Home LATEST NEWS ताजी बातमी गीरमधील सिंहांची गर्जना आणि त्यांच्या डरकाळीच्या आवाजाबाबत समोर आल्या ‘या’ गोष्टी

गीरमधील सिंहांची गर्जना आणि त्यांच्या डरकाळीच्या आवाजाबाबत समोर आल्या ‘या’ गोष्टी

2
0

Source :- BBC INDIA NEWS

गीर अभयारण्यातील सिंह

फोटो स्रोत, Photo by DeAgostini/Getty Images

गुजरातच्या सौराष्ट्रातील ‘ग्रेटर गीर रिजन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांमध्ये राहणारे आशियाई सिंह गेल्या काही वर्षांत पोरबंदर, राजकोट आणि बोटाद जिल्ह्यांतही दिसू लागले आहेत.

सिंहांचा विषय निघाला की, त्यांच्या डरकाळीचा उल्लेख हमखास होतो.

एखादा तरुण नर सिंह जंगलातील प्रस्थापित नर सिंहाच्या वर्चस्वाला आव्हान देतो, तेव्हा त्या सिंहाची डरकाळी प्रतिस्पर्ध्याला घाबरवणारी असते.

मात्र, सिंह गर्जना का करतात? गीरमधील सिंहांची डरकाळी किती दूरपर्यंत ऐकू जाते? त्या गर्जनेत किती स्वर असतात आणि ती किती वेळ टिकते? याचा अभ्यास करण्यासाठी गुजरात वन विभागातील अधिकारी आणि पक्ष्यांच्या आवाजांचे ध्वनिमुद्रण करणारे संशोधक विरल जोशी यांच्या पथकाने 2024 मध्ये एक संशोधन केले.

या संशोधनावर आधारित एक शोधनिबंध गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला असून त्यातून काही रंजक निष्कर्ष समोर आले आहेत.

सिंह सर्वाधिक कोणत्या वेळी गर्जना करतात?

या अभ्यासासाठी सासन वन्यजीव विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक आणि गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यचे अधीक्षक डॉ. मोहन राम यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी गीर जंगलाच्या पश्चिम भागातील देडकडी, देवळिया आणि अंकोलवाडी रेंजमध्ये स्वयंचलित ध्वनिमुद्रण यंत्रे बसवली.

गीर अभयारण्यातील सिंह

फोटो स्रोत, Dr Mohan Ram

एकूण 15 ठिकाणी 1,259 तासांचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. त्याचे विश्लेषण करताना संशोधकांच्या लक्षात आले की, संध्याकाळपासूनच सिंह गर्जना करू लागतात आणि संपूर्ण रात्री अधूनमधून त्यांचा आवाज ऐकू येत राहतो.

विशेष म्हणजे, पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान सिंहांच्या गर्जना सर्वाधिक नोंदवण्यात आल्या. म्हणजेच, सूर्योदयापूर्वीच्या दोन-तीन तासांत सिंह सर्वाधिक डरकाळ्या फोडतात.

सिंहांची डरकाळी किती दूरपर्यंत ऐकू जाते?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी दोन प्रयोग केले.

देवळिया सफारी पार्कमधील बंदिस्त सिंहांपासून सुमारे 100 मीटर अंतरावर दोन ध्वनिमुद्रण यंत्रे बसवण्यात आली. त्यानंतर आणखी एक यंत्र 2.7 किलोमीटर अंतरावर बसवण्यात आले.

तसेच, सासनजवळील जंगलात सिंह नियमितपणे पाणी पिण्यास येत असत आणि गर्जना करत असत अशा ठिकाणी एक यंत्र बसवण्यात आले. त्यानंतर त्या जलस्रोतापासून एक, दोन आणि तीन किलोमीटर अंतरावर प्रत्येकी एक ध्वनिमुद्रण यंत्र झाडांवर बसवण्यात आले.

गीर जंगल

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC

या प्रयोगांनंतर संशोधकांनी निष्कर्ष काढला की, जंगलामध्ये सिंहांची गर्जना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत स्पष्टपणे ऐकू जाऊ शकते.

बीबीसीशी बोलताना डॉ. मोहन राम यांनी सांगितले की, सिंहाचा आवाज किती दूरपर्यंत नोंदवला जाईल, हे ध्वनिमुद्रण यंत्रातील मायक्रोफोनच्या क्षमतेवरही अवलंबून असते.

गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यचे अधीक्षक डॉ. मोहन राम

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC

दुष्यंत वसावडा यांनी सांगितले, “सिंहाची डरकाळी किती दूर जाईल, हे वेळ आणि परिसरावर अवलंबून असते. जर एखादा सिंह रात्रीच्या शांत वेळी टेकडीवरून गर्जना करत असेल, तर ती दोन किलोमीटरपर्यंत सहज ऐकू जाऊ शकते.”

ते पुढे म्हणाले, “दिवसा मानवी हालचाल आणि इतर आवाज अधिक असल्याने सिंहाची गर्जना तितकी दूर ऐकू येत नाही. तसेच, सपाट भागातून दिलेली डरकाळी जंगलातील झाडे आणि वनस्पतींमुळे अडवली जाऊ शकते.”

सिंह गर्जना का करतात?

सिंह हा कळपात राहणारा सामाजिक प्राणी आहे.

नर सिंह स्वतःची हद्द निश्चित करतो आणि इतर प्रौढ नर सिंहांना त्या भागात प्रवेश करू देत नाही. त्या क्षेत्रातील सिंहिणींशी संयोग करून स्वतःचा वंश पुढे नेण्याचा तो प्रयत्न करतो.

अशा प्रकारे एखाद्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या नराला प्रबळ (Dominant) नर सिंह म्हटले जाते. या वर्चस्वासाठी नर सिंहांमध्ये वारंवार संघर्ष होतात. वृद्ध होत चाललेल्या सिंहाचा पराभव झाल्यास त्याला उर्वरित आयुष्य बहुधा एकट्याने घालवावे लागते.

या संपूर्ण प्रक्रियेत गर्जना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

गीर अभयारण्यातील सिंह

फोटो स्रोत, Dr Mohan Ram

पूर्वीच्या संशोधनांचा संदर्भ देत डॉ. मोहन राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधनिबंधात लिहिले आहे की, सिंहांच्या गर्जनेमुळे अनेक उद्दिष्टे साध्य होतात. त्यामध्ये आपल्या क्षेत्रावरील हक्काची घोषणा करणे, सामाजिक ऐक्य टिकवणे, गटाचे संरक्षण करणे, घुसखोरांना इशारा देणे यांचा समावेश होतो.

आवाजाच्या आधारे सिंह परिचित आणि अपरिचित सिंहांना ओळखू शकतात. अनेकदा कुटुंबातील एका सदस्याच्या गर्जनेला इतर सदस्य सामूहिक प्रतिसाद देतात. दोन नर सिंहांची युती असेल तर ते समन्वयाने गर्जना करून प्रतिस्पर्धी नरांना दूर ठेवतात.

पहाटे 3 ते 5 वाजताच सिंह सर्वाधिक गर्जना का करतात?

सिंह प्रामुख्याने निशाचर प्राणी आहेत. दिवसा ते बहुतांश वेळ सुरक्षित ठिकाणी विश्रांती घेतात आणि तुलनेने निष्क्रिय असतात.

शोधनिबंधानुसार, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ सिंहांसाठी सर्वाधिक सक्रिय असतो.

डॉ. मोहन राम म्हणाले, “पहाटेच्या वेळी सिंहांना आपल्या क्षेत्राची गस्त घालावी लागते. त्यामुळे ते फिरत राहतात आणि वारंवार गर्जना करतात. याच वेळी ते आपल्या कुटुंबातील सदस्यांशीही अधिक संवाद साधतात. शिवाय, या वेळचे वातावरण थंड असल्याने त्यांची हालचाल अधिक असते.”

गीर अभयारण्यातील सिंह

फोटो स्रोत, DeAgostini/Getty Images

गेली तीन दशके गीरमध्ये निसर्गशिक्षण शिबिरे आयोजित करणारे आणि केशोद येथील स्काय फॉरेस्ट यूथ क्लबचे अध्यक्ष रेवतुभा रायजादा म्हणतात की, दिवसा सिंह क्वचितच गर्जना करतात.

ते सांगतात, “सूर्योदयापूर्वी नर सिंह डरकाळी फोडून प्रतिस्पर्ध्यांना त्या प्रदेशावर आपला ताबा असल्याचा इशारा देतात. तसेच ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण कुठे आहोत, याची माहिती देण्यासाठीही गर्जना करतात.”

या संशोधनाचे महत्त्व काय?

डॉ. मोहन राम यांच्या मते हे संशोधन सिंहांच्या संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

ते म्हणाले, “या संशोधनादरम्यान आम्ही गीरमधील सिंहांचा आवाज ओळखू शकणारे संगणकीय मॉडेल विकसित केले आहे.

त्याच्या मदतीने दूरवरून सिंहांवर लक्ष ठेवणे शक्य होईल. त्यामुळे त्यांच्या संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापनात मोठी मदत होऊ शकते. सिंहांच्या गर्जनेवरूनच त्यांची उपस्थिती आणि स्थान विश्वासार्हपणे समजू लागले, तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतत त्यांच्या मागावर राहण्याची गरज उरणार नाही.”

गीर अभयारण्यातील सिंह

फोटो स्रोत, Photo by Indranil MUKHERJEE / AFP via Getty Images

विरल जोशी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, “सिंहांचा आवाज ऐकून ते नेमके कुठे आहेत, याचा अंदाज घेता येतो. त्यामुळे सिंह आणि माणसांमधील संभाव्य संघर्षाचा आधीच अंदाज घेणे शक्य होते. भविष्यात हे मॉडेल मानव-सिंह संघर्षाच्या घटना कमी करण्यासही मदत करू शकते.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC