Home LATEST NEWS ताजी बातमी स्वत:च्याच 3 मुलांच्या हत्येचा आईवर आरोप; खटल्यादरम्यान आतापर्यंत काय काय घडलं?

स्वत:च्याच 3 मुलांच्या हत्येचा आईवर आरोप; खटल्यादरम्यान आतापर्यंत काय काय घडलं?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

लिंडसे क्लॅन्सीवर तिच्या तीन लहान मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.

फोटो स्रोत, Getty Images

(सूचनाः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील लिंडसे क्लॅन्सी या महिलेवर स्वत:च्याच 3 लहान मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. या महिलेने या हत्या केल्याचं नाकारलेलं नाही.

या प्रकरणात न्यायाधीशांच्या एका समितीनं या खटल्याची सुनावणी सुरू केली आहे. या प्रकरणानं संपूर्ण अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे.

क्लॅन्सीनं आपल्या मुलांची हत्या केल्याचं नाकारलेलं नाही. परंतु, तिच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, क्लॅन्सी एका गंभीर अशा मानसिक आजारानं ग्रस्त होती. त्यामुळे तिला कायदेशीररित्या यासाठी जबाबदार धरू नये.

जानेवारी 2023 मध्ये झालेल्या 3 हत्यांच्या संदर्भात क्लॅन्सीवर ‘फर्स्ट डिग्री मर्डर’चा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यायसमितीनं (ज्युरी) दोषी ठरवल्यास क्लॅन्सीला पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

नक्की हे प्रकरण काय आहे? संपूर्ण अमेरिकेचं लक्ष लागलेल्या या खटल्यातील काही प्रमुख घडामोडींवर एक नजर टाकूया.

‘क्लॅन्सीला भ्रम आणि भास होत होते’

फिर्यादी पक्षाचा आरोप केला की, 24 जानेवारी 2023 रोजी क्लॅन्सीनं मॅसॅच्युसेट्समधील डक्सबरीमधील घरी तिच्या 3 मुलांना मारलं आणि नंतर स्वत:देखील जीव देण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये 5 वर्षांची कोरा, 3 वर्षांचा डॉसन आणि 8 महिन्यांचा कॅलन जिवानिशी गेले तर 36 वर्षीय क्लॅन्सीला पक्षाघात झाला.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ती व्हीलचेअरवरच होती. क्लॅन्सीच्या वकिलांनी, या हत्यांमधील तिची भूमिका कधीही नाकारली नाही.

न्यायालयीन कामकाजादरम्यान क्लॅन्सी यांचं तोंड एका बाजूला वळलेलं होतं आणि ती डोळ्यांतील अश्रू पुसताना दिसली.

फोटो स्रोत, The Boston Globe via Getty Images

त्याऐवजी, बचाव पक्षानं क्लॅन्सीच्या मानसिक अवस्थेचा हवाला देत असा युक्तिवाद केला आहे की, आपल्या सर्वात लहान मुलाला जन्म दिल्यानंतर क्लॅन्सीला भास आणि भ्रम होऊ लागले.

या मुलांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच ती स्वतःहून एका मानसोपचार रुग्णालयात दाखल झाली होती, असाही युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान, फिर्यादी पक्षानं असा युक्तिवाद केला आहे की, क्लॅन्सीनं जाणीवपूर्वक आपल्या मुलांना ठार मारण्याचा कट रचला होता आणि तिला यासाठी कायदेशीररित्या जबाबदार धरलं पाहिजे.

त्यांचा आरोप असा आहे की, त्या वेळी क्लॅन्सीनं तिचा पती म्हणजेच पॅट्रिक क्लॅन्सी याला काही कामासाठी बाहेर पाठवलं होतं, जेणेकरून तो त्या वेळी घरी नसेल.

क्लॅन्सीच्या कुटुंबीयांनी मुलांच्या हत्येपूर्वीची तिची मानसिक स्थिती कशी होती, याबद्दल साक्ष दिली आहे. तिच्या या कुटुंबियांमध्ये तिची पूर्वाश्रमीची सासू आणि आधीच्या पतीचाही समावेश आहे.

5 आठवड्यांच्या या खटल्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. कारण, हजारो लोक न्यायालयाच्या या कार्यवाहीकडं डोळे लावून आहेत.

क्लॅन्सीच्या समर्थनार्थ शेकडो महिला न्यायालयाबाहेर जमल्या होत्या. त्यांनी ‘She Needed Help’ आणि ‘Peace For Lindsay’ यांसारख्या घोषणा लिहिलेले गुलाबी शर्ट घातले होते.

क्लॅन्सीच्या आधीचा पती म्हणतोय – ‘हा खूप कठीण काळ आहे’

2 दिवसांच्या कालावधीत क्लॅन्सीच्या आधीच्या पतीनं म्हणजेच पॅट्रिकनं न्यायसमितीसमोर तिची प्रसूतीनंतर खालावलेली मानसिक स्थिती याबद्दल माहिती दिली. तसेच ज्या दिवशी त्याच्या मुलांचा मृत्यू झाला त्या दिवसाचं अत्यंत हृदयद्रावक व तपशीलवार असं वर्णन केलं.

त्यानं न्यायसमितीला सांगितलं की, क्लॅन्सीची मानसिक स्थिती या हत्यांच्या आधी म्हणजेच सुमारे महिनाभराआधीपासूनच तीव्रपणे बिघडण्यास सुरुवात झाली होती.

“तिचं वजन खूप झपाट्यानं कमी होऊ लागलं होतं. ती खूप निराश होती आणि खूप कठीण काळातून जात होती,” असं त्यानं सांगितलं.

पॅट्रिकनं सांगितलं की, काही काळानंतर क्लॅन्सी डॉक्टरांची मदत घेऊ लागली आणि वेगवेगळी औषधंही घेऊ लागली.

क्लॅन्सीच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागल्याचं ती म्हणाली होती, हेदेखील त्याला आठवत असल्याचं त्यानं सांगितलं.

पॅट्रिक क्लॅन्सी यांनी साक्ष दिली की, जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना बेडरूममध्ये 'सर्वत्र रक्त' दिसत होतं.

फोटो स्रोत, Reuters

पॅट्रिक क्लॅन्सी यांनी आपला मुलगा डॉसनला शेवटचं कधी पाहिलं याचं वर्णन केलं आहे. जेव्हा ते जेवण आणि औषध आणायला गेले, तेव्हा त्यांचा मुलगा सोफ्यावर बसून चिकन नगेट्स खात होता. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांना त्यांची मुलं मृतावस्थेत आढळली.

न्यायालयात तिच्या पतीच्या 911 नंबरवरील कॉलचं रेकॉर्डिंग ऐकवलं जात असताना लिंडसे क्लॅन्सी ढसाढसा रडली.

त्या रेकॉर्डिंगमध्ये तळघरात आपल्या मृतावस्थेतील मुलांना पाहिल्यानंतर ‘तिनं मुलांना मारलं,’ असं ओरडतानाचं त्याचं वाक्य ऐकू येतं.

खटल्याच्या सुरुवातीपासूनच पॅट्रिक क्लॅन्सीबद्दलच्याही वेगवेगळ्या ‘कॉन्स्पिरसी थेअरीज्’ ऑनलाइन पसरत आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याचाही सहभाग असावा, याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मात्र, या प्रकरणात तो कधीही संशयित नव्हता आणि तपासकर्त्यांनाही त्याच्यावर संशय आला नाही. लिंडसे क्लॅन्सीनं आपल्या मुलांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे आणि त्याच्या वकिलांनीही हे नाकारलेलं नाही.

क्लॅन्सीच्या उपचारांवरून वाद

बचाव पक्ष आणि सरकारच्या बाजूनं 10 पेक्षा जास्त तज्ज्ञ साक्षीदारांनी साक्ष दिली आहे. त्यापैकी काहींनी क्लॅन्सीच्या मानसिक आरोग्याबद्दल वकिलांशी वादही घातला.

उपचारादरम्यान, क्लॅन्सीला डझनभराहून अधिक औषधं देण्यात आली आणि तिनं आत्महत्येशी संबंधित हेल्पलाइन आणि आपत्कालीन विभागाची मदत घेतली.

क्लॅन्सीला प्रसूतीनंतरच्या मनोविकृतीचा आजार (पोस्टपार्टम सायकोसिस) झाला होता, हे न्यायसमितीला पटवून देण्याचा प्रयत्न तिच्या वकिलांनी केला.

ही एक दुर्मिळ स्थिती आहे. त्यात स्त्रियांना बाळंतपणानंतर अत्यंत मूड स्विंग (कधी प्रचंड ऊर्जा, खूप आनंद जाणवणे-Mania) कधी नैराश्य किंवा या दोन्हींचा एकत्रित अनुभव येऊ शकतो. क्लॅन्सीनं तिला भास आणि भ्रम होत होते, असा दावाही केला.

न्यायालयात एके दिवशी अत्यंत तणावाचं वातावरणही तयार झालं होतं. क्लॅन्सीच्या मानसोपचारतज्ज्ञांपैकी एक जेनिफर टफ्ट्स यांनी त्यावेळी फिर्यादी पक्षातर्फे साक्ष देताना, क्लॅन्सीनं तिच्या उपचारांदरम्यान मनोविकृतीच्या लक्षणांचे काहीही संकेत दिले नव्हते, असा दावा केला.

खटल्यादरम्यान क्लॅन्सीच्या समर्थनार्थ शेकडो महिला न्यायालयाबाहेर जमल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

“तिच्या किंवा इतर कोणाच्याही सुरक्षिततेला धोका असल्याचे कोणतेही गंभीर संकेत नव्हते,” असं टफ्ट्स म्हणाल्या. त्यांनी 5 महिन्यांत क्लॅन्सी यांची डझनहून अधिक वेळा भेट घेतली होती.

पण बचाव पक्षाच्या वकिलांनी टफ्ट्स यांच्या वैद्यकीय नोंदींचा दाखला दिला. त्यात क्लॅन्सीच्या बोलण्याचं वर्णन “दबावपूर्ण, कमी उत्साही” असं केलेलं होतं. दबावपूर्ण म्हणजे जलद, चिंताग्रस्तपणे बोलणं हे मेनियाचं (एक प्रकारचा मानसिक आजार) लक्षण असू शकतं, असाही दावा केला.

टफ्ट्स यांनी क्लॅन्सीच्या संदर्भातील दबावाचा दावा फेटाळून लावला.

बचाव पक्षाचे वकील केवीन रेडिंग्टन यांनी दबाव टाकला, तेव्हा म्हटलं, “त्यात काय लिहिलं आहे याची मला पर्वा नाही. मला काय सांगायचं आहे, हे मला माहिती आहे.”

रेडिंग्टनही तणावात होते. कारण दुसरे सरकारी मानसशास्त्रज्ञ अवराम मॅक यांना प्रसूतीनंतरचा मनोविकृती हा प्रकार आहे का, याबद्दल वारंवार प्रश्न विचारले होते.

अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन प्रसूतीनंतरच्या मनोविकृतीला केवळ एक प्रस्तावित आजार (अद्याप अधिकृत आणि स्वतंत्र दर्जा न मिळालेला) मानते, असं त्यांनी सांगितलं.

मॅक यांनी प्रसूतीनंतरच्या मनोविकृतीला मान्यताप्राप्त आजार म्हणणं टाळलं आणि एका क्षणी “मला खात्री नाही की हेच तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर आहे,” असं म्हटलं.

रेडिंग्टन यांनी त्यावर रागाने “मला काही फरक पडत नाही”, असं उत्तर दिलं.

क्लॅन्सीच्या आईने दिली साक्ष

लिंडसे यांच्या पूर्वाश्रमीच्या सासू पॅट्रिक क्लॅन्सी यांच्याशिवाय त्यांची आई आणि बहिणीनंही साक्ष दिली. तिच्या मुलाच्या जन्मापासून क्लॅन्सीचं मानसिक आरोग्य खालावत होतं, असं त्यांनी न्यायसमितीला सांगितलं.

लिंडसे क्लॅन्सी “मदतीसाठी याचना करत होती”, अशी साक्ष तिच्या पूर्वाश्रमीच्या सासूनं दिली.

“तिला झोपायला त्रास होत होता. भूक कमी होत होती, ती खूप चिंताग्रस्त आणि निराश होती,” असं त्या म्हणाल्या.

क्लॅन्सीला प्रसूतीनंतरच्या मनोविकृतीचा आजार (पोस्टपार्टम सायकोसिस) झाला होता, हे न्यायसमितीला पटवून देण्याचा प्रयत्न तिच्या वकिलांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images

सर्वात धाकट्या मुलाच्या जन्मापर्यंत क्लॅन्सी एक ‘अत्यंत मायाळू’ आई होती, असंही त्यांनी सांगितलं.

“मुलांच्या मृत्यूच्या 1 महिना आधी क्लॅन्सीच्या मनात मुलांना इजा पोहोचवण्याचे विचार येत होते, असं तिनं मला आणि तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीला सांगितलं होतं,” असं क्लॅन्सीच्या आई पॉला मस्कग्रोव्ह म्हणाल्या.

मसग्रोव्ह यांच्या मते, त्यांच्या मुलीला भास होऊ लागले होते आणि असं वाटत होतं की, तिची औषधं ‘तिच्या मेंदूचा नाश करत आहेत’.

क्लॅन्सीची बहीण, ॲलिसन ओझ्गा हिनं मुलांची हत्या करण्याच्या 1 महिना आधी तिच्या बहिणीला दररोज आत्महत्येचे विचार येत होते, असं सांगितलं.

क्लॅन्सी कुटुंबाच्या घराबाहेर शेजारील लोक मृत मुलांच्या स्मृतीस अभिवादन करत आहेत.

फोटो स्रोत, Boston Herald via Getty

न्यायाधीशांनी काय म्हटलं?

अंतिम युक्तिवादाच्या 2 दिवस आधी फिर्यादी पक्षाने साक्षीदारांना क्लॅन्सीच्या कॅथलिक धर्माबद्दल विचारल्यानंतर क्लॅन्सीच्या बचाव पक्षानं खटला रद्द करण्याची विनंती केली.

गेल्या आठवड्यात सरकारी पक्षानं क्लॅन्सीच्या पूर्वाश्रमीच्या सासू, सुसान क्लॅन्सी यांना विचारलं की, खून हे ‘महापाप’ मानलं जातं याची तिला जाणीव होती का? त्यानंतर त्या कॅथलिक आहेत का? असं विचारलं.

पण न्यायाधीशांनी न्यायसमितीला या साक्षीकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं.

पुढं हत्येनंतर लिंडसे क्लॅन्सीची मुलाखत घेणारे न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ कर्क हेलबर्न यांनी साक्ष दिली. त्यांनी क्लॅन्सीला तिच्या कॅथोलिक असण्याविषयी विचारलं होतं आणि आत्महत्या हे ‘गंभीर पाप’ असल्याबद्दलही बोलणं झाल्याचं सांगितलं होतं.

न्यायाधीश विल्यम सुलिव्हन यांनी क्लॅन्सीच्या कायदेशीर टीमने खटला रद्द करण्याची केलेली विनंती फेटाळली, परंतु साक्ष देण्याचा हा प्रकार ‘पूर्णपणे अयोग्य’ होता, असं न्यायसमितीला सांगितलं.

“ते नाकारले पाहिजे. त्यावर विचार केला जाऊ नये. मी याबद्दल यापेक्षा अधिक स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही,” असं ते म्हणाले.

(अतिरिक्त वृत्तांकन: अ‍ॅना फॅग्युई आणि ब्रेंडन ड्रेनन)

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC