Source :- BBC INDIA NEWS

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 4 जूनरोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. महाराष्ट्रातही अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाचं दमदार आगमन झालं आहे.

हवामान विभागानुसार, आज (5 जून) राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, यावर्षी उशिराने दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात स्थिर होण्यास काही काळ घेण्याचा अंदाज आहे. तर, मान्सून दाखल होईपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळचा समावेश आहे.

विदर्भातील पावसाची स्थिती

फोटो स्रोत, @imdnagpur

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai

तापमान आणि मान्सूनची स्थिती

हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ओलांडून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे.

परिणामी, पुढील 4-5 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकरी आणि नागरिकांना वादळी पावसात सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आणि विद्युत उपकरणे व झाडांपासून अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

जूनमध्ये असं असेल हवामान

जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.

जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC