Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Eknoor Singh/Getty Images
एकनूर सिंग सांगतो की, वर्षाला 1 लाख 20 हजार पाऊंडपेक्षा (सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये) अधिक कमाई करण्यासाठी त्याला केवळ एक मोबाईल फोन आणि चांगलं इंटरनेट कनेक्शन इतकंच लागतं.
लंडनमध्ये राहणारा 22 वर्षांचा एकनूर हा व्यावसायिक ‘क्लिपर’ आहे.
सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल व्हावेत, यासाठी तो ग्राहकांकडून पैसे घेऊन छोटे, उभ्या आकाराचे (व्हर्टिकल) व्हीडिओ तयार करतो.
“माझ्या व्हीडिओ किंवा क्लिपला जितके जास्त व्ह्यूज मिळतात, तितके जास्त पैसे मी कमावतो,” असं तो म्हणतो.
साधारणपणे, कपड्यांचा ब्रँड, म्युझिक कंपनी, चित्रपट निर्मिती संस्था, पॉडकास्ट करणारी व्यक्ती किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे ग्राहक क्लिपरला काम देतात. त्यांच्याकडे आधीच एक मोठा व्हीडिओ असतो. क्लिपर सर्वप्रथम तो व्हीडिओ पाहतो.
त्यानंतर क्लिपर त्या व्हीडिओमधील सर्वात चांगले किंवा लक्ष वेधून घेणारे क्लिप्स निवडतो आणि त्यांचे 30 ते 60 सेकंदांचे छोटे व्हीडिओ तयार करतो. हे व्हीडिओ तो इन्स्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करतो.
क्लिपरचं काम करणारे तरुण साधारणपणे 16 ते 25 वयोगटातील असतात. या वयातील लोकांना कोणत्या प्रकारचे व्हीडिओ आवडतील आणि कोणते व्हीडिओ त्यांच्या मनाला भावतील, याची चांगली समज त्यांना असते. त्यामुळे त्यांचे छोटे व्हीडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावेत (व्ह्यूज), असा त्यांचा प्रयत्न असतो.
महिन्याला 12 लाख 60 हजारांची कमाई
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हीडिओला मिळणाऱ्या प्रत्येक 1 हजार व्ह्यूजमागे क्लिपरला 3 डॉलर (सुमारे 280 रुपये) पर्यंत कमाई होऊ शकते. एखादा व्हीडिओ खूप व्हायरल झाला, तर त्यातून मोठी कमाई होऊ शकते.
एकनूर सिंग सांगतो की, गेल्या वर्षी त्याने पॉपस्टार दुआ लिपाचा एक छोटा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यातून त्याला 300 डॉलर (सुमारे 28 हजार रुपये) मिळाले. त्यानंतर त्याला हे काम करण्याची आवड निर्माण झाली.
“मी विचार केला, ‘अरे, केवळ एक व्हीडिओ पोस्ट करण्यासाठी इतके पैसे मिळतात’ यातून किती चांगली कमाई होऊ शकते, हे मला लगेच लक्षात आलं.”
आता तो सांगतो की, या कामातून त्याला महिन्याला किमान 10 हजार पाऊंड म्हणजेच 12 लाख 60 हजार रुपये मिळतात.
तो सांगतो की, तो मजेशीर, विनोदी, कमी वेळात पाहता येणारे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे व्हीडिओ निवडतो. उदाहरणार्थ, मे महिन्यात न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गाला कार्यक्रमात सब्रिना कारपेंटरच्या ड्रेसच्या शेपटीवर कोणाचा तरी पाय पडला, तेव्हा तिची जी प्रतिक्रिया होती, त्याचा त्याने एक छोटा व्हीडिओ तयार केला होता. मात्र, हा व्हीडिओ नेमक्या कोणत्या ग्राहकासाठी तयार केला होता, हे एकनूरने सांगितलं नाही.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
अनेकांना कमाईच होत नाही
अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील विचिटा शहरात राहणाऱ्या 24 वर्षीय इथन विम्ससाठी व्हीडिओ क्लिपिंग हे त्याच्या इतर व्हीडिओ बनवण्याच्या कामाला जोडून केलेलं अतिरिक्त कमाईचं साधन आहे. या कामातून तो ‘महिन्याला किमान 1 हजार डॉलर’ (सुमारे 94 हजार रुपये) कमावतो, असं त्याने सांगितलं.
इथन विम्स हा यूट्यूबर आणि पॉडकास्ट करणाऱ्या कॅलेब हॅमरसाठी छोटे व्हीडिओ तयार करतो. हॅमरचा ‘फायनान्शियल ऑडिट’ हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात तो पाहुण्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतो, विश्लेषण करतो.
व्हीडिओ क्लिपिंगच्या कामामुळे विम्सला घरातूनच कमाई करता येते. त्यामुळे त्याला पत्नी आणि त्याच्या एक वर्षाच्या मुलासोबत जास्त वेळ घालवता येतो. तो म्हणतो, “मला रोज ऑफिसमध्ये जाऊन सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतची नोकरी नको आहे.”
काही क्लिपर या कामातून चांगली कमाई करत असले, तरी असे लोक फारच कमी आहेत, असं सोशल मीडिया सल्लागार लिया हॅबरमन सांगतात.
त्या म्हणतात, “सोशल मीडियावर स्वतःचा कंटेंट तयार करणाऱ्यांबाबतही हेच चित्र आहे. त्यापैकी बहुतेक जणांना फारच कमी पैसे मिळतात किंवा काहीच कमाई होत नाही.”
दरम्यान, स्ट्रीमिंग क्षेत्राचे विश्लेषक डेव्हिन नॅश सांगतात की, क्लिपिंगच्या कामात यशस्वी होण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, याचा अनेकदा अंदाज येत नाही. ते सावध करतात की, यशस्वी क्लिपरना तासन्तास व्हीडिओ पाहावे लागतात आणि ते त्या विश्वातच जगतात म्हणजेच त्यांचं संपूर्ण लक्ष याच कामावर असतं.
फोटो स्रोत, Ethan Weems
क्लिपरना काम देणारे ग्राहक आणि क्लिपर यांची ओळख करून देणाऱ्या काही वेबसाइट्स आहेत. या वेबसाइट्सवर व्हीडिओ तयार करण्याची कामं उपलब्ध असल्याची माहिती दिलेली असते.
या वेबसाइट्समध्ये रेडिट आणि डिस्कॉर्डसारख्या ऑनलाइन मंचांवरील पेजेसचा समावेश होतो. त्याचबरोबर, क्लिपिंग कल्चर, वायरॉ, व्हॉप आणि किक यांसारख्या खास क्लिपिंगसाठी तयार केलेल्या वेबसाइट्सही आहेत.
या खास क्लिपिंग वेबसाइट्स व्हीडिओ तयार करून घेणाऱ्या कंपन्यांकडून शुल्क आकारतात. क्लिपिंग कल्चर या वेबसाइटवर कॅपिटल रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एचबीओ मॅक्स यांसारख्या कंपन्या ग्राहक असल्याचं दिसून येतं.
अशा कंपन्यांसाठी घरातूनच काम करणाऱ्या किशोरवयीन मुलांना किंवा विशीतील तरुणांना काम देणं, सोशल मीडियावर नेहमीच्या पद्धतीने जाहिराती देण्यापेक्षा खूप स्वस्त पडतं. तसेच, या तरुणांनी तयार केलेले व्हीडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांचं लक्ष वेधून घेण्याची शक्यताही अधिक असते.
लास वेगास येथील ‘बॉक्सेबल’ ही कंपनी याच पद्धतीने काम करते. ही कंपनी तयार सुट्या भागांपासून घरं बनवते. कंपनीचे संस्थापक गॅलियानो तिरामानी स्वतःही अनेक व्हीडिओंमध्ये दिसतात. ते सांगतात, “आतापर्यंत आमच्या या छोट्या व्हीडिओंना मिळून साधारण 1 अब्ज व्ह्यूज मिळाले असावेत.”
ब्रिटनमध्ये डाउनिंग स्ट्रीटमध्ये सल्लागार म्हणून काम केलेले आणि आता ‘जिमीज जॉब्स ऑफ द फ्युचर’ हा पॉडकास्ट चालवणारे जिमी मॅकलॉघलिन यांनीही व्हीडिओ क्लिपिंगचा मार्ग स्वीकारला आहे.
“हे छोटे व्हीडिओ म्हणजे मुख्य कार्यक्रमाची झलक दाखवणाऱ्या ट्रेलरसारखे असतात,” असं ते सांगतात.
उदाहरणार्थ, नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान अँडी बर्नहॅम सहभागी झाले होते. “हा पूर्ण पॉडकास्ट सुमारे 50 हजार वेळा पाहिला गेला. पण, त्यातील छोटे व्हीडिओ लाखो वेळा पाहिले गेले,” असं ते सांगतात.
फोटो स्रोत, Eknoor Singh
‘क्लिपिंग कल्चर’ या कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख इव्हान स्टॅनफिल्ड हा अवघ्या 21 वर्षांचा आहे. गेल्या वर्षी त्याने कॅन्सस विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडून ही कंपनी सुरू केली होती.
स्टॅनफिल्ड सांगतो की, त्यांची वेबसाइट जगभरातील 3 लाख 40 हजारांहून अधिक क्लिपर्सना कंपन्या म्हणजे ब्रँड्सशी जोडते. छोटे व्हीडिओ इतके लोकप्रिय का होत आहेत, यामागचं कारण सांगताना तो म्हणतो, “लोकांची एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची (अटेंशन स्पॅन) क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.”
तो पुढे सांगतो की, व्हीडिओ क्लिप्स तयार करण्याचं हे काम तरुणांसाठी योग्य आहे. कारण छोटे (शॉर्ट-फॉर्म) व्हीडिओ पाहणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.
एकनूर सिंग सांगतो की, तो कुठेही असला तरी सतत व्हीडिओ क्लिप्स तयार करत असतो.
“मी कुठेही असलो तरी काम करू शकतो. सुट्टीवर गेलो तरी पैसे कमवू शकतो.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




