Source :- BBC INDIA NEWS

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
राज्यभरात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जात असतानाच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील जुनी सांगवी येथे दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान पडली आणि त्यात दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
एका मंडळाने उभारलेली लोखंडी कमान काढताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
सलमा सलाउद्दीन पठाण (वय 45) असं मृत महिलेचं नाव आहे. विघ्नहर्ता मंडळाने दहीहंडीचे आयोजन केले होते. सलमा पठाण या दहीहंडी पाहण्यासाठी तिथे गेल्या होत्या.
शुक्रवारी (4 सप्टेंबर) रात्री दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर लोखंडी कमान काढताना अचानक ही घटना घडली.
मृत सलमा यांचा मुलगा मंडळाचा कार्यकर्ता असल्याने मंडळाविरोधात तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती देण्यात आली.
अपघात कसा घडला?
पिंपरी-चिंचवड जवळील जुनी सांगवी येथे विघ्नहर्ता मंडळाने दहीहंडीचे आयोजन केले होते. दहीहंडी उत्सव साजरा झाल्यानंतर रात्री यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमानीचा सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं.
सलमा पठाण या दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी गेल्या होत्या. सांगाडा काढताना त्या खाली उभ्या होत्या. त्याचवेळी अचानक कमानीचा लोखंडी भाग त्यांच्या अंगावर पडला.
सलमा पठाण यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मृत सलमा यांचा मुलगा रहिम पठाण हा या मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “जुन्या सांगवीतील गल्ली क्रमांक 2 येथे विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ आहे. त्यांची दहीहंडी साधारण रात्री 10 च्या सुमारास फुटली. त्यानंतर लगेचच स्टेजचा मंडप उतरवण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या सलमा पठाण आणि त्यांचे पती सलाउद्दीन पठाण हे दोघेही तिथे उभे होते.”
“दहीहंडी फुटली आता आपण जाऊ, असं सलाउद्दीन पठाण यांनी पत्नी सलमा यांना सांगितलं आणि ते तिथून निघाले. त्याचवेळी मंडप आणि उत्सवासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान उतरवण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी कमान सलमा यांच्या अंगावर पडली आणि त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.”
कुटुंबीयांचा मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार
मृत सलमा यांचा मुलगा मंडळात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनीही स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती कुटुंबाने केल्याचे सांगण्यात आलं.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी आपल्याशी भेटून चर्चा केली असून त्यांनी मंडळाविरोधात कारवाई न करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली.
मंडळाची मुलं आमचीच आहेत. माझा मुलगाही त्या मंडळाचा कार्यकर्ता आहे. या मुलांना त्रास होऊ नये, त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार करायची नसल्याचं मृत सलमा यांचे पती सलाउद्दीन यांनी सांगितल्याचे कोळी यांनी नमूद केलं.

याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं. अधिक तपास करून त्यामध्ये आणखी काही निष्पन्न झालं तर पुढील कारवाई करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी साऊंड पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असल्याचा प्रश्न विचारला. त्यावर कोळी यांनी साऊंड पडलेला नसून लोखंडी भाग पडल्याचं म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




