Home LATEST NEWS ताजी बातमी गाझातली ही मुलगी जिवंत नाही हे आपल्याला माहिती असतं तरी हा चित्रपट...

गाझातली ही मुलगी जिवंत नाही हे आपल्याला माहिती असतं तरी हा चित्रपट तिला वाचवण्याची आशा जागी ठेवतो

2
0

Source :- BBC INDIA NEWS

सहा वर्षांची हिंद रजब जानेवारी 2024 मध्ये गाझामध्ये झालेल्या गोळीबारात मारली गेली होती

फोटो स्रोत, Rajab Family

“प्लीज मला इथून बाहेर काढा, मला भीती वाटते आहे, ते माझ्यावर गोळ्या झाडत आहेत.”

कारमध्ये एकटीच अडकलेली 6 वर्षांची मुलगी…कारमध्ये असलेले तिचे सर्व नातेवाईक मारले गेले आहेत.

गोळीबार आणि मृतदेहांमध्ये लपलेली ही मुलगी मोबाईल फोनवरून स्वयंसेवकांकडे (व्हॉलंटियर्स) मदत मागते आहे. ती घाबरलेली आहे, मात्र तरीही लढते आहे.

तसं तर हे कोणत्याही काल्पनिक चित्रपटातील दृश्य असू शकतं. मात्र जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात अंधारात ‘द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ चित्रपट पाहत असता, तेव्हा हे काल्पनिक नाही तर वास्तव आहे ही जाणीवच अंगावर शहारे आणते…की या मुलीचा आवाज हा एखाद्या अभिनेत्रीचा आवाज नाही.

‘द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ हा चित्रपट अनेक महिन्यांच्या वादानंतर भारतात ‘अ’ प्रमाणपत्रासह प्रदर्शित झाला आहे.

कदाचित हिंदला वाचवतील…

‘द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ हा चित्रपट हिंद रजब या पॅलेस्टिनी मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा काही तासांवर आधारित आहे. त्यावेळेस ती आणि तिचे नातेवाईक गाझातून पलायन करत असताना हल्ल्याला बळी पडले होते. एकटी हिंद अनेक तास कारमध्ये लपून राहिली. अनेक प्रसारमाध्यमांनी केलेल्या तपासानुसार संभाव्य इस्रायली गोळीबारात तिचा मृत्यू झाला.

चित्रपट पाहताना प्रेक्षक म्हणून तुम्हाला आधीच माहीत असतं की जानेवारी 2024 मध्ये गाझामध्ये झालेल्या गोळीबारातून हिंद रजब ला वाचवता आलं नव्हतं.

मात्र तरीदेखील जेव्हा तुम्ही त्या मुलीला आणि फोनवर तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांना पाहत आणि ऐकत असतात. तेव्हा तुम्हाला वाटतं की कदाचित तिला वाचवलं जाईल…कदाचित हे सर्व मिळून तिला वाचवू शकतील.

माहितीपट आणि खऱ्या कलाकारांच्या सीमारेषेवर असलेला हा चित्रपट तुमची फसवणूक करतो आहे असं वाटतं…कारण तुम्हाला माहीत आहे की हिंदचा मृत्यू झाला आहे. मात्र हातातून निसटत चाललेल्या क्षणांमध्ये हा चित्रपट प्रत्येक क्षणाला तिला वाचवता येण्याचा भ्रम आणि आशा निर्माण करतो.

मात्र हे वास्तव नाही. प्रेक्षक म्हणून हाच विरोधाभास तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करतो आणि हादरवून टाकतो. एखाद्या थरारपटाप्रमाणेच तुमच्या हृदयाची धडधड वाढत राहते.

हिंद जेव्हा म्हणते की शाळेचं नाव आहे, अ हॅप्पी चाईल्डहूड

चित्रपटात एका बाजूला हिंद आहे, जी दिसत नाही, तिचा फक्त आवाज ऐकू येते. तिच्या खऱ्या आवाजाच्या फोन रेकॉर्डिंगमधून तिची भीती आणि असहायपणा तुम्हाला ऐकू येतो.

दुसऱ्या बाजूला तुम्ही रेड क्रेसेंटच्या खऱ्या स्वयंसेवकाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांना पाहता. त्यांनीच फोनवर हिंदची मदत केली होती.

हिंद रजबशी रेड क्रेसेंटचे स्वयंसेवक बोलत असल्याचं चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, Altitude

प्रत्येक मिनिटाला ते हिंदशी बोलत असतात. मृत्यू तिच्यासमोर उभा असताना ते तिला दिलासा देतात.

दिलासा देण्यासाठी मदत करणारे स्वयंसेवक हिंदला खोटं सांगतात की रक्तानं माखलेले तिचे नातेवाईक अजूनही कारमध्ये डोळे मिटून झोपलेले आहेत. मात्र युद्धाच्या परिस्थितीत जगणं शिकलेली हिंद जेव्हा त्या स्वयंसेवकांना सांगते की नाही ते मरण पावले आहेत. तेव्हा ते निशब्द होतात.

दहशतीच्या या क्षणांमध्येच निरागसपणाचे काही क्षणदेखील समोर येतात. हिंदनं त्या स्वयंसेवकांना सांगितलं होतं की तिच्या शाळेचं नाव ‘अ हॅप्पी चाईल्डहूड’ आहे आणि तिच्या वर्गाचं नाव ‘बटरफ्लाय’ आहे.

भारतात चित्रपट प्रदर्शित होण्यावरून वाद

असं मानलं जात होतं की मार्चमध्ये ऑस्कर समारंभाच्या आसपास हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.

बीबीसीशी बोलताना चित्रपटाचे वितरक मनोज नंदवाना म्हणाले, “मी फेब्रुवारीमध्येच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भारतीय सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट सादर केला होता. प्रसारमाध्यमांमध्ये आलं आहे त्याप्रमाणे सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्यानं आम्हाला तोंडी सांगितलं की जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर यामुळे भारत-इस्रायल संबंध बिघडतील. मात्र लेखी स्वरुपात ते काहीही म्हणू शकत नव्हते.”

ते पुढे म्हणाले, “मात्र, हा चित्रपट कोणतीही कात्री न लावता प्रदर्शित झाला आहे, ही चांगली गोष्ट आहे. कोणताही शब्द बीप वगैरे करण्यात आलेला नाही. त्याला अडल्ड सर्टिफिकेट मिळालं आहे.”

भारतात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब झाला

फोटो स्रोत, Venice Film Festival

मार्चमध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या कथित आरोपावर भारतीय सेन्सॉर बोर्डाकडे प्रतिक्रिया मागितली असता कोणतंही उत्तर मिळालं नाही.

मात्र भारतातील अनेक चित्रपटकार, कलाकार आणि खासदारांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याविरोधात त्यांचा निषेध नोंदवला होता.

तर भारताचे माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूर यांनी याला डिसग्रेसफुल म्हणत लिहिलं होतं की एखादा चित्रपट प्रदर्शित करण्याचा दुसऱ्या देशांबरोबरच्या संबंधांचा काहीही संबंध नसतो. अशाप्रकारे चित्रपटांवर बंदी घालणं थांबवलं पाहिजे.

चित्रपटाच्या निर्मितीचा विचार करता ट्युनिशियाच्या दिग्दर्शक कौथर बिन हानिया यांना हिंद वर चित्रपट बनवावं असं का वाटलं.

कौथर बिन हानिया यांनी बीबीसीला सांगितलं, “हिंद रजब मदत मागत असल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग मी ऐकल्यापासून या मुलीचा आवाज माझा पाठलाग करत होता. मला खूपच असहाय वाटलं. मी हा चित्रपट बनवला कारण नाहीतर माझाही त्या घटनेत सहभाग आहे, असंच मला वाटलं असतं.”

गाझामध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये फक्त हिंद रजब या मुलीचाच मृत्यू झाला नाही, तर तिला मदत करण्यासाठी गेलेल्या ॲम्ब्युलन्सच्या दोन कर्मचाऱ्यांचादेखील मृत्यू झाला.

इस्रायलची भूमिका

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ)नं आधी म्हटलं होतं की हल्ल्याच्या वेळेस इस्रायलचं सैन्य त्या भागात नव्हतं. मात्र काही स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या तपासानंतर या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

नंतर आयडीएफनं सांगितलं की त्यांनी ‘टेरर टार्गेट्स’वर छापे टाकले होते. हिंदनं ज्या परिसरातून इमर्जन्सी कॉल केला होता त्या परिसराच्या जवळ सैन्य नव्हतं.

ऑक्टोबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयोगानं इस्रायलवर गाझातील आरोग्य सेवा व्यवस्थेवर हल्ला करण्याचा आरोप केला होता. यात हिंद रजब आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवकांचाही उल्लेख होता.

तर हिंदच्या आई वेसम हमादा यांनी उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांनी अतिशय भावनिक मुलाखतीत बीबीसीला सांगितलं होतं, “ज्यांनी माझा आवाज ऐकला, मदतीसाठी हाक देणाऱ्या माझ्या मुलीचा आवाज ऐकला, मात्र तिला वाचवण्यासाठी काहीच केलं नाही, अशा सर्वांना मी कयामतच्या दिवशी देवासमोर प्रश्न विचारेन. आणखी किती मातांनी या दु:खाला सामोरं जाण्याची तुम्ही वाट पाहत आहात?”

आयडीएफ कोणतीही कारवाई केल्याचं नाकारत आली आहे

फोटो स्रोत, Altitude

मनोज नंदवाना म्हणाले की चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळेस हिंदच्या आईदेखील आल्या होत्या. मात्र त्यांचं हिंदच्या आईशी बोलणं झालं नाही.

ते म्हणाले, “ज्या आईनं तिची मुलगी गमावली असेल, तिच्या चेहऱ्यावर ते तीव्र दु:ख तुम्हाला दिसत असेल, तर अशावेळी तुम्ही त्यांच्याशी काय बोलणार. त्यांना वाटत राहिलं की त्या त्यांच्या मुलीला वाचवू शकल्या नाहीत. काहीजण असतील जे याला प्रोपगंडा म्हणतील. या चित्रपटातून दिसतं की युद्धामुळे काय होऊ शकतं, मग जे कुठेही होत असो.”

राजकारण, धर्म, भूगोल यांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट हिंद जरब आणि त्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या स्वयंसेवकांवर केंद्रित आहे, जे त्यावेळेस हिंदला वाचवता येईल या आशेनं, कधी वेळेशी, तर कधी स्वत:शी आणि कधी एकमेकांशी लढत होते.

द व्हॉईस ऑफ हिंद रजब चित्रपटातील कलाकार

फोटो स्रोत, Getty Images

चित्रपटात शेवटी तुमची खात्री पटते की 6 वर्षांची हिंद आता खरंच जिवंत नाही, तेव्हाच शेवटच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला हिंद खरोखरंच पडद्यावर दिसते. ती तिच्या खऱ्या आयुष्यातील दृश्यं असतात. होम व्हीडिओमधून घेतलेल्या दृश्यांमध्ये ती समुद्रकिनारी खेळताना दिसते.

अगदी तशीच जसं हिंदनं मरण्याआधी स्वयंसेवकांना सांगितलं होतं – ‘अ हॅप्पी चाईल्डहूड.’

खरं आयुष्य आणि माहितीपट यांच्या मध्ये असणारी ही चित्रपट निर्मितीची पद्धत तुम्हाला अस्वस्थ करते. तुम्हाला दु:खी करते, उदास करते, रडवते, हादरवून टाकते, अस्वस्थ करते किंवा अगदी नि:शब्ददेखील करते – ते सांगण्यासाठी माझ्याकडे योग्य शब्द नाहीत.

चित्रपटाचे भारतातील वितरक मनोज नंदवाना यांनी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेसाठी देखील या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC