Home LATEST NEWS ताजी बातमी फ्रान्स: सुपरमार्केटमधील शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; नेमकं काय घडलं?

फ्रान्स: सुपरमार्केटमधील शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; नेमकं काय घडलं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

फ्रान्समधील फ्रीज हॅक का झाले?

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटवर सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे तेथील फ्रिज आणि फ्रिजर्स गरम झाले. यामुळे ताजे आणि गोठवून ठेवलेले अन्नपदार्थ खराब झाले. या प्रकारामुळे लाखो युरोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हॅकर्सनी फ्रिज आणि फ्रिजर्समधील तापमान नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरचा ताबा घेतला. त्यामुळे काही फ्रिज आणि फ्रिजरमधील तापमान रात्रीच्या वेळी 50 अंश सेल्सिअसपर्यंत (120 अंश फॅरेनहाइट) वाढले, अशी माहिती या हल्ल्याचा फटका बसलेल्या एका सुपरमार्केट साखळीने दिली.

‘कोऑपरेटिव्ह यू’ या सुपरमार्केट साखळीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांच्या अनेक सुपरमार्केट्सवर हा सायबर हल्ला झाला आहे. हा हल्ला ‘अत्यंत गंभीर आणि यापूर्वी कधीही घडलेला नव्हता’, असंही ते म्हणाले.

या सायबर हल्ल्यात ‘कोऑपरेटिव्ह यू’च्या 100 हून अधिक सुपरमार्केट्सना लक्ष्य करण्यात आले. तर ‘इंटरमार्शे’ आणि त्यांच्या ‘नेट्टो’ या ब्रँडच्या 180 दुकानांनाही या हल्ल्याचा फटका बसला. हा हल्ला इतर दुकानांमध्ये पसरू नये, यासाठी इतर 100 दुकानांचे इंटरनेट कनेक्शन तातडीने तोडण्यात आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

कॅरेफोर, मोनोप्रिक्स आणि ई. लेक्लेर्क या इतर मोठ्या सुपरमार्केट्सनाही या सायबर हल्ल्याचा फटका बसला. डॅनिश अभियांत्रिकी कंपनी डॅनफॉसने तयार केलेल्या सॉफ्टवेअरला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.

या सॉफ्टवेअरच्या मदतीने सुपरमार्केटमधील फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान दूरवरून नियंत्रित करता येते.

नेमकं काय घडलं?

सामान्यतः सुपरमार्केटमधील फ्रिजर्स रात्री काही काळासाठी बर्फ वितळवण्याच्या प्रक्रियेत (डिफ्रॉस्ट) ठेवले जातात. या वेळी त्यांचं तापमान थोडं वाढतं. पण, हॅकर्सनी फ्रिज आणि फ्रिजर्सचे तापमान वाढवून ते तसेच गरम राहतील, अशी कमांड दिली. या प्रक्रियेत फ्रिज आणि फ्रिजर्सचं तापमान नेमकं किती वाढू शकतं, याबाबतच्या वृत्तांना डॅनफॉस कंपनीने दुजोरा दिलेला नाही.

डॅनफॉस कंपनीने सांगितलं की, ज्या फ्रिज आणि फ्रिजर्सवर हल्ला झाला, ते जुन्या मॉडेलचे होते. त्यामधील सुरक्षा यंत्रणा अद्ययावत (अपडेट) करता येत नव्हती. त्यामुळे कंपनीला आधीच लक्षात आलेला सायबर हल्ल्याचा धोका टाळणं शक्य झालं नाही.

कंपनीने पुढे सांगितलं की, सायबर हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर नेहमी ‘अपडेट’ ठेवावे, असा सल्ला ते व्यवसायांना ‘बऱ्याच काळा’पासून देत आहेत.

“आमच्या ग्राहकांच्या व्यवसायासाठी फ्रिज आणि फ्रिजर्स व्यवस्थित चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह यंत्रणा वापरता यावी, यासाठी आम्ही त्यांना मदत करत राहू.”

या सायबर हल्ल्याचा नेमका किती मोठा परिणाम झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, वेगवेगळ्या सुपरमार्केट्स साखळ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, फ्रान्समधील एकूण सुमारे 15 हजार दुकानांपैकी 400 दुकानांना या हल्ल्याचा फटका बसला आहे.

‘कॅरेफोर’ने सांगितलं की, त्यांच्या 6 हजार दुकानांपैकी 80 दुकानांमधील फ्रिज हॅक करण्यात आले. तर ‘मोनोप्रिक्स’च्या 400 हून अधिक दुकानांपैकी 5 टक्के दुकानांना या हल्ल्याचा फटका बसला. ज्या अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेची खात्री देता येत नव्हती, ते विक्रीतून काढून टाकण्यात आले.

फ्रान्समध्ये फ्रीजवर सायबर हल्ला, नेमकं काय घडलं?

इंटरमार्शे आणि नेट्टो या सुपरमार्केटचे मालक असलेल्या मस्केटिअर्स ग्रुपने बीबीसीला सांगितलं की, सोमवारी दुपारपर्यंत काही दुकानांमधील ताजे आणि गोठवलेले अन्नपदार्थ ठेवण्याचे फ्रिज आणि फ्रिजर्स बंद होते.

या फ्रिज आणि फ्रिजर्समधील सर्व अन्नपदार्थ ‘खबरदारी’ म्हणून काढून टाकण्यात आले आहेत, असं कंपनीने सांगितलं. त्याशिवाय, दुकानांमधील रिकामे झालेले रॅक पुन्हा ‘त्वरीत’ अन्नपदार्थांनी भरण्यासाठी कर्मचारी काम करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इंटरमार्शेच्या दुकानांमधील फ्रिजचे तापमान रविवारी (11 ऑक्टोबर) रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत 6 तास 50 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या फ्रिजमध्ये ठेवलेले सर्व अन्नपदार्थ फेकून देण्यात आल्याचे कंपनीने सांगितलं.

या सायबर हल्ल्यामुळे सोमवारी सकाळी अनेक सुपरमार्केटमध्ये पोहोचलेल्या व्यवस्थापकांना फ्रिजर्समधून गरम हवेच्या झळा जाणवल्या. काही ठिकाणी तर फ्रिजर्समध्ये आग लागण्याच्याही घटना घडल्या होत्या.

नेमकं किती नुकसान झालं?

फ्रान्समधील वृत्तवाहिनी ‘बीएफएमटीव्ही’ने एक छायाचित्र प्रसिद्ध केलं. त्यात आईस्क्रीम ठेवण्याच्या विभागातील एका फ्रिजरचे तापमान 26.5 अंश सेल्सिअस असल्याचे दिसत होते.

अल्सास प्रांतातील दोन सुपरमार्केट्सना मिळून 2 लाख 70 हजार युरोचे (सुमारे 2 कोटी 89 लाख रुपये) नुकसान झाले. या आकडेवारीवरून देशभरातील एकूण नुकसान लाखो युरोंपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

फ्रान्समध्ये फ्रीजवर सायबर हल्ला

या घटनेप्रकरणी फ्रान्सच्या सरकारी वकिलांनी सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. पॅरिसच्या सरकारी वकिलांच्या कार्यालयाने याला ‘मोठ्या प्रमाणावर झालेला सायबर हल्ला’ म्हटलं आहे. या हल्ल्याचा फ्रान्समधील अनेक मोठ्या सुपरमार्केट्स, फूड रिटेल साखळ्यांच्या रेफ्रिजरेटर्सवर परिणाम झाला आहे.

युरोपियन फूड कमिशनर ख्रिस्तोफ हॅन्सन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून या सायबर हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “अन्नसुरक्षेकडे सर्वच स्तरांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण, अन्नाचा वापर आता शस्त्र म्हणून केला जात असल्याचं वास्तव समोर आलं आहे.”

कोऑपरेटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉमिनिक शेल्शर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितलं की, “परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करत आहेत. यासाठी रेफ्रिजरेटर्स दुरुस्तीच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.”

या सायबर हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. फ्रान्समध्ये अन्नपुरवठ्यासाठी अत्यावश्यक असलेल्या उपकरणांना लक्ष्य करणं ‘अस्वीकार्य’ असल्याचंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC