Home LATEST NEWS ताजी बातमी अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; पोलिसांनी काय सांगितलं?

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; पोलिसांनी काय सांगितलं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

टायगर श्रॉफ

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर मुंबईत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींकडून गोळीबाराची घटना घडल्याचं वृत्त आहे.

मुंबईच्या पश्चिम परिमंडळ-2 चे पोलीस उप-आयुक्त (DCP) मोहित गर्द यांनी टायगर श्रॉफ याच्या गाडीवरील गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

डीसीपी मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, “टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागलेली नाही किंवा कोणतीही दुखापत झालेली नाही.”

गोळीबाराच्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहितीही मोहित गर्ग यांनी दिली.

ते म्हणाले की, “सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते एका खासगी कामासाठी आले होते. काम झाल्यावर निघताना ही घटना घडली आहे.”

घटनास्थळी पोलीस तपास करत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, “अभिनेता टायगर श्रॉफ संबंधित गोळीबाराच्या घटनेच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याला गोळी लागलेली नाही.”

मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी एकूण 15 पथके तयार केली आहेत. या गोळीबारात दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत, ज्यामध्ये टायगर श्रॉफचा चालक फिरदोश याचाही समावेश आहे. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव चौहान असं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

‘कुठं नेऊन ठेवली राज्याची कायदा व सुव्यवस्था?’

या घटनेबाबत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी ‘एक्स’वर म्हटलंय की, “मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे! आधी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची बातमी!”

“मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असतील, तर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? टायगर श्रॉफवरील गोळीबारात आणखी एका व्यक्तीला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि गृह विभागाने उत्तर द्यावे!”

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकवर म्हटलंय की, “शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदिप पुर्णेकर यांचा ठाण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ हे सुखरुप आहेत.”

“पण राज्यात नेते आणि अभिनेतेच जर सुरक्षित नसतील सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न यामुळं निर्माण होतो. कुठं नेऊन ठेवली राज्याची कायदा व सुव्यवस्था? असं म्हणण्याची वेळ आता आलीय. राज्याच्या आर्थिक राजधानीत गुंडांचा भररस्त्यात असा हैदोस सुरु असेल तर कोणता उद्योजक राज्यात गुंवतवूक करणार? सरकारने आधी राज्य नीट चालवावं आणि जमत नसेल तर एखाद्या सक्षम मंत्र्याकडं गृहखातं सोपवावं.”

टायगर श्रॉफ

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ‘एक्स’वर लिहिलंय की, “अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?

“बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या घरावर गोळीबार, अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना धमक्या… मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायदा-सुव्यवस्था नाही, तर जणू निर्व्यवस्थाच निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत!”

सचिन सावंत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राचा बिहार झाला, असं म्हणण्याची वेळ आली होती; पण आता तर बिहार बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!”

ही बातमी सतत अपडेट होत आहे…

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC