Home LATEST NEWS ताजी बातमी इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीवर गँगरेप; देहव्यापार करण्यास...

इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीवर गँगरेप; देहव्यापार करण्यास भाग पाडले

2
0

Source :- BBC INDIA NEWS

घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

फोटो स्रोत, Mohar Singh

( या बातमीतील तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात 12 वर्षांच्या एका मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 18 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात लवकरच आणखी अटक होऊ शकते.

पोलिसांच्या माहितीनुसार मुलीचे अपहरण करुन तिला चार दिवस डांबून ठेवण्यात आले. या काळात तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले.

श्रीगंगानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) हरिशंकर यांनी बीबीसीला फोनवर सांगितले, “या प्रकरणाचा तपास जवळपास अंतिम टप्प्यात आहे. आम्ही 18 जणांना अटक केली आहे.” त्यांनी असेही सांगितले की सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आणि त्यानंतर आणखी तीन-चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

तपास अधिकारी कैलाश दान सांगतात की या मुलीचा इंस्टाग्रामवर एक मित्र होता, त्याला भेटण्यासाठी ती श्रीगंगानगरपासून शंभर किलोमीटर दूर विजयनगरला गेली होती. तिथे तिच्या सोशल मीडिया मित्राने तिच्यावर बलात्कार केला.

माहितीनुसार त्यानंतर ही मुलगी विजयनगरहून बसने रात्री गंगानगरला पोहोचली आणि तिने रिक्षा केली.

मुलगी घरी न पोहोचल्याने तिच्या आईने अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला आणि नातेवाइकांकडे चौकशी केली. पण 22 जूनपर्यंतही मुलगी घरी न परतल्याने आई पोलीस ठाण्यात पोहोचली.

पोलीस ठाणे इंचार्ज बीबीसीला म्हणाले, “मुलीची आई ठाण्यात पोहोचण्याआधीच आम्हाला तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली होती. आम्ही मुलीपर्यंत पोहोचलो आणि आरोपींना ताब्यात घेतले.”

“हे प्रकरण महिला ठाण्याशी संबंधित असल्याने महिला ठाणे इंचार्ज आणि बाल कल्याण समितीचे सदस्य आले. आम्ही मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.”

महिला पोलीस ठाणे प्रभारी यांनी बीबीसीला सांगितले, “मुलीच्या तक्रारीवरून आम्ही पॉक्सो, बाल न्याय कायदा, देहविक्री प्रतिबंध यासह इतर संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त एसपी करत आहेत.” त्या पुढे सांगतात की मुलीने सांगितले की 20 ते 25 जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

18 आरोपींना अटक

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला फोनवर सांगितले की मुलीसोबत 18 जूनच्या रात्रीपासून ते 22 जूनच्या दुपारपर्यंत या घटना घडल्या.

ते सांगतात की मुलगी तिच्या मित्राला भेटून रात्री गंगानगर बस स्टँडवर पोहोचली. इथून तिने रिक्षा घेतली. रिक्षावाला तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली.

रिक्षावाला रात्री मुलीसोबत हॉटेलमध्येच थांबला. बलात्काराच्या प्रकरणात रिक्षावाल्यालाही अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीबरोबर ज्या हॉटेलमध्ये रेप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, ती बुलडोजरने पाडण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Mohar Singh

ते पुढे सांगतात की ज्या हॉटेलमध्ये मुलीला नेण्यात आले, तिथेच तिच्यावर सर्वाधिक वेळा बलात्कार झाला. याशिवाय आणखी दोन हॉटेल्समध्येही मुलीला नेण्यात आले, तिथेही तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की पुढील तपास सुरू आहे आणि लवकरच किमान चार जणांना आणखी अटक होईल. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले सर्व आरोपी प्रौढ आहेत.

पोलिसांनी आरोपींना रिमांडवरही घेतले आणि आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लवकरच इतर काही आरोपींना अटक करतील असे पोलिसांनी सांगितले.

मुलीसोबत ज्या तीन हॉटेल्समध्ये बलात्कार झाला असा आरोप आहे, तिथे जिल्हा प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर चालवला आहे.

स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट

घटनेनंतर महिला पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून जबाबही नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी मुलीकडून आरोपींची ओळखही पटवून घेतली आहे.

तपास अधिकारी सांगतात की मुलगी सध्या तिच्या आई-वडिलांसोबत घरी आहे. घटनेनंतर श्रीगंगानगरमध्ये सातत्याने लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

घटनेनंतर श्रीगंगानगरमध्ये लोक सातत्यानं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.

फोटो स्रोत, Mohar Singh

दिल्ली एम्स रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. गणेश मीणा सांगतात की जेव्हा एखादा अल्पवयीन मुलगा/मुलगी अशा परिस्थितीतून जातो, जिथे त्याच्यासोबत/तिच्यासोबत बलात्काराची घटना घडते, कुटुंबात कोणाचा मृत्यू होतो किंवा एखादी मोठी दुर्घटना घडते, तेव्हा तो पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) मधून जातो.

डॉ. मीणा यांच्या मते पीटीएसडीमध्ये मुलाच्या आत्मविश्वासात घट होते. तो कोणावरही विश्वास ठेवत नाही, गप्प राहतो, शिक्षण सुटते आणि बाहेरच्या लोकांची त्याला भीती वाटते. तो वारंवार त्या घटनेची आठवण येऊन घाबरतो. अशा परिस्थितीत मुलाचे संपूर्ण आयुष्य प्रभावित होऊ शकते.

मुलांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी उपाय सांगताना ते म्हणतात की अशा परिस्थितीत मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यासोबत औषधे आणि थेरपीदेखील आहे, जी दीर्घ प्रक्रिया आहे. या काळात मुलांच्या मनात अस्वस्थ करणारे विचार येतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC