Source :- BBC INDIA NEWS

मधमाशी

फोटो स्रोत, Getty Images

जेव्हा मधमाशांचं पोळं दिसतं, त्यावेळी सर्वात आधी त्याच्या आवाजाकडे लक्ष वेधलं जातं. हजारो मधमाशांच्या पंखांच्या हालचालीमुळे हवेत सतत एक हलका आवाज घुमत असतो.

मधपोळ्यामध्ये हजारो कामकरी मधमाशा लहान अळ्यांना खाऊ घालणं, पोळं स्वच्छ ठेवणं आणि मध साठवणं अशी कामं करत असतात.

पण मधमाशांच्या एका पोळ्यात फक्त एकच राणी मधमाशी असते. ती इतर मधमाशांपेक्षा आकाराने मोठी असते. तिच्या शरीराच्या मानाने तिचे पंख मात्र लहान असतात. राणीचं पोट लांब आणि टोकदार असल्यामुळे ती इतर मधमाशांपेक्षा वेगळी दिसते.

मधमाशांच्या पोळ्यात केवळ राणी मधमाशीच अंडी घालण्याचं काम करते. तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार, एक राणी मधमाशी दिवसाला सुमारे 2 हजार अंडी घालू शकते.

सामान्य मधमाशी राणी कशी बनते?

राणी मधमाशी जन्मतःच खास असते म्हणजे. म्हणजेच ती जन्मापासूनच राणी असते, अशी सामान्यपणे अनेकांची समजूत असते.

परंतु, प्रत्यक्षात राणी मधमाशीचं आयुष्यही इतर मधमाशांसारखंच अळीपासून सुरू होतं. सुरुवातीला सर्व अळ्या सारख्याच असतात. त्यापैकी कोण राणी होणार, हे आधीच ठरलेलं नसतं.

मधपोळ्यातील कोणतीही मधमाशी स्वतःहून राणी बनत नाही किंवा तिची निवडही तशी केली जात नाही. ही प्रक्रिया आपोआप शांतपणे सुरू होते आणि त्यानंतर मधपोळ्यामध्ये बदल दिसू लागतात.

मधमाशीचा अळीचा कालावधी

फोटो स्रोत, Getty Images

मधपोळ्यामध्ये नवीन राणी साधारण तीन परिस्थितींमध्ये तयार होते. जुनी राणी अशक्त झाली, मरण पावली किंवा नवीन पोळं तयार करण्यासाठी वेगळी होते, तेव्हा नवीन राणीची आवश्यकता भासते.

राणी मधमाशीने सोडलेले रासायनिक संकेत (फेरोमोन्स) कमी होऊ लागले की, कामकरी मधमाशांना बदल जाणवतो. हे रासायनिक संकेत राणी जिवंत आहे आणि अंडी घालू शकते, हे दाखवत असतात. त्यानंतर मधमाशा पोळ्यासाठी नवीन राणी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतात.

नुकत्याच जन्मलेल्या काही छोट्या अळ्यांना वेगळं केलं जातं. या अळ्या इतर अळ्यांसारख्याच असतात. परंतु, कामकरी मधमाशा त्यांना खास आहार देतात, त्यामुळे त्या वेगळ्या म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण बनतात.

बहुतेक अळ्यांना परागकण आणि मध खायला दिलं जातं. पण काही निवडक अळ्यांना सतत ‘रॉयल जेली’ नावाचा विशेष आहार किंवा डोस दिला जातो. या पौष्टिक अन्नामुळे त्यांच्या वाढीत मोठा बदल होतो आणि त्यातून राणी मधमाशी तयार होते.

राणी मधमाशीला कोण जन्म देऊ शकतं?

राणी मधमाशी तयार होण्यामागे ‘रॉयल जेली’ नावाचा एक खास आहार खूप महत्त्वाचा असतो. हा दाट, दुधासारखा पदार्थ तरुण कामकरी मधमाशा तयार करतात.

हा जेलीसारखा द्रव तरुण कामकरी मधमाशांच्या डोक्यावरील खास ग्रंथींमधून तयार होतो.

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्सेस’ आणि ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासांमध्ये सर्वात लहान म्हणजेच अळी (लार्व्हा) अवस्थेतील मधमाशांच्या वाढीवर रॉयल जेलीचा कसा परिणाम होतो, हे सांगण्यात आलं आहे.

मधमाशी

फोटो स्रोत, Getty Images

सुरुवातीच्या दिवसांत मधपोळ्यातील सर्व अळ्यांना ही पौष्टिक जेली खायला दिली जाते. पण त्या जसजशा मोठ्या होत जातात, बहुतेक अळ्यांना परागकण आणि मधाचा साधा आहार दिला जातो.

परंतु, काही निवडक अळ्यांना मात्र सतत रॉयल जेलीच खायला दिली जाते. आणि हाच खास आहार पुढे राणी मधमाशी तयार होण्याचं कारण ठरतो.

याच आहारामुळे एखादी अळी इतर कामकरी मधमाशांसारखी न वाढता मोठी, जास्त काळ जगणारी आणि अंडी घालू शकणारी राणी मधमाशी म्हणून विकसित होते. रॉयल जेलीचा हा आहार मधपोळ्याचं भविष्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

अभ्यासातून असं दिसून येतं की, इतर कृमी (वर्म्स) आणि काही निवडक कृमींच्या आहारातील या पौष्टिक फरकांमुळे जनुकांच्या अभिव्यक्ती आणि शारीरिक विकासामध्ये लक्षणीय बदल होतात.

ही विशेष पौष्टिक रॉयल जेली राणी मधमाशीला पूर्ण विकसित अंडाशय, मोठं शरीर आणि जास्त आयुष्य असे महत्त्वाचे गुणधर्म देते.

राणी मधमाशीच्या प्रजननाचा प्रवास

अळी अवस्थेतून राणी मधमाशी बनल्यानंतर काही दिवसांतच ती प्रजननासाठी मधाचं पोळं सोडून जाते.

याला ‘विवाह उड्डाण’ (मिलन उड्डाण) असं म्हटलं जातं. यात राणी मधमाशी पोळं सोडते आणि हवेत इतर पोळ्यातील नर मधमाशांसोबत प्रजनन करते.

तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार, राणी मधमाशी ही प्रजननाची सफर किंवा प्रवास आयुष्यात फक्त एकदाच करते. साधारणपणे 3 वर्षे जगणारी ही राणी पुन्हा असा प्रवास करत नाही.

मधमाशी

फोटो स्रोत, Getty Images

या प्रजननाच्या प्रवासात राणी अनेक नर मधमाशांसोबत समागम (मिलन) करते. त्यानंतर ती आयुष्यभर अंडी घालण्यासाठी तिच्या शरीरात शुक्राणू साठवून ठेवते.

त्यानंतर राणी मधमाशी जमा केलेले शुक्राणू तिच्या शरीरातील ‘स्पर्मॅटिका’ नावाच्या खास अवयवामध्ये साठवून ठेवते. हा अवयव अनेक वर्षे हे शुक्राणू सुरक्षित ठेवू शकतो.

राणी मधमाशीच्या आयुष्यात फक्त एकदाच होणाऱ्या या मिलनामुळे तिला आयुष्यभर अंडी तयार करण्यासाठी लागणारे शुक्राणू व ऊर्जा मिळते आणि ती ते साठवून ठेऊ शकते.

कॉर्नेल विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ थॉमस सीली यांनी केलेल्या मधमाशांच्या वर्तनाच्या अभ्यासानुसार, मधमाशांचं पोळं एका मधमाशीच्या आदेशावर चालत नाही. सगळ्या मधमाशा मिळून ही व्यवस्था सांभाळतात.

राणी मधमाशीचे रासायनिक संकेत (फेरोमोन्स सिग्नल) पोळं स्थिर ठेवण्यास, प्रजनन सुरू ठेवण्यास आणि सर्व काम सुरळीत चालण्यास मदत करतात.

म्हणजे राणी मधमाशी स्वतः संपूर्ण पोळं चालवत नसली, तरी तिची उपस्थिती महत्त्वाची असते. अभ्यासांनुसार, राणी नसली तर मधमाशांची व्यवस्था किंवा सामाजिक रचना हळूहळू विस्कळीत होऊ लागते.

मधमाशांच्या पोळ्यात राणी मधमाशीचं महत्त्व काय?

राणीचं महत्त्व समजून घेण्यासाठी संपूर्ण मधाचं पोळं कसं काम करतं, हे पाहणं गरजेचं आहे.

संशोधकांचं म्हणणं आहे की, मधमाशांचं पोळं एखाद्या मोठ्या जीवासारखं काम करतं. यात हजारो मधमाशा एकत्र येऊन सर्व कामं सांभाळतात.

थॉमस सीली यांच्या मधमाशांच्या वर्तनाच्या अभ्यासानुसार, कामकरी मधमाशा एकत्र पंख हलवून पोळ्यातील तापमान नियंत्रित ठेवतात. तसेच अन्न कुठून आणि कधी आणायचं, हेही त्या एकत्रित ठरवतात.

मधमाशी

फोटो स्रोत, Getty Images

सीली यांच्या मते, कामकरी मधमाशा अळ्यांची काळजी घेणं आणि मधपोळ्याचं मेणाचं बांधकाम म्हणजेच रचना करणं, अशी कामं देखील करतात.

मधाचं पोळं (हनीकॉम्ब्स) हे तरुण कामकरी मधमाशांनी तयार केलेल्या मेणापासून बनलेलं असतं. त्यात षटकोनी आकाराचे छोटे कप्पे असतात. या कप्प्यांमध्ये मध आणि परागकण साठवले जातात, तसेच लहान पिल्लांची वाढही (संगोपन) तिथेच होते.

इतक्या सुव्यवस्थितपणे चालणाऱ्या या समूहात राणी मधमाशीची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण असते. ‘जर्नल ऑफ बेसिक अँड अप्लाइड झूलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, राणी मधमाशी पोळ्याच्या (वसाहत) प्रजननाचं मुख्य केंद्र असते आणि ती हजारो अंडी घालते.

राणी मधमाशीचं काम फक्त अंडी घालण्यापुरतं म्हणजे प्रजननापुरतं मर्यादित नसतं. ‘फ्रंटियर्स इन झूलॉजी’ आणि ‘करंट बायोलॉजी’ यांसारख्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासांनुसार, ती खास रासायनिक संकेत (फेरोमोन) तयार करते.

हे संकेत मधपोळ्यामध्ये शिस्त आणि एकजूट टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कामकरी मधमाशा एकमेकांशी समन्वय साधून काम करू शकतात.

अभ्यासांनुसार, राणी मधमाशी निरोगी असेल आणि हे रासायनिक संकेत सतत देत असेल, तर मधमाशांचं पोळं व्यवस्थित आणि एकजुटीने, संघटितपणे चालत राहतं.

राणी मधमाशी अशक्त झाली तर मधमाशा काय करतात?

राणी म्हातारी झाली म्हणजे वृद्धत्व आल्यास, आजारपण किंवा मृत्यू पावली तर हे रासायनिक संकेत कमी होतात. त्याचा परिणाम कामकरी मधमाशांना लगेच जाणवू लागतो.

अभ्यासांनुसार, फेरोमोन कम्युनिकेशन नेटवर्क्सवरील पीएमसी बायोलॉजी जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या अभ्यासासह अनेक अभ्यास असं सांगतात की, हे रासायनिक संकेत कमी झाले की कामकरी मधमाशांमधील समन्वय बिघडू लागतो. त्यानंतर त्या नवीन राणी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतात.

राणीचे फेरोमोन सिग्नल कमी झाले की, कामकरी मधमाशांना समजतं की राणी मरत आहे किंवा अशक्त होत आहे. त्यानंतर त्या तातडीने नवीन राणी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतात.

मधमाशी

फोटो स्रोत, Getty Images

इलिनॉय विद्यापीठातील प्राध्यापक आणि कीटकतज्ज्ञ जीन रॉबिन्सन तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कीटकतज्ज्ञ जेम्स यांनी ही प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली आहे.

कामकरी मधमाशा काही छोट्या अळ्यांची निवड करतात आणि त्यांना फक्त रॉयल जेली खायला देतात. काही दिवसांतच या अळ्या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढू लागतात आणि पुढे राणी मधमाशी विकसित होऊ लागतात.

मधमाशांच्या पोळ्याच्या देखरेखीवर आणि त्यांच्या वर्तनाच्या अभ्यासावरून नुकत्याच झालेल्या संशोधनात राणी मधमाशीची उपस्थिती किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट झालं आहे.

जर्मनीतील वुर्झबर्ग विद्यापीठातील वर्तनशास्त्रज्ञ जुर्गन टॉट्झ यांच्या मते, राणी नसलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमध्ये एकजूट किंवा एकसंधता लवकर कमी होते. कामकरी मधमाशांचे वर्तन बिघडते, त्यांची उत्पादनक्षमता कमी होते आणि काही वेळा संपूर्ण पोळं हळूहळू नष्ट होऊ शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC