Home LATEST NEWS ताजी बातमी ‘स्माइलिंग डिप्रेशन’ नक्की काय आहे आणि हे कसे ओळखावे?

‘स्माइलिंग डिप्रेशन’ नक्की काय आहे आणि हे कसे ओळखावे?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

स्माइलिंग डिप्रेशन म्हणजे काय?

नैराश्यग्रस्त व्यक्ती म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर अशी कल्पना येते की सकाळी झोपेतून उठल्यावर आपले अंथरुण सोडणे देखील त्या व्यक्तीला अवघड आहे.

अशा व्यक्ती कदाचित खूप रडत असतील, मित्रांपासून लांब राहत असतील किंवा दिवसातले काम करण्यासाठी त्यांच्याकडे अगदी कमी ऊर्जा शिल्लक राहित असेल.

जेवताना हास्य-विनोद करणाऱ्या, चांगले सक्रिय सामाजिक जगणाऱ्या आणि ऑफिसमध्येही उत्तमरीत्या काम करणारी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही.

कथितरीत्या ‘स्माइलिंग डिप्रेशन’ने ग्रासलेल्या लोकांसाठी मात्र ही गोष्ट अगदी सामान्य आहे.

अशा प्रकारच्या नैराश्यातून जाणारे लोक आपल्या मित्रांना किंवा सोबत काम करणाऱ्यांना नाही, तर स्वतःलाच फसवत असतात.

‘स्माइलिंग डिप्रेशन’ म्हणजे काय?

‘स्माइलिंग डिप्रेशन’ हा अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त आजार नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांत इंटरनेटवर या शब्दाच्या सर्चचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे.

ब्रिटनच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीतील मानसिक आरोग्य संशोधक डॉ. ऑलिव्हिया रेमेस सांगतात, “याचा अर्थ बाहेरून स्वतःला आनंदी दाखवणे, पण प्रत्यक्षात आतून दुःखी आणि निराश असणे असा होतो.”

आपण सगळेच कधी ना कधी उदास होतो. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरातील जवळपास 32 कोटी लोकांसाठी या भावनांचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते.

ही अशी अवस्था असते जिथे सततचे दुःख किंवा कोणत्याही गोष्टीत रस आणि आनंद न वाटणे ही लक्षणे कित्येक आठवडे किंवा महिने कायम राहतात ज्यामुळे काम, नातेसंबंध, झोप आणि रोजचे जगणे यावर परिणाम होतो.

नेहमी आपण विचार करतो तसेच नैराश्य दिसेल असं मात्र नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात सुमारे 32 कोटी लोक नैराश्याने (डिप्रेशन) ग्रस्त आहेत.

अभ्यासानुसार नैराश्य असलेल्या सुमारे 40% लोकांना ‘असामान्य’ वाटते. अशा प्रकरणांमध्ये लक्षणे ही नेहमीच्या सर्वसाधारण समजुतींपेक्षा वेगळी असतात.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा कमी झोपण्याऐवजी किंवा कमी खाण्याऐवजी अधिक झोपू शकते किंवा जास्त खाऊ शकते. तसेच काहीतरी छान किंवा रंजक घडल्यास तिचा मूड तात्पुरता चांगलाही होऊ शकतो.

आणि याचेही पुरावे आहेत की नैराश्य असलेल्या व्यक्ती स्वतःची लक्षणे किंवा भावना लपवून लोकांमध्ये सहज मिसळण्याचा प्रयत्न करतात, ज्याला ‘मास्किंग’ असे म्हणतात.

लोक नैराश्य का लपवतात?

“स्माइलिंग डिप्रेशन”चा सामना करणाऱ्या काही जणांना आपण स्वतः डिप्रेशनमध्ये आहोत याची जाणीवच नसते, त्यामुळे आपण ते लपवतोय हेही त्यांना समजत नाही.

रेमेस यांच्या मते, “धावपळीच्या आणि तणावाच्या जगण्याचा हा एक स्वाभाविक भाग आहे, असा विचार कदाचित ते करत असतील.”

'स्माइलिंग डिप्रेशन' ही कोणतीही वैद्यकीय संज्ञा नाही. परंतु गेल्या 5 वर्षांत या शब्दाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

काही लोकांना आपल्याला त्रास होतोय हे समजत असावे, पण इतर कोणालाही ते जाणवू नये म्हणून ते हे डिप्रेशन लपवण्यासाठी खूप धडपड करतात.

रेमेस यांच्या मते, “त्यांच्या स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा असतात आणि आपल्याला काही अडचण आहे हे स्वतःशी किंवा दुसऱ्यांसमोर कबूल करायला ते तयार नसतात.”

काही लोकांना बदनामीची भीती असते, तर काहींना आपण दुसऱ्यांवर भार बनू अशी भीती वाटते. संशोधनानुसार, ऑफिसमध्ये किंवा नात्यांमध्ये आपल्यावर टीका होईल या चिंतेनेही काही लोक ग्रासलेले असतात.

याशिवाय सांस्कृतिक किंवा कौटुंबिक अपेक्षांमुळेही लोक यावर उघडपणे बोलणे टाळतात.

नैराश्य लपवण्याचे धोके कोणते?

तज्ज्ञ सांगतात की, वस्तुस्थिती लपवून केवळ वरवरचा आव आणणे धोकादायक ठरू शकते.

ब्रिटनच्या एक्सेटर युनिव्हर्सिटीतील मानसोपचारतज्ज्ञ प्रोफेसर बार्नी डन यांच्या मते, “नैराश्य आपल्याला जगापासून वेगळे पाडते आणि त्यामुळे एकटेपणाची जाणीव तीव्र होते. तर अनेकदा या दुःखातून बाहेर पडण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे लोकांमध्ये मिसळणे हा असतो.”

याचा अर्थ असाही होऊ शकतो की लोकांना ज्या मदतीची गरज आहे, ती त्यांना मिळत नाही.

रेमेस सांगतात, “जर या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष झाले तर हा आजार गंभीर आणि दीर्घकालीन रूप घेऊ शकतो ज्यामुळे आत्महत्येचा धोकाही वाढतो.”

डिप्रेशनची 7 लक्षणे

जेव्हा तुम्ही परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करत असता, तेव्हा काही बदलांकडे दुर्लक्ष करणे सोपे जाऊ शकते.

1. आवडीच्या गोष्टींमधून आनंद मिळणे बंद होणे.

या गोष्टींची तुम्ही नेहमी आतुरतेने वाट पाहता. जसं की जसे की मित्रांना भेटणे, जिममध्ये जाणे किंवा आवडीचा टीव्ही शो बघणे त्या गोष्टी जर आता ओझे वाटू लागल्या असतील, तर थोडा अधिक खोलवर विचार करणे गरजेचे आहे.

रेमेस सांगतात, छंद किंवा आवडीच्या गोष्टींमधील रस कमी होण्यामागे व्यस्त आणि वेगवान जीवनशैली हे कारण आहे असं देखील ती व्यक्ती समजू शकते.

2. हात किंवा पाय खूप जड वाटणे

“लीडन पॅरालिसिस” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अवस्थेत हात आणि पाय असामान्यपणे जड वाटतात. यामुळे रोजच्या साध्या कामांसाठीही खूप ताकद लावावी लागते. हे गंभीर नैराश्याचे एक लक्षण असू शकते.

3. तुम्ही वारंवार ठरवलेले प्लॅन्स कॅन्सल करता

कधीकधी तुम्ही इतरांसमोर “उत्तम स्थितीत” दिसू शकता. पण जेव्हा तुमचा मूड खराब होतो आणि स्वतःच्या भावना लपवणे कठीण जाते तेव्हा तुम्ही ठरलेले प्लॅन्स रद्द करून टाकता.

4. जास्त झोपूनही सतत थकवा जाणवणे

तुम्ही तुमची रोजची सर्व कामे कदाचित करतही असाल, पण सोबतच तुम्हाला सतत थकवा जाणवत राहतो.

रेमेस सांगतात, “संध्याकाळची वेळ विशेष त्रासदायक ठरू शकते. कारण या त्रासातून जाणाऱ्या लोकांना दिवसाच्या शेवटी जास्त वाईट वाटू शकते आणि त्यांना नेहमीपेक्षा जास्त झोपेची गरज भासू शकते.”

नेहमीपेक्षा जास्त नकार किंवा टीकेमुळे पटकन वाईट वाटणे हे डिप्रेशनचे लक्षण असू शकते.

5. तुम्ही टीका किंवा नकाराबाबत अधिक संवेदनशील आहात.

तुमच्या बॉसची एखादी साधी कमेंट किंवा मित्राने अचानक प्लॅन कॅन्सल करणे, नेहमीपेक्षा जास्त मनाला लागू शकते.

रेमेस यांच्या मते, टीका किंवा नकार सहन न होणे आणि त्याबाबत अतिसंवेदनशील असणे जसा अनुभव एडीएचडी (अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) ) असलेल्या लोकांनाही येतो हे असामान्य डिप्रेशनचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

6. तुम्ही नेहमी एकतर सगळ्यांना हसवणारे असता किंवा सतत मदतीसाठी तत्पर असता

डिप्रेशनचा सामना करणारी व्यक्ती नेहमीच एकटी पडते किंवा सगळ्यांपासून लांब राहते असे नाही. उलट, बऱ्याचदा तिचे वागणे याच्या पूर्णपणे विरुद्ध असू शकते. जसे की प्रत्येक पार्टीमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेणे, कामात स्वतःला पूर्ण झोकून देणे किंवा इतरांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे.

7. मनात सतत नकारात्मक विचारांचे चक्र सुरू राहणे

बाहेरून पाहणाऱ्यांना तुम्ही कमालीचे आत्मविश्वासी वाटू शकता पण आतून मात्र तुम्ही सतत स्वतःलाच दोष देत असता.

स्वतःवरच संशय घेणे, आपण निरुपयोगी आहोत असे वाटणे आणि आतून रिकामेपण किंवा शून्य वाटणे हे नैराश्याचे धोक्याचे संकेत असू शकतात.

या समस्येवर उपाय काय?

“स्माइलिंग डिप्रेशन” या शब्दावर आक्षेप घेणारेही अनेक लोक आहेत.

रेमेस यांच्या मते, या शब्दामुळे लोकांना स्वतःसोबत नक्की काय घडते हे समजायला आणि त्याला नाव द्यायला मदत होत असली, तरी हा शब्द एका गुंतागुंतीच्या समस्येचे सुलभीकरण आहे.

त्या म्हणतात, ‘हसणे’ म्हटल्यावर समोर आनंद आणि उत्साहाचे चित्र उभे राहते. पण प्रत्यक्षात या अवस्थेचे खरे स्वरूप हे निराशा, आतून वाटणारा एकटेपणा आणि निरर्थकता हेच असते.”

डन सल्ला देतात की, ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे अशा कोणाजवळ तरी सुरुवातीला आपल्या भावना मोकळ्या करायला सुरुवात करा.

त्यांच्या मते, “असे बोलल्यामुळे इतरांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते, आपण एकटे नाही आहोत याची जाणीव होते आणि लोकांसोबत जोडले गेल्यासारखे वाटते. या गोष्टीचा अनेकांना सुखद धक्का बसतो.”

ते सांगतात, “संवाद, औषधोपचार आणि सामाजिक उपचार हे सर्व प्रभावी ठरू शकतात, याचे पुरावे उपलब्ध आहेत.”

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC