Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ते 150 वर्षे जगापासून दूर एका बेटावर राहत होते; दुकाने, पैसा, टीव्ही...

‘ते 150 वर्षे जगापासून दूर एका बेटावर राहत होते; दुकाने, पैसा, टीव्ही किंवा चित्रपट काय असते हेही माहीत नव्हते’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

ट्रिस्टन दा कुन्हा

दक्षिण अटलांटिक महासागरातील ‘ट्रिस्टन दा कुन्हा’ या छोट्या बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे विस्थापित झालेल्या बेटावरील 264 लोकांना ब्रिटनमध्ये हलवण्यात आलं. तिथे आधुनिक जीवनाचा पहिल्यांदाच अनुभव घेतल्यानंतर या लोकांनी आपले अनुभव बीबीसीला सांगितले.

“वर्षभरापूर्वीपर्यंत या लोकांनी रस्त्यावरची वाहतूक, रस्ता किंवा छोट्या घरापेक्षा (कॉटेज) उंच इमारतही कधी पाहिली नव्हती,” असं टिम ब्रिंटन यांनी 1963 मध्ये बीबीसीच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

ते जगातील सर्वांत दुर्गम वस्ती असलेल्या ‘ट्रिस्टन दा कुन्हा’ बेटावरील लोकांबद्दल बोलत होते.

दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेलं हे छोटंसं ब्रिटिश बेट दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन आणि ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या शहरांच्या साधारण मधोमध वसलेलं आहे.

या बेटापासून जवळची मानवी वस्ती असलेली जमीनही 1500 मैलांपेक्षा (साधारण 2414 किलोमीटर) दूर आहे. या बेटावर पोहोचण्यासाठी बोटीतून 7 दिवसांचा प्रवास करावा लागतो.

10 ऑक्टोबर 1961 रोजी बेटावर अचानक एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे जगापासून दूर, शांतपणे राहणाऱ्या या बेटावरील लोकांना आपली घरं सोडून आधुनिक औद्योगिक जगात जावं लागलं.

1998 मध्ये बीबीसीच्या एका माहितीपटात बेटावरील एका व्यक्तीने त्या घटनेची आठवण सांगितली.

ते म्हणाले, “आधी आम्हाला जमिनीखालून गडगडाट म्हणजे मोठे आवाज ऐकू आले. मग अचानक जमीन आपोआप दुभंगली. जमिनीतून धूर आणि आगीचे लोळ बाहेर येऊ लागले.”

मेरी स्वेन यांनीही त्या भीषण प्रसंगाची आठवण सांगितली. त्या आपल्या पतीकडे धावत गेल्या आणि ओरडून म्हणाल्या, “फ्रेड, लवकर उठ! जमीन दुभंगत आहेत!”

ट्रिस्टन बेटावर सुमारे 150 वर्षांपूर्वी लोक राहायला आले, तेव्हापासून तिथला ज्वालामुखी सुप्त अवस्थेत म्हणजेच शांत होता. परंतु, अचानक बेटाच्या मुख्य गावापासून काहीशे मीटर अंतरावर जमिनीला मोठ्या भेगा पडू लागल्या. या गावाचं नाव ‘एडिनबरा ऑफ द सेव्हन सीज’ असं आहे.

बेटावरील लोकांनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींमधून जवळच्या नाइटिंगेल बेटाचा आसरा घेतला. तोपर्यंत ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसामुळे त्यांच्या घरांना धोका निर्माण झाला होता.

ट्रिस्टन दा कुन्हा

बीबीसीच्या एका वार्ताहराने त्या वेळी सांगितलं, “भूकंपाच्या धक्क्यांमुळे संपूर्ण बेट हादरत आहे. बेटाच्या पूर्वेकडील भाग दुभंगून जमीन खचत आहे.”

ट्रिस्टन बेटावरील 264 रहिवाशांना बेट सोडावं लागलं. दुसऱ्याच दिवशी योगायोगाने तिथे आलेल्या एका डच प्रवासी जहाजातून त्यांना तेथून बाहेर काढलं गेलं.

काही तासांतच बेटावरील सर्व लोक जहाजात चढले. सोबत नेता येतील अशा मोजक्याच वस्तू घेऊन त्यांना उर्वरित सर्व गोष्टी मागे सोडाव्या लागल्या.

मेरी स्वेन यांनी त्या वेळची आठवण सांगताना म्हटलं होतं, “आम्ही केवळ 1 बंदूक, 1 ओव्हरकोट आणि 1 दिवा सोबत घेतला होता.”

काही आठवड्यांनी हे लोक इंग्लंडला पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांनी आपल्या बोटी घरांच्या बागेत ठेवल्या.

इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील साउथॅम्प्टन या बंदर शहराजवळच्या एका जुन्या, वापरात नसलेल्या लष्करी विमानतळावर या लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

टिम ब्रिंटन म्हणाले, “या लोकांसाठी इथल्या अनेक गोष्टी नवीन आणि अनोळखी आहेत.”

त्यांनी यापूर्वी कधी दुकानंही पाहिली नव्हती, कारण त्यांच्या बेटावर पैशांचा वापरच होत नव्हता. मासेमारी हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता.

ट्रिस्टन दा कुन्हा

“त्यांच्या बेटावर औद्योगिक क्रांतीच झाली नव्हती. गेली 150 वर्षे ते शेतीवर आधारित साधं जीवन जगत होते. जगात होत असलेल्या प्रगतीपासून ते कोसो दूर होते.”

ट्रिस्टन दा कुन्हा या बेटाचा शोध 1506 मध्ये पोर्तुगीज नौदल अधिकाऱ्याने लावला होता. त्याचं नाव या बेटाला देण्यात आलं. पण, त्यानंतर सुमारे 300 वर्षे या बेटावर समुद्री पक्षी आणि सील यांच्याशिवाय कोणीही राहत नव्हतं.

पुढच्याच वर्षी ब्रिटिश सैन्याची तुकडी माघारी गेली. पण, विल्यम ग्लास नावाचा स्कॉटिश सैनिक तिथेच थांबला. त्याने आपल्या कुटुंबासह आणि काही इतर लोकांच्या मदतीने या बेटावर पहिली कायमस्वरूपी मानवी वस्ती स्थापन केली.

1961 पर्यंत या ज्वालामुखीपासून तयार झालेल्या 40 चौरस मैल (साधारण 100 चौरस किलोमीटर) क्षेत्रफळाच्या बेटावर 264 लोक राहत होते. त्यांच्यापैकी अनेकांचे पूर्वज बेटाजवळ जहाज बुडाल्यानंतर तिथेच राहिले होते. बेटावरील सर्व लोकांची मिळून फक्त 7 आडनावं होती.

बेटावरील लोकांना अनेकवेळा उपासमारीचा सामना करावा लागला. बटाट्याचं पीक न आल्यामुळे किंवा मासेमारीच्या बोटी बुडाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असत. तरीही त्यांनी हे बेट सोडलं नाही. ब्रिटिश सरकारने अनेकवेळा त्यांना दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न केला, पण ते तिथेच राहिले.

नवीन जगाशी जुळवून घेताना

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेट सोडावं लागल्यानंतर इंग्लंडमध्ये स्थायिक होणं या लोकांना खूप कठीण गेलं. त्यांनी यापूर्वी कधी कार, सायकल किंवा टीव्ही पाहिला नव्हता. प्राप्तिकर भरण्यासाठीचा फॉर्मही त्यांनी कधी पाहिला नव्हता. इंग्लंडमधील हवामान आणि तिथलं वातावरणही त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं.

1963 मध्ये जॉय रेपेट्टो यांनी बीबीसीला सांगितलं, “इथे खूप धूर आणि वायू आहे.”

