Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, BAI
पुलेला गोपीचंद यांच्या खास क्रीडा कारकिर्दीतला सुवर्णक्षण म्हणजे, 2001 मध्ये बर्मिंगहॅममध्ये जिंकलेली ‘ऑल इंग्लंड ओपन’ स्पर्धा. पण त्यांना BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप मात्र जिंकता आलेली नाही.
जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी जेव्हा भारतीय बॅडमिंटनची धडपड सुरू होती, त्या काळात गोपीचंद यांनी प्रकाश पदुकोण यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय बॅडमिंटनच्या नव्या पर्वाचा एक प्रमुख चेहरा बनण्याचा मान मिळवला.
उल्लेखनीय म्हणजे, प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये हे मानाचे विजेतेपद पटकावले होते.
त्यानंतरच्या काळात पुलेला गोपीचंद यांचा चॅम्पियन खेळाडू ते प्रशिक्षकापर्यंतचा प्रवास झाला. भारतीय बॅडमिंटनमध्ये अनेक खेळाडू त्यांनी घडवले.
त्यात सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि इतर अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
पण 52 वर्षांच्या गोपीचंद यांनी नुकताच आपल्या 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासातला एक अत्यंत अनोखा आणि भावूक क्षण अनुभवला. त्यांनी आपल्या शिष्यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या व्यासपीठावर पदक स्वीकारताना याआधीही पाहिलं आहे. पण यावेळी त्या मंचावर त्यांची स्वतःची मुलगी गायत्री उभी होती.
नवी दिल्लीत पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत गायत्री गोपीचंद आणि तिची साथीदार त्रिशा जॉली यांनी कांस्यपदकाला गवसणी घालत नवा इतिहास रचला. जागतिक पातळीवर हे मानाचं पदक जिंकणारी ही देशाची दुसरीच महिला दुहेरीची जोडी आहे.
याआधी 2011 च्या लंडन स्पर्धेत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं होते.
कोणतंही मानांकन नसताना गायत्री आणि त्रिशाच्या जोडीने स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक नामांकित खेळाडूंना पराभूत केलं आणि सेमिफायनल पर्यंत पोहोचताना 2 वेळा चिनी जोड्यांवर मात केली.
उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत या भारतीय जोडीने ऑलिम्पिक पदक विजेत्या लियू शेंग शू आणि तान निंग यांच्याविरुद्ध पहिला गेम जिंकला. पण नंतर 18-21, 21-13, 21-8 अशा फरकाने त्यांचा पराभव झाला.
या कांस्यपदकासह वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील भारताच्या एकूण पदकांची संख्या 16 झाली आहे. गायत्री आणि त्रिशाने या स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं.
प्रशिक्षकही आणि पिताही
या ऐतिहासिक प्रवासात गोपीचंद सातत्याने संघासोबत होते आणि एकाच वेळी 2 भूमिका पार पाडत होते.
एका बाजूला ते प्रशिक्षक होते, जे या जोडीला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज करत होते. तर दुसऱ्या बाजूला ते एक वडील होते, जे आपल्या मुलीला जगातील सर्वात मोठ्या क्रीडामंचावर खेळताना पाहत होते.
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की त्यांना कशाचा अधिक अभिमान वाटतो, पिता असण्याचा की प्रशिक्षक असण्याचा. तेव्हा गोपीचंद यांनी कोणत्याही एका पर्यायाची निवड केली नाही.
ते म्हणाले, “मला वाटतं दोन्हीचा. जेव्हा मी कोर्टवर असतो तेव्हा मी एक प्रशिक्षक असतो. पण माझं असं मानणं आहे की त्रिशा आणि गायत्री या दोघींनीही आपली सर्वांची मान अभिमानाने उंचावली आहे.”
हे उत्तर गोपीचंद यांच्या संयमित आणि संतुलित शैलीतलं होतं. अनेक दशकांपासून बॅडमिंटन खेळत आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे ते शिकले आहेत. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि सहजता सांगत होती की हा क्षण काहीतरी वेगळा आणि खास होता.
फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
मुलीला इतका उत्कृष्ट खेळ करताना पाहून काय भावना दाटून येत आहेत, हे शब्दात व्यक्त करताना होणारी त्यांची अडचण स्पष्ट जाणवत होती.
ते म्हणाले, “खरं सांगायचे तर, मी हे शब्दांत कसे मांडू हे मला समजत नाहीये. माझे खेळाडू जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा नेहमीच सारखीच भावना जाणवते. माझ्या इतर कोणत्याही खेळाडूबाबत माझ्या मनात जशा भावना असतात अगदी तशीच भावना गायत्रीबद्दलही आहे. त्यापेक्षा वेगळे किंवा जास्त काही नाही.”
भावनिक होण्याऐवजी प्रशिक्षक गोपीचंद यांनी खेळाच्या अशा पैलूंवर अधिक भर दिला ज्यांमुळे या जोडीला हे ऐतिहासिक यश मिळवता आले.
प्रशिक्षक या नात्याने गोपीचंद यांच्यासाठी हा विजय खडतर संघर्षानंतर मिळालेली मोठी दाद होती. एकेकाळी ही जोडी जागतिक क्रमवारीत थेट टॉप 9 मध्ये झेपावली होती. मात्र त्रिशाच्या घोट्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या यशाचा हा वेग काही काळ मंदावला होता.
गोपीचंद पुढं म्हणाले, “गेलं वर्ष या दोघींसाठीही मोठ्या परीक्षेचं होतं. अशा खडतर काळातून सावरून थेट जागतिक मंचावर असा धडाकेबाज खेळ करणंं अजिबात सोपं नाही. यातूनच त्यांच्यातील जबरदस्त ताकद आणि गुणवत्ता सिद्ध होते. खेळाच्या अशा टप्प्यावर असताना ही ऐतिहासिक कामगिरी करणे खरोखरच अभिमानास्पद आहे.”
या ऐतिहासिक यशात आणखी भर घालत गायत्री आणि त्रिशा यांची नुकतीच 2025 च्या प्रतिष्ठित ‘अर्जुन पुरस्कारा’साठी अधिकृत निवड झाली आहे.
गोपीचंद यांनी भावूक होत म्हटलं की, “ईश्वराच्या आशीर्वादाने आज आमच्या घरात 2 अर्जुन पुरस्कार विजेते झाले आहेत. अशा घटना क्रीडाविश्वात अगदी दुर्मिळ असतात. तिला ही संधी दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तिची उत्कृष्ट कामगिरी आणि खिलाडूवृत्ती यांचा मला मनापासून अभिमान वाटतो.”
‘गोपीचंद यांची मुलगी’
गायत्रीच्या बालपणापासूनच बॅडमिंटन तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले होते. अगदी वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षापासून वडिलांसोबत सराव सत्रांना जात राहिली.
खेळाडू, प्रशिक्षक आणि बॅडमिंटन कोर्टच्या वातावरणातच तिचं बालपण गेलं. अकादमीमध्ये गोपीचंद यांची कन्या असल्यानं साहजिकच लोकांच्या नजरा आणि अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर जरा जास्तच असायचं.
तरीही स्वतःची ओळख मुलीसाठी ओझं ठरू नये, याची खबरदारी गोपीचंद यांनी कायम घेतली. ‘गोपीचंद’ या मोठ्या नावाचा आणि यशाचा वारसा पेलणे किती आव्हानात्मक असते हे ते चांगले ओळखून होते.
फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
गायत्रीने याविषयी मनमोकळेपणाने सांगितले होते. “त्यांनी कधीही माझ्यावर अपेक्षांचे दडपण ठेवले नाही. मी जे काही करेन त्यात आनंदी राहावे, हीच एक पिता म्हणून त्यांची एकमेव भावना होती. खेळाच्या मैदानावर असो किंवा वैयक्तिक आयुष्यात त्यांची साथ कायम माझ्यासोबत राहिली आहे.”
उपांत्यपूर्व फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात चीनच्या बलाढ्य जिया यिफान आणि झांग शू शियान जोडीवर विजय मिळवल्यानंतर, त्यांच्या या मोकळ्या आणि सकारात्मक विचारांची झलक अगदी स्पष्टपणे पाहायला मिळाली.
या विजयावर शिक्कामोर्तब होताच गायत्री आणि त्रिशाचे पदक पक्के झाले होते. विजयाचा आनंद अनावर होऊन त्रिशा थेट धावत जाऊन गोपीचंद यांच्या गळ्यात पडली. तर गायत्रीने आधी संयम राखत कोर्टवरील प्रतिस्पर्धी खेळाडूंची भेट घेऊन त्यांच्याशी हात मिळवला आणि मग ती वडिलांकडे गेली.
गोपीचंद यांनी तिला अत्यंत मायेने जवळ घेतले. हा अत्यंत भावूक आणि देखणा क्षण या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक बनला.
गायत्री आणि त्रिशाची जोडी कशी जमली?
वडिलांप्रमाणेच गायत्रीने कारकिर्दीची सुरुवात एकेरी खेळाडू म्हणून केली होती आणि नंतर दुहेरी (डबल्स) स्पर्धेकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्रिशानेही सुरुवातीला एकेरी गटातूनच खेळायला सुरुवात केली होती. परंतु नंतर तिला दुहेरी प्रकारात आपले खरे कौशल्य सापडले.
2021 मध्ये या दोघींनी एकत्र खेळायला सुरुवात केली. त्यांच्या खेळण्याच्या शैलीतील फरक त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरला. त्रिशाचा बॅककोर्टवरील आक्रमक खेळ आणि गायत्रीची नेटजवळची उत्तम जाण या दोन्ही गोष्टी एकमेकींना पूरक ठरत होत्या.
काळासोबत त्यांचा ताळमेळ अधिक घट्ट होत गेला आणि याच बळावर त्यांनी जागतिक क्रमवारीत टॉप 10 जोड्यांमध्ये धडक मारली.
फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
गायत्रीच्या दुहेरी (डबल्स) गटात येण्याच्या निर्णयाबाबत गोपीचंद म्हणाले, “हो, मला वाटते की हा अगदी योग्य निर्णय होता.”
मात्र या यशामागे या दोघींचा मोठा संघर्षही दडला होता. या वर्षी त्रिशाच्या दुखापतीमुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीवर परिणाम झाला होता आणि संघाकडे पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी केवळ 45 दिवस शिल्लक राहिले होते.
गोपीचंद म्हणाले, “गेल्या 6 आठवड्यांत आम्ही घेतलेल्या कठोर मेहनतीचा चांगला फायदा झाला. जेव्हा सरावाचा परिणाम थेट कोर्टवर दिसून येतो तेव्हा तो आनंद खरोखरच मोठा असतो.”
भारताची भविष्यातील आशादायी जोडी
गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनी जिंकलेले हे ऐतिहासिक कांस्यपदक केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित यश नाही तर संपूर्ण भारतीय क्रीडाविश्वाला नवी उभारी देणारा हा क्षण आहे.
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ करू शकणाऱ्या एका भक्कम महिला दुहेरी जोडीची देशाला गरज होती. या दोन युवा खेळाडूंनी नवा इतिहास रचत भारतीय बॅडमिंटनच्या भविष्याविषयीच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.
मात्र या भारतीय जोडीसाठी हे कांस्यपदक म्हणजे प्रवासाचा शेवट नसून एका मोठ्या झेपेची सुरुवात आहे.
फोटो स्रोत, BAI
त्रिशाने सांगितले, “जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील हे पदक आणि मिळालेला अर्जुन पुरस्कार यामुळे आमच्यातील विश्वास कित्येक पटींनी वाढला आहे. हा केवळ आमचा पहिला टप्पा आहे, इथून पुढे आम्हाला अजून मोठी मजल मारायची आहे.”
आता त्यांचे संपूर्ण लक्ष आगामी ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’वर (एशियन गेम्स) केंद्रित झाले असले तरी पुढच्या आव्हानांच्या तयारीत सध्या मिळालेल्या या ऐतिहासिक क्षणाचा आणि यशाचा आनंद कुठेही ओसरू नये, असे त्रिशाला वाटते.
त्रिशा पुढे हसत म्हणाली, “आजच्या घडीला या ऐतिहासिक कामगिरीचा मनसोक्त आनंद लुटणे गरजेचे आहे. आम्ही संपूर्ण टीमसोबत मिळून हा विजय मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. आणि हो, या सेलिब्रेशनच्या मेन्यूमध्ये आईस्क्रीमचा गोडवा आवर्जून असेलच!”
अर्थात प्रशिक्षक म्हणून गोपीचंद यांना लगेचच विश्रांती मिळणार नाही. खेळाचे नवे मैदान असेल, समोर नवा आव्हानवीर उभा असेल आणि आणखी एक नवे आव्हान त्यांची वाट पाहत असेल.
उत्तम आयोजन
हा आठवडा भारतासाठी उत्तम आयोजन करणारा देश म्हणूनही अत्यंत यशस्वी ठरला. नव्या रूपात सज्ज झालेले ‘इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम’, प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या गॅलरी आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचे सर्वत्र कौतुक झाले. अगदी जागतिक महासंघानेही या आयोजनाची प्रशंसा केली.
फोटो स्रोत, Reuters
जागतिक बॅडमिंटन महासंघाचे सरचिटणीस थॉमस लुंड म्हणाले, “येथील उत्कृष्ट व्यवस्था पाहून मी अत्यंत प्रभावित झालो आहे. वर्षाच्या सुरुवातीला काही टीका झाली होती परंतु इतक्या कमी कालावधीत जे काम पूर्ण केले गेले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.”
थॉमस लुंड पुढे म्हणाले, “वर्षाच्या सुरुवातीला पाहणीसाठी आलेल्या ज्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी काही त्रुटींवरून चिंता व्यक्त केली होती, त्यांनीही आता या बदलांचे मनापासून स्वागत केले असून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या यशस्वी आयोजनासाठी मी ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI), भारत सरकार आणि या संपूर्ण प्रक्रियेशी जोडल्या गेलेल्या लोकांचे आभार मानतो. आज ज्या उच्च स्तरावर ही व्यवस्था उभी राहिली आहे, त्यावर आम्ही अत्यंत समाधानी आणि आनंदी आहोत.”
पदक विजेत्यांची ऐतिहासिक यादी
फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
- प्रकाश पदुकोण (1983) – कांस्यपदक (पुरुष एकेरी)
- ज्वाला गट्टा / अश्विनी पोनप्पा (2011) – कांस्यपदक (महिला दुहेरी)
- पी. व्ही. सिंधू (2013) – कांस्यपदक (महिला एकेरी)
- पी. व्ही. सिंधू (2014) – कांस्यपदक (महिला एकेरी)
- सायना नेहवाल (2015) – रौप्यपदक (महिला एकेरी)
- सायना नेहवाल (2017) – कांस्यपदक (महिला एकेरी)
- पी. व्ही. सिंधू (2017) – रौप्यपदक (महिला एकेरी)
- पी. व्ही. सिंधू (2018) – रौप्यपदक (महिला एकेरी)
- पी. व्ही. सिंधू (2019) – सुवर्णपदक (महिला एकेरी)
- बी. साई प्रणित (2019) – कांस्यपदक (पुरुष एकेरी)
- किदाम्बी श्रीकांत (2021) – रौप्यपदक (पुरुष एकेरी)
- लक्ष्य सेन (2021) – कांस्यपदक (पुरुष एकेरी)
- सात्विक साईराज रंकीरेड्डी / चिराग शेट्टी (2022) – कांस्यपदक (पुरुष दुहेरी)
- एच. एस. प्रणॉय (2023) – कांस्यपदक (पुरुष एकेरी)
- सात्विकसाईराज रंकीरेड्डी / चिराग शेट्टी (2025) – कांस्यपदक (पुरुष दुहेरी)
- त्रिशा जॉली / गायत्री गोपीचंद (2026) – कांस्यपदक (महिला दुहेरी)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




