Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हं आहेत. पुढील काही दिवस राज्याच्या पश्चिम भागातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मात्र, कोकण-गोवा परिसरात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या 6 सप्टेंबरच्या दैनिक हवामान अहवालानुसार, कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
कोकणात पाऊस कायम
6 सप्टेंबरला कोकण आणि गोवा भागात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
7 सप्टेंबरलाही कोकण-गोवा भागात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यानंतरच्या काही दिवसांत उत्तर कोकणात अनेक किंवा बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
फोटो स्रोत, Getty Images
8 आणि 9 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज आहे.
10 सप्टेंबर दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस; उत्तर कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यत आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज आहे.
11 सप्टेंबरला उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस.
12 सप्टेंबर रोजीदक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ
पुढील 24 तासांत महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मात्र पुढील 5 दिवसांत किमान तापमानात मोठा बदल अपेक्षित नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
मुंबईत ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 48 तास आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची आणि अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शहरात कमाल तापमान सुमारे 31 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, 5 सप्टेंबरच्या निरीक्षणानुसार कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला असून अलिबागमध्ये ताशी 50 किमी वेगाने, तर मुंबईतील कुलाब्यात ताशी 37 किमी वेगाने वारे नोंदवण्यात आले.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार वाऱ्याची नोंद झाली.
मुंबईसह कोकणात कमी पावसाची शक्यता असली तरी राज्याच्या पश्चिम भागात पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