सुरुवातीला राहण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांना नेलं जात होतं, त्या प्रवासाची आठवण सांगताना ते म्हणाले, “मी सतत खोकत होतो. खोकणं थांबतच नव्हतं.”

शेती आणि मासेमारीची सवय असलेल्या या लोकांना ‘सकाळी 9 ते सायंकाळी 5’ या वेळेत काम करण्याची पद्धतही अंगवळणी पडणं कठीण गेलं. रोज सकाळी ठरलेल्या वेळी कामावर जायचं आणि दिवसभर तेच काम करायचं, याची त्यांना सवय नव्हती.

जॉयचे वडील जेराल्ड म्हणाले, “येथे सकाळी कामावर गेलं की एकच काम करायचं असतं. संपूर्ण आठवडाभर ठरलेल्या वेळी उठायचं, त्याच ठिकाणी जायचं आणि रोज तेच काम करायचं, याची सवय लावून घ्यावी लागते.”

बेटावर असताना त्यांचं जीवन निसर्गाच्या चक्रानुसार चालत असत. त्यामुळे रोजच्या कामात होणारे बदल आणि विविध कामांची सवय असलेल्या जेराल्ड यांच्यासाठी इथली ही ठराविक वेळेची दिनचर्या नवीन होती.

ट्रिस्टन दा कुन्हा

स्वेन यांनी सांगितलं की, पैशांशी संबंधित अडचणींमुळेही बेटावरील लोकांना नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं.

त्या म्हणाल्या, “इंग्लंडमध्ये राहायचं असेल तर पैसे लागतात. पण ट्रिस्टन बेटावर आम्हाला पैशांची गरज नव्हती. आमच्याकडे पैसे नसले, तर आम्ही त्या गोष्टीशिवाय राहत असत. त्याचा आम्हाला कोणताही त्रास होत नसे. पैसे नसले तरी मी स्वतःसाठी बटाटे मिळवू शकत होते आणि मासे पकडून आणू शकत होते.”

ब्रिटनमधील जीवनाबद्दल त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “इथलं हवामान आम्हाला आवडत नाही. इथे लोक खूप आजारीही पडतात आणि ही जागाही आम्हाला अजिबात आवडत नाही.”

त्या बेटावर ब्रिटिश गणवेश घालणारा एकच पोलीस कर्मचारी होता. तरीही तिथे जवळजवळ गुन्हे घडतच नव्हते. परंतु, इंग्लंडमध्ये घडलेल्या एका घटनेने बेटावरील लोकांना मोठा धक्का बसला.

बेटावरील एका व्यक्तीवर 2 तरुणांनी हल्ला करून त्याला जखमी केलं. त्यानंतर त्यांनी त्याची सर्वांत मौल्यवान वस्तू असलेलं सोन्याचं घड्याळ हिसकावून घेतलं आणि ते फोडलं.

तरीही, ब्रिटनमधील काही गोष्टी ट्रिस्टन बेटावरील लोकांना आवडू लागल्या होत्या. विशेषतः तरुणांना इटालियन पद्धतीचे सूट आणि गाणी ऐकण्यासाठी वापरले जाणारे रेकॉर्ड प्लेअर आवडत होते.

“जॉनी कॅश आणि अर्नेस्ट टब यांची कंट्री अँड वेस्टर्न गाणी आम्हाला सर्वांत जास्त आवडतात,” असं एका किशोरवयीन मुलाने सांगितलं. त्याला सामूहिक नृत्याचीही आवड होती.

तो म्हणाला, “इंग्लंडमध्ये आल्यापासून मी ‘ट्विस्ट’ आणि ‘द लोकोमोशन’ यांसारखी नृत्यं करत आहे. आता आम्ही वॉल्ट्झ नृत्य कसं करायचो, हेही विसरलो आहोत. पण मला ट्विस्ट नृत्य करायला खूप आवडतं.”

तरीही, बेटावरील बहुतांश रहिवाशांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागली होती. 1962 मध्ये ब्रिटिश सरकारने ट्रिस्टन बेटावरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक पथक पाठवलं. त्यावेळी ज्वालामुखीतून अजूनही धूर निघत होता. परंतु, भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी केल्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक थांबला असून तो पुन्हा शांत झाला असल्याचं सांगितलं.

पुन्हा ट्रिस्टन बेटाकडे…

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एडिनबरा गावाचं फारसं नुकसान झालं नव्हतं. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हारस ऐनवेळी वळला आणि समुद्रात वाहून गेला. हा देवाचा चमत्कार असल्याचं बेटावरील लोकांना वाटलं.

काही घरांची गवताची छपरं जळाली होती, परंतु बहुतेक घरं सुस्थितीत होती. पण बेटावरील लोक तिथे नसताना तिथून जाणाऱ्या काही जहाजांवरील खलाशांनी घरांमधील सामान लुटलं होतं आणि काही पाळीव जनावरंही चोरून नेली होती.

तरीही बेटावरील अनेक जनावरं जिवंत होती. कोंबड्यांची संख्याही वाढली होती. कुत्री मोकाट फिरू लागली होती आणि त्यांनी मेंढ्यांना मारलं होतं. पण, बेटावर मुबलक वाढलेल्या हिरव्या गवतावर गुरं चांगली जगली होती. काही नव्या वासरांचाही जन्म झाला होता. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हारसामुळे समुद्रकिनारे झाकले गेले होते. तरीही, बेटावर परतणं शक्य होतं.

ट्रिस्टन दा कुन्हा

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बेटावरील लोक ज्या आरएएफ तळावर राहत होते, तिथल्या सभागृहात गुप्त मतदान घेतलं. 21 वर्षांवरील सर्व बेटवासीयांनी या मतदानात भाग घेतला. त्यापैकी 148 जणांनी बेटावर परत जाण्याच्या बाजूने मत दिलं, तर केवळ 5 जणांनी विरोध केला. म्हणजेच, जवळपास सर्वांनाच आपल्या बेटावर परतायचं होतं.

त्यानंतर काही लोकांचं एक पथक आधीच बेटावर परतलं. पुढच्या वर्षीच्या बटाट्याच्या पिकासाठी त्यांनी बियाणं लावलं. त्यानंतर नोव्हेंबर 1963 मध्ये बेटावरील बहुतेक लोक ट्रिस्टन दा कुन्हा या बेटावर परतले.

बेटावर परतल्यावर सर्वांत जास्त कशाची उत्सुकता आहे, असं मेरी स्वेन यांना बीबीसीनं विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, “मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगण्याची. तिथे आम्ही स्वतः मासे पकडू शकतो आणि पैशांशिवाय आमच्या गरजेच्या जवळपास सर्व गोष्टी मिळवू शकतो.”

याच बेटावर जन्मलेल्या इलेन रेपेट्टो यांनी 1984 मध्ये हे बेट सोडण्याचा निर्णय घेतला. 1998 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या बेटाची ओढ का वाटते, याबाबत सांगितलं.

त्या म्हणाल्या, “आम्ही स्वावलंबी आहोत. निसर्गाच्या अनेक संकटांचा सामना करून जगण्याची आम्हाला सवय आहे. इथे आम्हाला एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं. अशा प्रकारे एकमेकांना साथ देणारे लोक इतर फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतील.”

1961 मध्ये घडलेल्या घटनेचा बेटावरील लोकांवर झालेल्या परिणामाबद्दल त्या म्हणाल्या, “आजही या बेटावरील ज्वालामुखीतून धूर निघतो. 1961 मध्ये घडलेल्या घटनांची तो आम्हाला सातत्याने आठवण करून देतो. या घटनांमुळे आम्ही स्वतःकडे कसं पाहतो आणि बाहेरच्या जगाशी आमचं नातं कसं आहे, याबद्दलचा आमचा दृष्टिकोन बदलला.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC