Home LATEST NEWS ताजी बातमी फ्रान्समध्ये 5 लाख 50 हजार लोक रस्त्यावर, आंदोलनात काही गटांकडून जाळपोळ, लुटमार...

फ्रान्समध्ये 5 लाख 50 हजार लोक रस्त्यावर, आंदोलनात काही गटांकडून जाळपोळ, लुटमार आणि तोडफोड, 1200 जणांना अटक

5
0

Source :- BBC INDIA NEWS

पॅरिसमधील ‘ला बॅरिक’ बारला आग लावण्यात आली.

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

फ्रान्समध्ये शाळांमधील समस्यांबरोबरच वाढती महागाई आणि राहणीमानाच्या खर्चाविरोधात शनिवारी 17 ऑक्टोबररोजी झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले.

देशभरात झालेल्या या आंदोलनांदरम्यान जाळपोळ, लुटमार आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनांदरम्यान अंदाजे 5 लाख 50 हजार लोक रस्त्यावर उतरले होते आणि सुमारे 1200 जणांना अटक करण्यात आली.

पॅरिसमध्ये संध्याकाळपर्यंत आंदोलक आणि पोलिसांच्या दंगलविरोधी पथकामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष दिसून आला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला.

राजधानी पॅरिससह देशातील इतर भागांमध्येही इमारतींना आग लावण्यात आली. अनेक शहरांमध्ये दुकाने लुटण्यात आली. महापालिका कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. लिमोज शहरातील टाऊन हॉलला लागलेल्या आगीत छताचा काही भाग कोसळला.

या हिंसाचारात 150 पोलीस अधिकारी जखमी झाले असल्याची माहिती फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकॉर्नू यांनी दिली.

पॅरिसमध्ये पोलीस-आंदोलकांमध्ये संघर्ष

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दुपारच्या सुमारास मुख्य मोर्चा शांततेत सुरू असल्याचे दिसत होते. यावेळी काही तरुणांनी बीबीसीशी बोलताना आपण शांततावादी असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही फक्त परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहोत; पण काहीच बदल होताना दिसत नाहीये.”

दरम्यान, दिवस पुढे सरकत असताना काही गटांनी रस्त्यांवर आगी लावल्या आणि वाहनांची जाळपोळ केली. शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध ‘प्लास द ला रिपब्लिक’ परिसरातही अशा घटना घडल्या.

शनिवारी झालेल्या आंदोलनांदरम्यान पॅरिस आणि इतर शहरांमध्ये दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान लुटण्यात आले.

दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान लुटण्यात आले. एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत ते पूर्णपणे जळून खाक झाले. काही गटांमध्ये हाणामारी सुरू झाल्याचेही बीबीसीच्या प्रतिनिधींनी पाहिले.

पॅरिसच्या मध्यवर्ती भागात दंगलविरोधी पथक जमावाच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे आणि अनेक लोकांना काठ्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले.

ऐतिहासिक इमारतीत जाळपोळ

लियॉन शहरातील पर्यटन कार्यालयाला आग लावण्यात आल्याच्या घटनेवर महापौर ग्रेगरी डुसे यांनी दुःख व्यक्त केले.

बीएफएमटीव्हीशी बोलताना ते म्हणाले, “ही एक शोकांतिका आहे. ही अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक इमारत असल्याने तिचे नुकसान झाल्यामुळे आमचे मन दु:खी आहे.”

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ‘हिंसक प्रवृत्तीच्या लोकांनी’ अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यापासून रोखले.

शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध 'प्लास द ला रिपब्लिक' परिसरात जाळपोळीच्या घटना घडल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी लिमोज टाऊन हॉलमधील आगीवरही नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

आग्नेय फ्रान्समधील सेंट-एटिएन शहरात एका छोट्या स्फोटकामुळे एका तरुणाचा हात निकामी झाल्याचे शहराचे महापौर रेजिस हुआनिको यांनी सोशल मीडियावरून सांगितलं. “अशी दुर्घटना कधीही घडायला नको होती,” असं ते म्हणाले.

शाळांमधील समस्यांमुळे आंदोलनाला सुरुवात

फ्रान्समधील माध्यमिक शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मोडकळीस आलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर गेल्या काही आठवड्यांपासून लाखो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. फ्रान्समध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात.

या आंदोलनाला कामगार संघटनांचे सदस्य आणि इतर आंदोलक गटांचाही पाठिंबा मिळाला आहे.

या गटांमध्ये तथाकथित ‘यलो व्हेस्ट’ (पिवळे जॅकेट) आंदोलनाचाही समावेश आहे. 2018 पासून वाढत्या महागाई आणि राहणीमानाच्या खर्चाविरोधात या आंदोलनाने जोर धरला होता. फ्रान्सच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेल्या आंदोलनांपैकी हे एक आंदोलन ठरलं.

पॅरिसमध्ये अशाप्रकारे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.

फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी काही ठिकाणी तोंड झाकलेल्या व्यक्तींनी लक्ष्य करून हिंसक कृत्ये केली. पॅरिसच्या काही भागांसह मार्सेल, रेनेस, तुलूज आणि आंजे या शहरांमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या.

ग्रेनोबल, अव्हिन्या, पो, मॉ-पेलिए आणि व्हॅलन्ससह अनेक ठिकाणई इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

पॅरिसमध्ये कपड्यांची आणि खाद्यपदार्थांची दुकाने लुटण्यात आली. लिल शहरातील अ‍ॅपल स्टोअरमध्ये घुसून तेथील सामान लुटण्यात आल्याचे वृत्त आहे.

बीबीसी व्हेरिफायने पडताळणी केलेल्या एका व्हीडिओमध्ये ग्रेनोबल शहराच्या मध्यवर्ती भागात एका अरुंद रस्त्यावर काही मुखवटा घातलेले पुरुष पर्यटकांसाठी असलेली छोटी रेल्वे चालवत असल्याचे दिसते. ही रेल्वे किमान 3 दंगल नियंत्रण पोलिसांच्या दिशेने जाताना दिसली.

फ्रान्समध्ये राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र

फ्रान्समध्ये यापूर्वीही आंदोलने आणि हिंसक घटनांचा अनुभव आला आहे. मात्र, यावेळी देशात राजकीय अनिश्चितता वाढत असताना ही आंदोलने सुरू आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढील वर्षी पदावरून पायउतार होणार आहेत. सर्वेक्षणांनुसार, एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन आणि डाव्या विचारसरणीच्या ला फ्रान्स इन्सुमिस पक्षाचे नेते जाँ-ल्युक मेलाँशॉं यांच्यात प्रमुख राजकीय संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मेलाँशॉं यांनी फ्रान्समधील निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर आंदोलकांविरुद्ध ‘अत्यंत आक्रमकपणे कारवाई’ केल्याचा आरोप केला. मात्र, त्यांनी लुटमार आणि जाळपोळीच्या घटनांचाही निषेध केला.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढील वर्षी पदावरून पायउतार होणार आहेत.

पंतप्रधान लेकॉर्नू यांनी मेलाँशॉं यांच्या वक्तव्याला “धोकादायक आणि निंदनीय” म्हटले.

यापूर्वी लेकॉर्नू यांनी पोलिसांना “अत्यंत तीव्र हिंसाचाराचा” सामना करावा लागल्याचे सांगितले होते.

काही गट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीचा ‘सराव’ म्हणून या आंदोलनांचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“हिंसेच्या मार्गाने कोणीही आपला राजकीय अजेंडा लादू शकणार नाही,” असंही लेकॉर्नू म्हणाले.

आंदोलकांनी मांडलेल्या “कायदेशीर मागण्या कट्टर डाव्या गटांनी ओलीस ठेवल्याचा,” आरोप मरीन ले पेन यांनी केला. तसेच, मेलाँशॉं हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, “ज्यांनी तोडफोड केली, प्रीफेक्चर कार्यालयांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर हल्ले केले, तसेच टाऊन हॉलची लूट केली, त्यांच्यावर खटले चालवून त्यांना शिक्षा केली जाईल.”

सरकारकडून उपाययोजनांचे आश्वासन; तरीही आंदोलन सुरूच

आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी फ्रान्स सरकारने काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. 8 ऑक्टोबरला दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत शिक्षणमंत्री एडुआर गेफ्रे यांनी अतिरिक्त 3 हजार तात्पुरते शिक्षक नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, सरकारच्या या आश्वासनानंतरही आंदोलन सुरूच असून आंदोलनाची तीव्रता मात्र वाढत असल्याचे चित्र आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC