Home LATEST NEWS ताजी बातमी भावाच्या अंत्ययात्रेत ढसाढसा रडला, पण निघाला त्याच्याच हत्येचा आरोपी; पोलिसांनी ‘असं’ शोधलं

भावाच्या अंत्ययात्रेत ढसाढसा रडला, पण निघाला त्याच्याच हत्येचा आरोपी; पोलिसांनी ‘असं’ शोधलं

2
0

Source :- BBC INDIA NEWS

सीसीटीव्ही फुटेज

17 ऑक्टोबरच्या दुपारी दीडच्या सुमारास पाकिस्तानच्या प्रंजाब प्रांतातील गुजरात येथील एका गावात राहणाऱ्या मोहम्मद सुफियान यांना सौदी अरेबियात राहणाऱ्या त्यांचा भाऊ मोहम्मद बिलाल याचा व्हाट्सअप कॉल आला.

या कॉलवर मोहम्मद बिलाल म्हणाला, “तू तातडीनं गुजरात शहरात ये. तिथे तुझ्यासाठी एक खास सरप्राइज आहे. मला तुला एका खास व्यक्तीशी भेट घालून द्यायची आहे.”

मोहम्मद सुफिया दुचाकीवरून घराबाहेर पडले. जेव्हा ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना कळालं की सरप्राइज देणारी दुसरी कोणी व्यक्ती नसून त्यांचा स्वत:चा भाऊच आहे.

दोघांनी एकत्र जेवण केलं, गप्पा मारल्या आणि संध्याकाळी घरी परतण्यासाठी दुचाकीवरून निघाले.

स्थानिक पोलीस अधिकारी फैसल शहजाद यांच्या माहितीनुसार, दरीकरी रस्त्यावर एका निर्जण ठिकाणी पोहोचल्यानंतर मोहम्मद बिलालने शौचास जाण्याचं कारण सांगून भावाला दुचाकी थांबवण्यास सांगितली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी थांबताच त्याने भावावर हल्ला करून त्याची हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेला लुटमारीचं स्वरूप देण्यासाठी आरोपीनं मृताचा मोबाइल फोन आणि दुचाकी सोबत घेतली. त्यानंतर त्याने दुचाकी कोटला येथील पंजाब मोटर्सच्या बाहेर उभी केली आणि लाहोरला पळ काढला.

दौलत नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी हत्येसंदर्भात माहिती दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद बिलाल सौदी अरेबियातून पाकिस्तानात परतल्याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. रात्री भावाच्या हत्येची बातमी कुटुंबीयांना मिळाली तेव्हा आरोपीनं या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचं नाटक केलं.

फैसल शहजाद सांगतात, “आरोपीने कुटुंबीयांना सांगितलं की, तो सौदी अरेबियातून घरी पोहोचेपर्यंत त्याच्या भावाला दफन करू नये.”

मात्र, आरोपी त्यावेळी सौदी अरेबियात नव्हे तर पाकिस्तानातच होता, असंही पोलिसांनी म्हटलं.

“आरोपीनं अंत्ययात्रेची वेळही उशिरा ठेवण्यास सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 18 ऑक्टोबरला तो गावात पोहोचला. भावाच्या हत्येची वार्ता मिळाल्यानंतर आपण नुकतंच सौदी अरेबियातून पाकिस्तानात आल्याचं त्याने भासवलं.”

जिल्हा पोलीस अधिकारी फैसल शहजाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये, यासाठी आरोपी मोहम्मद बिलाल भावाच्या अंत्ययात्रेत आणि दफनविधीतही सहभागी झाला.

आरोपी मोहम्मद बिलाल याला 21 ऑक्टोबरला न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपीकडून जप्त करण्यात आलेली दुचाकी आणि मोबाइल फोनसह या प्रकरणातील इतर बाबींचीही चौकशी करायची आहे.

न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हतबल वडील मुलाच्या शोधात निघाले

गुजरातमधील दौलत नदर पोलीस ठाण्यात 17 ऑक्टोबरला दाखल करण्यात आलेल्या हत्या आणि लुटमारीच्या एफआयआरमध्ये बिलाल आणि सुफियान यांचे वडील खालिद महमूद हे तक्रारदार आहेत.

या एफआयआरमध्ये कोणालाही थेट आरोपी करण्यात आलेलं नाही. आपल्या मुलाची हत्या अज्ञात व्यक्तींनी केल्याचं तक्रादारानं म्हटलं आहे.

एफआयआरनुसार, 24 वर्षीय मोहम्मद सुफियान 17 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी काही महत्वाच्या कामासाठी दुचाकीवरून गुजरात शहरात जाण्यासाठी घरातून निघाले होते.

“मोहम्मद सुफियान संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही, तेव्हा मला त्याची काळजी वाटू लागली. मी माझ्या मित्रांसोबत दुचाकीवरून मुलाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो. रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी आम्ही मोटारवेच्या जवळ असलेल्या दरीकडी रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ पोहोचलो.”

“तेव्हा रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पालथा पडलेला दिसला. आम्ही दुचाकीच्या हेडलाइटच्या प्रकाशात जवळ जाऊन पाहिले असता माझा मुलगा सुफियान रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होता. त्याचा गळा चिरलेला होता.”

एफआयआरनुसार, “आसपासच्या परिसरात शोध घेतला असता माझ्या मुलाची दुचाकी आणि मोबाइल फोन घटनास्थळावर नव्हते.”

पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही आणि सेफ सिटी कॅमेऱ्यांच्या फुटेजची मदत घेतल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि दौलत नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एहसान लतीफ यांनी दिली.

ते म्हणाले, “घटनेच्या दिवशी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी मृत मोहम्मद सुफियान घरातून बाहेर पडले, हे समजल्यानंतर आम्ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यास सुरुवात केली.”

“सुफियान ज्या ज्या ठिकाणांवरून आणि परिसरांतून गेले होते, तेथील रस्त्यांलगतचे कारखाने आणि निवासी इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले.”

या तपासादरम्यान सोफ सिटी कॅमेऱ्यातील एका फुटेजमध्ये, मोहम्मद सुफियान दुपारी 3 वाजून 42 मिनिटांनी गुजरात शहरातील मेजर अजीज भट्टी शहीद रुग्णालयासमोर जाऊन थांबले होते.

“ते जवळपास 1 तास 45 मिनिटे तिथे कोणाची तरी वाट पाहत होते. संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी तिथे एक व्यक्ती आली. सुफियान यांनी त्याचं अत्यंत उत्साहानं स्वागत केलं. दोघेही काही मिनिटं तिथे उभे राहून बोलत होते. त्यानंतर ते जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले.”

सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना दिसलं की, रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही भाऊ एका दुचाकीवर बसले. सुफियान दुचाकी चालवत होता, तर बिलाल मागे बसला होता.

पोलीस अधिकारी एहसान लतीफ यांनी सांगितलं, “आम्ही त्या व्यक्तीची ओळख पटवली. कारण अंत्ययात्रेच्या वेळी आणि त्यानंतरच्या विधींमध्ये त्याने मृताचा मोठा भाऊ म्हणून स्वत:ची ओळख करून दिली होती. भावाच्या हत्येची बातमी मिळताच त्याने आपत्कालिन परिस्थितीत विमानाचं तिकीट काढून पाकिस्तानमध्ये आल्याचं सांगितलं होतं.”

“मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधून वेगळीच माहिती समोर आली. आरोपी हा भावाची हत्या होण्यापूर्वीच पाकिस्तानात परतला होता, हे त्यातून स्पष्ट झाले.”

यानंतर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना कळालं की, रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही भाऊ दुचाकीवर बसले. यावेळी सुफियान दुचाकी चालवत होता, तर बिलाल मागे बसला होता.

“दरीकरी येथील निर्जन परिसरात दोघेही जवळपास अर्धा तास कॅमेऱ्याच्या नजरेआड होते. त्यानंतर परतीच्या मार्गावरील कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये आरोपी बिलाल एकटाच दुचाकी चालवत गुजरात शहराच्या दिशेने जाताना दिसला. सुफियान कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे बिलालनेच सुफियानची हत्या केली असावी, हे चित्र स्पष्ट होत होतं.”

पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला जो मृतदेहाखाली पडून होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चाकूवर बिलालच्या बोटांचे ठसेही आढळले आहेत. बोटांच्या ठशांच्या पडताळणीसाठी सदर चाकू लाहोरमधील पंजाब फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

बिलाल सौदी अरेबियातून पाकिस्तानात का परतला?

मृत सुफियान आणि आरोपी बिलाल यांचे वडील खालिद महमूद यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं की, दोन्ही भावांमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होता. मात्र, त्यांनी हा वाद मिटवला होता.

ते म्हणाले, “मला 4 मुलं होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दुसरा युरोपला गेला. बिलाल सौदी अरेबियात काम करत होता, तर सुफियान पाकिस्तानात माझ्यासोबतच राहत होता. घराच्या वाटणीचा विषय आला, तेव्हा मी बिलालला गावाबाहेर असलेली शेतीची जमीन दिली आणि आता घरात त्याचा कोणताही हिस्सा नसेल, असे सांगितले.”

खालिद महमूद यांच्या म्हणण्यानुसार, “बिलालला असं वाटू लागलं होतं की, त्याचा धाकटा भाऊ सुफियान त्याच्यावर अन्याय करत आहे आणि त्याच्या वडिलोपार्जित हक्काच्या आड येत आहे. वारसाहक्काच्या वाटणीचा निर्णय वडिलांनी नव्हे, तर भाऊ सुफियानने घेतला आहे, असेही त्याला वाटू लागले होते.”

खालिद महमूद म्हणाले, “इतकं सगळं मिळूनही माझा मुलगा बिलाल एवढं मोठं पाऊल उचलेल, याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो.”

ते पुढे म्हणाले, “सुफियानला दफन करण्याच्या तयारीत बिलाल सर्वांत पुढे होता. तो सर्वांना मिठी मारून रडत होता आणि निर्दयी लोकांनी आपल्या भावाची इतक्या क्रूरपणे हत्या कशी केली, हे सांगत होता. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भावाच्या हत्येचा बदला घेणार, असंही तो म्हणत होता.”

वडिलांच्या दाव्यानुसार, बिलालचा मालमत्तेच्या वाटणीवरून भाऊ सुफियानसोबत (चित्रात) वाद झाला होता.

खालिद महमूद यांनी सांगितलं की, 2 दिवसांनंतर पोलिसांनी बिलालला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जायचे असल्याचे सांगितले, तेव्हा त्याला कोणत्या कारणासाठी नेले जात आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती.

ते म्हणाले, “आम्हाला वाटलं की, त्याचा जबाब वगैरे नोंदवायचा असेल. मात्र, काही तासांनंतर मला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आणि बिलालसमोर बसवण्यात आलं, तेव्हा त्याच्या हातात बेड्या होत्या.”

वडील आठवण सांगताना म्हणाले, “मी अस्वस्थ झालो आणि पोलीस अधिकाऱ्याला तसे करू नका, असं सांगितलं. त्यावर अधिकारी म्हणाले, ‘आधी आपल्या मुलाशी बोला आणि त्याला या प्रकरणाबद्दल विचारा.'”

पोलिसांचा दावा आहे की, चौकशीदरम्यान आरोपी बिलालने गुन्ह्याची कबुली दिली. मालमत्तेतून बेदखल करून आपल्यावर अन्याय करण्यात आला, असे त्याने सांगितले.

बिलाल गेल्या दीड वर्षापासून सौदी अरेबियात राहत होता आणि तिथे ट्रॉली चालवण्याचं काम करत होता. दुसरीकडे, मृत सुफियान 2 वर्षं मलेशियात राहिल्यानंतर पाकिस्तानात परतला होता. आता तो युरोपला जाण्याच्या प्रयत्नात होता.

दोन्ही भावांचे वडील खालिद महमूद म्हणाले, “माझे संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाले आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं नुकसान झालेलं नाही. मी माझ्या डोळ्यांसमोर माझी 2 मुलं गमावली. एकाची हत्या झाली, तर दुसरा कायमचा तुरुंगाआड गेला.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC