Home LATEST NEWS ताजी बातमी टायगर श्रॉफ : वयाच्या चौथ्या वर्षी ब्रूस ली’ला पाहून मार्शल आर्ट्स शिकण्याची...

टायगर श्रॉफ : वयाच्या चौथ्या वर्षी ब्रूस ली’ला पाहून मार्शल आर्ट्स शिकण्याची झाली इच्छा

2
0

Source :- BBC INDIA NEWS

टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर मुंबईतील जुहू येथे गोळीबार करण्यात आला. या गोळाबारानंतर मुंबई पश्चिम परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त मोहित गर्द यांनी सांगितले की टायगर श्रॉफ सुरक्षित आहे. त्यांना गोळी लागली नाही किंवा दुखापत झाली नाही.

टायगर श्रॉफ हा ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. टायगर श्रॉफचा पहिला चित्रपट 2014 साली आलेला ‘हिरोपनती’ हा आहे. जॅकी श्रॉफ यांचा पहिला चित्रपट हा ‘हिरो’ होता तर टायगर श्रॉफचा चित्रपट ‘हिरोपनती’ असल्यामुळे या नामसाधर्म्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

टायगर श्रॉफचे पदार्पणापासून अनेक चित्रपट आले आहे. ‘हिरोपनती’, ‘बागी’, ‘अ फ्लाइंग जाट’, ‘मुन्ना मायकल’, ‘स्टुडंट ऑफ द इअर-2’, ‘बडे मियां छोटे मिया’, ‘वॉर’ हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. त्यात ‘बागी’ या चित्रपटाचेच 4 भाग आहेत.

टायगर श्रॉफचे चित्रपट हे त्यातील अ‍ॅक्शन सिक्वनेन्ससाठी प्रसिद्ध आहेत. टायगर श्रॉफ आणि त्याचे मार्शल आर्टसवरील प्रेम हा त्याच्या चाहत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.

टायगर श्रॉफ आणि जॉकी श्रॉफ

अनेक इंटरव्यूमधून टायगर श्रॉफने आपल्या मार्शल आर्टसबद्दल सांगितले आहे. रणबीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये टायगर श्रॉफ सांगतो की मार्शल आर्ट्स म्हणजे माझ्यासाठी हे ध्यान करण्यासारखे आहे. यामुळे एक स्थिरतेचा अनुभव येतो, मन-शरीराला एक शिस्त लागते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मला वाटते.

याच इंटरव्यूमध्ये टायगरने सांगितले की लहानपणी मी टीव्हीवर ब्रूस लीचा ‘इंटर द ड्रॅगन’ हा चित्रपट पाहिला. मी आई किंवा बाबांना म्हटलो की मला असं बनायचं आहे. त्यांनी मला कराटे क्लासला टाकले आणि माझ्या लक्षात आले की ही गोष्ट फार पटकन आत्मसात केली.

टायगर आणि डान्सवरील त्याचे प्रेम

पण टायगर श्रॉफ फक्त केवळ एक अॅक्शन स्टारच नाहीये तर त्याच्या डान्स मूव्हसचे पण अनेक चाहते आहेत. त्याच्या चित्रपटात जितकं महत्त्व फाइट सिक्वेन्सला असतं तितकचं महत्त्व हे डान्सला देखील असतं. जसं टायगर श्रॉफचा मार्शल आर्टसचा आदर्श हा ब्रूस ली आहे तसं त्याचा नृत्याच्या क्षेत्रातील आदर्श कोण असेल बरं?

टायगर श्रॉफ

त्याचं उत्तर त्यानेच दिलंय, चित्रपट समीक्षक आणि बिजनेस अ‍ॅनालिस्ट कोमल नहाटाच्या इंटरव्यूमध्ये टायगर श्रॉफ सांगतो की माझ्या घरी मायकल जॅक्सनची डिस्क होती. आजी ती लावत असे. ते पाहून मला डान्स आवडू लागला. एका बाजूला मार्शल आर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला डान्स या दोन्हीच्या आवडींतून टायगर श्रॉफ घडला.

कोमल नहाटांना दिलेल्या इंटरव्यूत टायगर श्रॉफ सांगतो की ‘या दोन गोष्टींव्यतिरिक्त मला मी त्या काळात काही केल्याचं आठवतच नाही. त्यात मी नेहमी खूश असायचो आणि माझ्या आई-वडिलांनी मला असं सुखी बालपण दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.’

‘लहानपणी मला कोणती गोष्ट मागावी लागली हेच आठवत नाही. मागण्याआधीच मला ते मिळायचं,’ असं टायगर श्रॉफ सांगतो.

प्रातिनिधिक छायाचित्र

लहानपणापासून आपण एका मोठ्या कलाकाराचे पुत्र आहोत हे जाणीव मला होती पण त्याच वेळी आपली देखील एक वेगळी ओळख असावी असं वाटत होतं. पण चित्रपटात येण्याबद्दल काही ठरवलं नव्हतं.

‘जॅकी दादा म्हणजे तीन बत्ती चाळीतले’

टायगर सांगतो की त्याला फिल्म इंडस्ट्रीत आणण्यात चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला यांची महत्त्वाची भूमिका आहे. साजिद नाडियादवालासोबत टायगर श्रॉफ फुटबॉल खेळत असे. त्याचवेळी साजिद नाडियादवालाने त्याला चित्रपटासाठी विचारले. सुरुवातीला टायगरला आपण ही भूमिका पार पाडू की नाही याविषयी शंका होती पण आपण हे करू शकतो असा विश्वास साजिद नाडियादवालाने दिला असे टायगर सांगतो.

आणि असा पहिला चित्रपट टायगर श्रॉफला मिळाला. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेननचेही पदार्पण झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर खानने केले होते. त्यानंतर टायगर बागी आणि मुन्ना मायकल या चित्रपटांमध्ये शब्बीर सोबत काम केले आहे.

हिरोपनती असाच चित्रपट होता जो टायगरला करायला आवडेल. मारधाड आणि नृत्य या दोन्ही आवडत्या गोष्टी या दोन्ही त्याच्या आवडत्या गोष्टी त्यात होत्या. प्रकाशराजने साकारलेला व्हिलन देखील सर्वांना भावला होता. टायगर सांगतो की मी जे डान्स आणि फाइट सिक्वेन्स करतो ते माझ्या प्रेक्षकांना आवडतात, मुख्यतः माझे प्रेक्षक ही लहान मुलं आहेत आणि मला हे आवडतं की मला एक ‘मास’ अॅक्टर मानलं जातं.

टायगर श्रॉफ

अनेक वेळा स्टार किड्स म्हटलं की एक प्रतिमा डोळ्यासमोर येते पण तुझ्याबाबतीत असं दिसत नाही, असं कोमल नहाटांनी टायगरला विचारलं होतं, त्यावर टायगर सांगतो की मी जेव्हा माझ्या वडिलांकडे पाहतो तेव्हा मला जाणवतं की ते अतिशय नम्र, डाउन टू अर्थ आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

इतक्या वर्षांनंतरही माझे वडील कधी बदललेले मी पाहिले नाहीत. जॅकी दादा म्हणजे ‘वाळकेश्वरला तीन बत्ती चाळीत’ राहणारे अशी त्यांची ओळख आहे. ती अजून त्यांनी कायम ठेवली आहे. जर त्यांच्यात हा बदलला कधी नाही झाला तर मी कोण आहे? असा प्रश्न मी स्वतःला विचारतो.

‘मीम्स आणि टायगर’

जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्हाला ‘छोटी बच्ची हो क्या’? हे मीम माहीतच असेल. अनेक जण तर गमतीने म्हणतात की जितका टायगर श्रॉफ स्वतः प्रसिद्ध नाहीे त्याहून त्याचे हे मीम प्रसिद्ध आहे.

रणबीर अलहाबादियाच्या पॉडकास्टवर टायगरने या मीमबद्दल म्हटले की ‘हे माझे आवडते मीम आहे. जेव्हा मी हे सर्क्युलेट होताना पाहिले तेव्हा तर मला फार मजा आली.’

चित्रपटातील दृश्यावरुन तयार झालेले मीम

जेव्हा टायगरचा पहिला पिक्चर आला तेव्हा अनेकांनी त्याचा चेहरा मॉर्फ केला आणि तो करीना कपूर सारखा दिसतो म्हणून त्याची थट्टा देखील उडवली. त्याबद्दल कोमल नहाटाने त्याला विचारले तेव्हा टायगरने सांगितले की ‘मला त्याविषयी कधीच राग आला नाही. उलट मला जर प्रेक्षक ओळखू लागले असतील, नोटीस करू लागले असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटलं. आणि करीना कपूर तर एक सुंदर व्यक्ती तर त्यात काय प्रॉब्लेम आहे?’

शक्यतो मुलांना ‘देखणं’ म्हणवून घ्यायला आवडतं तर मग ‘सुंदर’ म्हटल्यावर तुला कसं वाटतं असं कोमल नहाटांनी त्याला विचारल्यावर तो सांगतो की ‘मी हे उलट कॉम्प्लिमेंट’ म्हणूनच घेतो.

पहिले दोन चित्रपट हिट आणि तिसरा ‘फ्लॉप’

टायगर श्रॉफचा पहिला चित्रपट हिट झाला. त्याच्या फाइट आणि डान्सचे रातोरात लाखो फॅन्स झाले. त्यानंतर त्याचा ‘बागी’ हा चित्रपट आला.

‘बागी’ या चित्रपटाची लोकप्रियता एवढी आहे की त्यानंतर त्याचे आणखी तीन भाग, असे एकूण 4 भाग आले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

‘बागी’नंतर आलेला चित्रपट ‘अ फ्लाइंग जाट’ हा मात्र बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्याचं निश्चितच दुःख झाल्याचं टायगर सांगतो.

त्यानंतर पुन्हा शब्बीर खान यांच्यासोबत ‘मुन्ना मायकल’ आला. या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण होतं ते म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत झळकले. त्याची देखील बरीच चर्चा झाली.

करन जोहर निर्मित स्टुडंट ऑफ द इअर – 2 मध्येही टायगरने भूमिका साकारली. आणि त्यानंतर टायगरला आदित्य चोप्रा यांच्या कंपनीकडून ऑफर मिळाली आणि आपल्या आवडत्या कलाकारासोबत म्हणजेच हृतिक रोशनसोबत टायगर ‘वॉर’ या चित्रपटात झळकला.

आदित्य चोप्रांच्या प्रोडक्शन हाऊसने जे ‘स्पाय व्हर्स’ म्हणजेच सिक्रेट एजंटच्या चित्रपटांचे जग तयार केले आहे- त्यात ‘पठाण, ‘एक था टायगर’ यासोबतच ‘वॉर’चा ही समावेश आहे.

त्यानंतर ‘गणपत – हिरो इज बॉर्न’, अक्षय कुमारसोबत ‘बडे मियां छोटे मिया’, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात टायगर श्रॉफ झळकला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC