपूर या ठिकाणाहून चडचण हे तालुक्याचे मुख्य ठिकाण 22 किमी अंतरावर आहे.
निराळे कुटुंबीयांचा पारंपरिक व्यवसाय आणि शेती असल्याचे स्थानिकांकडून समजले. त्यांच्या कुटुंबातील चैतन्यकुमार निराळे यांची बीबीसी मराठीने भेट घेतली.
तेव्हा या विषयावर अधिक बोलण्याची तयारी नसल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीत नोंदवलेले वक्तव्य वापरावे असे ते यावेळी म्हणाले.
कल्लणगौडा पाटील आणि त्यांच्यासह असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या वकिलांची बाजू घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर बातमी अपडेट केली जाईल. पाटील यांच्या घरी जाऊन देखील त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तिथे घराला कुलूप होते.
2015 मधील प्रेमविवाहापासून सुरू झालेला वाद
पोलिसांच्या मते, या प्रकरणाची पार्श्वभूमी जवळपास दशकभरापूर्वीच्या एका खून प्रकरणाशी जोडलेली दिसते.
संबंधित जमीन मूळतः तेली कुटुंबाच्या मालकीची होती. हे कुटुंब निवरगी गावात राहत होतं. या कुटुंबातील मुलीचा विवाह 2015 साली कल्लणगौडा पाटील यांच्या कुटुंबातील शिवानंद नावाच्या मुलाशी झाला होता. या विवाहाला कल्लणगौडा आणि तेली या दोन्ही कुटुंबीयांची सहमती नव्हती.
विवाहानंतर शिवानंदची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींची काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तेली कुटुंबातील मुलगी परत माहेरी न जाता कल्लणगौडा पाटील यांच्याच कुटुंबात राहते. त्यामुळे या जमिनीवर पाटील कुटुंबीय आपला दावा करतात, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवानंद यांच्या हत्येनंतर तेली आणि पाटील यांच्या कुटुंबातील वाद विकोपाला गेला. ही जमीन कसू नये किंवा विकू नये असा अलिखित नियमच पाटील कुटुंबाने लादल्यामुळे ही जमीन अनेक वर्षं पडून राहिल्याचे पोलीस सांगतात.
स्थानिक पातळीवर वाद असल्यामुळे ही जमीन खरेदी करण्यासही अनेकजण तयार नव्हते.
‘जमिनीला चांगला भाव होता’
संबंधित जमीन मोक्याच्या ठिकाणी होती तसेच पाण्याच्या उपलब्धतेमुळे जमिनीला भाव होता, असे एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
पाटील कुटुंबीयांची नाराजी ओढावून घेऊन ही जमीन विकत घेण्याची गावातील कुणाची तयारी नव्हती. भीमा काठची पाण्याखालची जमीन असून देखील कसता येत नाही म्हणून तेली कुटुंबीयांना ती विकायची होती.
त्यासाठी तेली कुटुंबीयांनी गावाबाहेरच्या ग्राहकाला पसंती दिली. निराळे कुटुंबीय हे गोविंदपूरमध्ये राहत नव्हते, तर चडचण या ठिकाणी राहत. त्यामुळे ही जमीन घेण्याची त्यांनी तयारी दर्शवली, असे या पोलिसांना आपल्या प्राथमिक तपासात आढळले आहे.
घटनेनंतर निराळे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते की, ही जमीन वादातील असल्यामुळे निराळे कुटुंबीयांनी कल्लणगौडा यांची जमीन खरेदीसाठी परवानगी घेतली होती. जमीन खरेदी करण्यास काही हरकत नाही, असे त्यांनी म्हटले होते, पण नंतर त्यांनी हरकत घेतली.
विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी पहिल्यांदा कल्लणगौडा पाटील आणि त्यांचे साथीदार मोटरसायकलहून शेतात आले. या जमिनीवर सुरू असलेले काम थांबवावे असे त्यांनी सांगितले, त्यांना धमकवण्यात आले.
थोड्या वेळाने ते पुन्हा आले आणि त्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर जखमी झाले.
निराळे कुटुंबीयांसोबत शब्बीर अत्तार नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अत्तार यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, ते निराळे कुटुंब आणि इतर संबंधितांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र त्यांचाही या घटनेत मृत्यू झाला.
तपासात काय समोर आलं?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका आरोपीने परवानाधारक बंदुकीचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृतांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून हत्येचा नेमका कट कसा रचला गेला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप 20 संशयित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







